Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मनरेगा कायद्यात सुधारणा
करणारं ‘व्हीबी जी राम जी’ विधेयक लोकसभेत सादर-पूर्वीच्या शंभर दिवसांऐवजी आता
सव्वाशे दिवसांच्या रोजगाराची हमी
·
सदर विधेयक संसदेच्या
स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी
·
घरकुल घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम
·
अमेरिकेतल्या महाराष्ट्र
फाउंडेशनचे साहित्य तसंच समाजकार्य पुरस्कार जाहीर
आणि
·
१९ वर्षांखालील आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत भारताचा मलेशियावर ३१५ धावांनी दणदणीत विजय
****
मनरेगा कायद्यात सुधारणा करणारं ‘व्हीबी जी राम जी’ अर्थात
विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान – ग्रामीण हे विधेयक आज लोकसभेत सादर
झालं. हे विधेयक मजुरांना पूर्वीच्या शंभर दिवसांऐवजी वर्षभरात किमान सव्वाशे दिवस
कामाची हमी,
चांगलं वेतन, आणि पारदर्शक अंमलबजावणी
यंत्रणा प्रदान करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत
हे विधेयक सादर केलं. ते म्हणाले -
बाईट – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
या विधेयकात जलसुरक्षा, मुख्य ग्रामीण पायाभूत
सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि तीव्र हवामान बदलांचा सामना करण्यासाठी
विशेष कामांचा समावेश आहे. मनरेगा कायद्यापेक्षा मोठं आणि सुधारित असलेलं हे
विधेयक, मनरेगातल्या संरचनात्मक त्रुटी दूर करून विकसित भारत २०४७च्या अनुषंगाने एक
आधुनिक वैधानिक चौकट तयार करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या
विधेयकाबाबत संसद सदस्यांना माहिती देण्यासाठी उद्या एक विशेष बैठक बोलावण्यात आली
आहे. सकाळी साडे नऊ ते साडे दहा या वेळेत ही बैठक होणार आहे.
दरम्यान, लोकसभेत या विधेयकावर बोलताना काँग्रेस
खासदार प्रियंका गांधी यांनी, हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे
पाठवण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या-
बाईट – खासदार प्रियंका गांधी
****
विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांशी संबंधित असलेलं, विकसित
भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
****
निरसन आणि सुधारणा विधेयक, २०२५ आज लोकसभेत
मंजुरीसाठी सादर करण्यात आलं. या विधेयकात कालबाह्य कायदे रद्द करण्याची तर काही
कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तरतूद असल्याचं न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल
यांनी सांगितलं.
****
विमा कायद्यात सुधारणा करणारं, ‘सबका बिमा सबकी रक्षा विधेयक’ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत
सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, जीवन विमा महामंडळ कायदा
१९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा १९९९ मध्ये आणखी सुधारणा करेल, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सध्या लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे.
****
राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवरील चर्चा झाली. सभागृह नेते
जे.पी. नड्डा यांनी यावेळी बोलतांना, मतदार यादीचं वेळोवेळी
शुद्धीकरण आणि दुरुस्ती ही आयोगाची जबाबदारी असून, पात्र मतदाराचं नाव
यादीतून वगळलं जाऊ नये आणि अपात्र मतदार यादीत राहू नये, अशी
हमी संविधानाने दिल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी या
चर्चेत बोलतांना,
यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा
वापर करण्यात आला असून,
यंत्रात फेरफार करता येईल असा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद
केलं.
****
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या सदनिकांच्या
घोटाळ्याप्रकरणी आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे सक्तमजुरी
आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा कायम राहिली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश
पी.एम.बदर यांनी आज झालेल्या अंतिम सुनावणीत कोकाटे यांना दोषी ठरवत, अतिरिक्त
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेला शिक्षेचा निकाल कायम
ठेवला. सवलतीच्या दरात घरे मिळवण्यासाठी कोकाटे यांनी आपल्या नावावर घर नसल्याची
खोटी कागदपत्रं सादर केली होती.
****
उत्तर प्रदेशमध्ये मथुरा इथं झालेल्या भीषण अपघातात १३
जणांचा मृत्यू झाला,
तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आज पहाटे यमुना द्रुतगती
मार्गावर दाट धुक्यामुळे काही प्रवासी बस एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या
घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी
देण्यात येणाऱ्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांची घोषणा आज पत्रकार परिषदेत
करण्यात आली. २०२५ या वर्षासाठी साहित्यातील चार, समाज कार्यातील तीन
आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार अशा एकूण आठ पुरस्कारांचा यात समावेश
आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपाचे हे पुरस्कार येत्या १७ जानेवारीला
पुण्यात समारंभपूर्वक या प्रदान करण्यात येणार आहेत.
****
१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताने
मलेशियाचा ३१५ धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने अभिज्ञान
कुंडूच्या द्विशतकी खेळीच्या बळावर सात बाद ४०८ धावा केल्या. वेदांत त्रिवेदीने ९०
तर वैभव सूर्यवंशीने ५० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना मलेशियाचा संघ
९३ धावांवर सर्वबाद झाला. दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक पाच बळी घेतले. १२५ चेंडूत
१७ चौकार आणि नऊ षटकारांची फटकेबाजी करत २०९ धावा करणारा अभिज्ञान कुंडू सामनावीर
ठरला. दरम्यान,
या स्पर्धेच्या अ गटात सर्व सामने जिंकून सहा गुणांसह भारत
गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने परवा शुक्रवारी
तर अंतिम सामना येत्या रविवारी २१ डिसेंबरला होणार आहे.
****
६१ व्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचं बीड इथं १८ डिसेंबर
पासून आयोजन करण्यात आलं आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुषांचे २४ आणि
महिलांचे २४ संघ सहभागी होणार असून यात ८०० खेळाडूंचा समावेश आहे. राज्यस्तरीय
तसंच जिल्हास्तरीय खो खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होणार आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने १०१ गीर गायींचं वाटप केलं. कळंब, भूम
आणि परंडा तालुक्यांतल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या गायी देण्यात आल्या.
****
परभणी इथं चतुरंग प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणाऱ्या
यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान मालेला आजपासून सुरूवात झाली. छत्रपती
संभाजीनगरच्या कवयित्री गुंजन पाटील यांनी आज या व्याख्यानमालेत “समाज माध्यमांचे महिलांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि बदलते सामाजिक
संदर्भ” या विषयावर आपले विचार मांडले तसंच काही कविता सादर केल्या.
व्याख्यानमालेचं हे २१ वं वर्ष आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज शिवसेना तसेच भारतीय जनता
पार्टीची बैठक घेण्यात आली. संघटनात्मक मजबुती, कार्यपद्धती तसेच
नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
नांदेडच्या माजी महापौर जयश्री नीलेश पावडे तसंच माजी
उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह मनसेचे विनोद पावडे यांनी आज भारतीय जनता
पक्षात प्रवेश केला. नांदेड इथं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच खासदार अशोक
चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
****
बीड जिल्ह्यात गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान
प्रक्रियेदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ
बाळराजे पवार यांना पोलीसांनी आज अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक
करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान
गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे आठ, नाशिक
इथं आठ पूर्णांक आठ तर पुण्यात सुमारे साडे नऊ अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक नऊ तर परभणी इथं ११ पूर्णांक तीन
दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment