Tuesday, 16 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

देशभरात आज विजय दिवस साजरा केला जात आहे. १९७१ साली पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत भारतानं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ १६ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धानंतरच बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या शूरवीरांना देश आज कृतज्ञ नमन करत आहे. त्यांचं शौर्य, त्याग आणि मातृभूमीप्रतीची निष्ठा हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे.

विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजय दिनानिमित्त भारत मातेच्या वीर पुत्रांना आदरांजली अर्पण केली. ऑपरेशन सिंदूरनं सैन्याची आत्मनिर्भरता, सामरिक दृढता आणि आधुनिक युद्धशैलीचं प्रभावी दर्शन घडवल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९७१ च्या ऐतिहासिक विजयासाठी आपल्या शौर्य आणि बलिदानाने भारताला गौरव मिळवून देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांचं धैर्य, नि:स्वार्थ सेवा आणि पराक्रम पिढ्यान्‌पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युद्धात आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली. १९७१ साली आजच्या दिवशी अदम्य शौर्य आणि अचूक रणनीतीच्या जोरावर भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मानवतेचं रक्षण करणारा हा विजय भारतीय सेनेच्या अद्वितीय पराक्रमाचं प्रतीक ठरल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयकं सूचिबद्ध आहेत. यामध्ये विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान – ग्रामीण विधेयक तसंच विमा कायद्यांमधल्या सुधारणांसंबंधी विधेयकाचा समावेश आहे. तर राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवरील चर्चा सुरू राहणार आहे.

****

पुणे महापालिका आणि महा मेट्रोच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं ते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोंढवा बुद्रुक इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवालाही भेट दिली.

****

राज्य सरकारच्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे २ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशोब सादर केलेले नाहीत, असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. रविवारी विधिमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे ५३ हजार प्रकरणांमध्ये १ लाख ७७ हजार कोटींहून अधिक रुपयाच्या खर्चाचे हिशोब सादर झालेले नाहीत, तर ४० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये १ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या खर्चाचे हिशोब सादर झाल्याचं कॅगनं नमूद केलं आहे. नगर विकास विभागाकडे सर्वाधिक ११ हजार कोटी, नियोजन विभागाकडे ५ हजार ८०० कोटी रुपये, जलसंपदा विभागाकडे ३ हजार ६०० कोटी रुपयांचे हिशेब प्रलंबित आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरीत कुंभ साजरा केला जाणार आहे. त्यासाठी नाशिक परीसरात १५ हजार रोपं लावून मोठी वनराई तयार केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ काल कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. त्यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडं आणली आहेत. हरीत कुंभसाठी नाशिककरांनी देखील योगदान द्यावं, असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं.

****

लातूर तालुक्यातल्या मुरूड आणि करकट्टा परिसरात काल भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या बोरखेडी इथले सैनिक समाधान पाष्टे यांचं उपचारादरम्यान निधन झालं. कर्नाटकमध्ये बेळगाव इथल्या नऊ मराठा लाईट इन्फंट्री युनिटमध्ये रायफलमन म्हणून ते कार्यरत होते. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

No comments: