Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यातल्या सर्व २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, १५ जानेवारी
रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी
·
विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या हरकतींवर निवडणूक आयोगाचं
दुर्लक्ष- काँग्रेसचा आरोप, मुंबई महापालिकेच्या यादीवर ठाकरे गटाचा आक्षेप
·
पंतप्रधानांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी संसदेत
गदारोळ
·
जुन्या गाड्यांच्या योग्यता प्रमाणपत्र शुल्कात वाढ
आणि
·
मराठवाड्यासह राज्यात थंडीचा कडाका कायम
****
राज्यातल्या
सर्व २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काल जाहीर केला. या
घोषणेसोबतच सर्व महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता कालपासून लागू झाली. सर्व
महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मजमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
राज्यभरातल्या
२९ महापालिकांमधल्या एकंदर दोन हजार ८६९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महिलांसाठी
एक हजार ४४२ जागा, इतर मागास प्रवर्ग – ओबीसींसाठी ७५९, अनुसूचित
जातींसाठी ३४१ तर अनुसूचित जमातींसाठी ७७ जागा आरक्षित आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची
अधिसूचना आज, तर उर्वरित २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना
परवा गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे.
**
जालना तसंच
इचलकरंजी वगळता, उर्वरित सर्वच महापालिकांचा कार्यकाळ संपलेला आहे. मुंबई महानगरपालिकेत
एक सदस्यीय प्रभाग रचना तर इतर महापालिकांमध्ये बहु सदस्यीय प्रभाग रचना आहे. मतदारांना
जितके प्रभाग सदस्य असतील तितकं मतदान करावं लागणार असून, मतदान
प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होईल. तीन कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार
या निवडणुकीत मतदान करतील, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
**
महानगरपालिकेच्या
या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाहीत, हे स्पष्ट असल्याची
टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेविषयी
विरोधी पक्षांनी नोंदवलेल्या हरकतींवर निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही,
असा आरोपही सपकाळ यांनी केला.
**
दरम्यान, मुंबई महापालिकेची
मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची
घाई का केली, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने
विचारला आहे. याबाबतचं निवेदन पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक
आयोगाला सादर केलं. अपुऱ्या आणि त्रुटीयुक्त तयारीने निवडणुका घेणं, हे कायदेशीर तसंच नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं, त्यांनी
या पत्रात म्हटलं आहे.
**
जालना शहर
महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये १६ प्रभागात
मिळून दोन लाख ४५ हजार ९२९ मतदार आहेत. यात एक लाख २८ हजार ८९४ पुरुष, एक लाख १७
हजार १ महिला, तर ३४ इतर मतदार आहेत.
**
लातूर इथं
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा भाजपने निवडणूक लढविण्यास इच्छुक
उमेदवारांच्या काल मुलाखती घेतल्या. पक्षाकडे तब्बल नऊशेहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने
ही प्रक्रिया राबवण्यात आली.
**
राज्यात
बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढवण्याची भूमिका भाजप नेते तथा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात
मात्र भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी माहितीही
मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
सांगली
जिल्ह्यात इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ
पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल अनावरण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, संभाजी महाराज
तसंच अहिल्यादेवी यांच्या कार्याला उजाळा दिला. महापालिकेच्या वतीनं प्रातिनिधीक स्वरूपात
झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप, तसंच महावितरणच्या पाच नवीन वीज
उपकेंद्रांचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी
अशी मागणी करत, संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी काल गदारोळ केला. यामुळे
दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं.
दिल्लीच्या
रामलीला मैदानावर परवा झालेल्या काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत
उपस्थित केला. राज्यसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसने
माफी मागावी अशी मागणी सभागृह नेते जे पी नड्डा यांनी केली. त्यानंतर घोषणांचा गदारोळ
वाढत गेल्यानं उपाध्यक्ष हरिवंश यानी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी तहकूब केलं होतं.
राज्यसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निवडणूक सुधारणांविषयी चर्चेला सुरुवात झाली.
दरम्यान, काँग्रेसच्या
खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपचे हे आरोप फेटाळून लावले असून, सरकारला सभागृह चालवायची इच्छा नाही, असं म्हटलं आहे.
**
देशातल्या
जुन्या गाड्यांच्या योग्यता प्रमाणपत्र शुल्कात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालयानं वाढ केली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या पुनर्नोंदणीचा कालावधी पंधरा वर्षांवरुन
दहा वर्ष करण्यात आला असून, यासाठी नवीन दर तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या
दहा वर्षांनंतर प्रत्येकी पाच वर्षांच्या पुनर्नोंदणीच्या या तीन टप्प्यांसाठी दुचाकीला
अनुक्रमे दोनशे, एक हजार, आणि दोन हजार
रुपये तर तीन चाकी वाहनांसाठी अनुक्रमे दोनशे, तीन हजार आणि सात
हजार रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मालवाहतूक वाहनांसाठी पहिल्या दहा वर्षांनंतर
तीन वर्ष, दोन वर्ष आणि पाच वर्ष असे पुनर्नोंदणीचे टप्पे करण्यात
आले आहेत.
****
अल्पसंख्याक
व्यवहार मंत्रालयाने भारतीय खाजगी हज यात्रेकरूंना आगामी हज यात्रेसाठी १५ जानेवारी
पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व
अनिवार्य प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
****
जालन्यात
दोन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या प्रकरणातला दोषी रवी घुमारे
याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळला आहे. २०१२ मध्ये झालेल्या
या प्रकरणी स्थानिक न्यायालयानं २०१५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च
न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली आहे.
****
प्रशासनाबाबत
सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राज्याचे
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा
बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांची त्यांनी
सविस्तर माहिती घेतली. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी
लोकाभिमुख राहून पारदर्शकपणे कार्य करण्याची सूचना अग्रवाल यांनी केली.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत काल भाजप नेते विनोद तावडे प्रमुख
वक्ते होते, मात्र त्यांचं येणं रद्द झाल्यानं, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपेंद्र कुलकर्णी यांनी दुसरं पुष्प गुंफलं. यावेळी
त्यांनी प्रल्हाद अभ्यंकर यांच्या कार्याला उजाळा दिला. आज या व्याख्यानमालेत अभिनेते
मकरंद अनासपुरे यांचं ‘अभिनयातून उमगलेल्या सामाजिक जाणिवा’ या विषयावर व्याख्यान होणार
आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना काल नायलॉन मांजा न
वापरण्याची शपथ देण्यात आली. नायलॉन मांजा वापरल्याने शहरात अनेक दुर्घटना घडत असल्याच्या
पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम
राबवण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात
औसा तालुक्यातल्या वानवडा इथं कारमध्ये जळालेल्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी
अवघ्या २४ तासांत उलगडा केला. या घटनेत मृत असल्याचा संशय व्यक्त केला जात असलेला गणेश
चव्हाण हाच या संपूर्ण कटाचा मुख्य आरोपी असल्याचं तपासातून समोर आलं आहे. एक कोटी
रुपयांच्या टर्म इन्शुरन्सचा लाभ मिळवण्यासाठी गणेश चव्हाणने स्वतःच्याच हत्येचा बनाव
रचला. स्वतः मृत असल्याचं भासवण्यासाठी त्याने लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव या निरपराध
व्यक्तीला कारमध्ये डांबून ठेऊन कारला आग लावली. लातूर पोलिसांनी गणेशला सिंधुदुर्ग
जिल्ह्यात विजयदुर्ग इथून अटक केली.
****
राज्यात
काल सर्वात कमी आठ पूर्णांत तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं.
त्या खालोखाल पुण्यात नऊ अंश, तर नाशिक इथं साडे नऊ अंश तापमानाची नोंद
झाली. मराठवाड्यात परभणी इथं साडे दहा अंश, धाराशिव इथं ११ पूर्णांक
दोन तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment