Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 December
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज
नोएडा इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल
यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. सुतार यांनी २०० हून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी
करुन भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली.
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातल्या गोंडुर
या गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतलं.
१९५२ ते १९५८ या काळात त्यांनी आधी अजिंठा – वेरुळ इथल्या शिल्पांच्या डागडुजीचं आणि
नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्प बनवण्याचं काम सरकारी नोकरीत राहून
केलं. १९६० साली त्यांनी स्वतंत्र स्टुडिओ उभारला होता.
राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील अनेक
नेत्यांच्या मूर्त्या घडवल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक दिग्गजांच्या शिल्पांची
त्यांनी निर्मिती केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड याठिकाणीही त्यांनी साकारलेली
शिल्प उभी आहेत.
शिल्पकलेतील योगदानाबद्दल सुतार यांना १९९९ साली पद्मश्री
आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र
भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी नोएडा इथं जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.
****
जॉर्डन आणि इथियोपियाचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान
नरेंद्र मोदी काल ओमानमध्ये पोहोचले. मस्कत विमानतळावर ओमानचे उपपंतप्रधान सैयद शिहाब
बिन तारिक अल सईद यांनी मोदी यांचं स्वागत केलं. दोन्ही देशात विविध क्षेत्रातले परस्पर
सहकार्य दृढ करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारत आणि ओमान यांच्यात
आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.
****
आकाशवाणी आणि दूरदर्शननं तयार केलेले कार्यक्रम, राष्ट्रीय आणि स्थानिक आशय, तसंच शासकीय कार्यक्रम, सण-उत्सव, क्रीडा क्षेत्रांतल्या कार्यक्रमांचं
थेट प्रक्षेपण इत्यादीतून अर्थार्जन करण्यासाठी एका समावेशक धोरणाचा मसुदा सरकारनं
तयार केला आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी काल लोकसभेत
ही माहिती दिली. प्रसार भारतीच्या ओटीटी मंचावर प्रदर्शित होणाऱ्या आशयाचाही यात समावेश
आहे. तसंच, आकाशवाणी आणि दूरदर्शनची
कार्यक्षमता आणि प्रेक्षकवर्ग विस्तारण्यासाठी सरकार महत्त्वाची पावलं उचलत असल्याचंही
मुरुगन यांनी आणखी एका लेखी उत्तरात सांगितलं.
****
अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय टेरोटेरिअल आर्मीमध्ये
दाखल झालेल्या पहिल्या महिला अधिकारी लेफ्टनंट सई जाधव यांचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. सई जाधव यांनी डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमधून
प्रशिक्षण पूर्ण केलं. आय एम ए मधून ९३ वर्षानंतर पहिल्यांदाच महिला अधिकारी होऊन गौरवाचे
स्टार्स खांद्यावर लावण्याचा मान एका मराठी मुलीला मिळाला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी
अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही सई जाधव यांचं अभिनंदन केलं आहे.
****
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी येत्या शनिवारी मतदान
आणि रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या तसंच मोजणीच्या दिवशी अनुचित घटनांना आळा
घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात आणि अशा घटना घडल्या तर त्वरित कठोर कारवाई
करावी, असे निर्देश राज्य निवडणूक
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या
तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
****
राज्यात सध्या ९१ सहकारी आणि ९३ खासगी मिळून १८४ साखर
कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये ८० लाख मेट्रिक टन इतकं सर्वाधिक ऊस
गाळप पूर्ण करून पुणे विभागाने आघाडी घेतली तर ७७ लाख मेट्रिक टन गाळपासह कोल्हापूर
विभाग ऊस गाळपात दुसऱ्या स्थानी आहे.
****
अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी
पुणे पोलिसांनी उघडकीला आणली आहे. पुणे, मुंबई, गोवा आणि गुवाहाटी अशा विविध ठिकाणी कारवाई करुन सुमारे पावणेचार कोटी रुपये
किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून, पाच जणांना अटक केली आहे. खडकी पोलीस ठाण्यात नोंदलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई
केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध वाङ्गमयीन पुरस्कारांसाठी
येत्या १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याचं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे. गेल्या
वर्षभरात म्हणजेच एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेले
काव्य तसंच कथा संग्रह, कादंबरी, नाटकं, या पुरस्कारासाठी पात्र आहेत. संबंधितांनी
आपल्या साहित्यकृती छत्रपती संभाजीनगर इथल्या परिषदेच्या कार्यालयात पाठवाव्यात, असं यासंदर्भातील पत्रकात म्हटलं
आहे.
****
No comments:
Post a Comment