Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी योजना – ग्रामीण
अर्थात ‘व्हीबी जी राम जी’ या विधेयकावरच्या चर्चेला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह
चौहान लोकसभेत उत्तर देत आहेत. या योजनेची पार्श्वभूमी, सरकारने केलेल्या तरतुदी याविषयी त्यांनी माहिती देत, योजनेचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं केलेल्या आरोपांचं
खंडन केलं.
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे
पाठवण्याची मागणी केली आहे. कृषीमंत्री उत्तर देत असताना विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी
सुरु केली.
****
प्रादेशिक हवाई संपर्क योजना, ‘उडान’ अंतर्गत, भारताचं विमानतळाचं जाळं लक्षणीयरीत्या विस्तारलं असल्याची माहिती
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात
दिली. हवाई प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवण्यासाठी, तसंच सेवा नसलेल्या आणि अपुऱ्या सेवा असलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी
ही योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. २०१४ मध्ये विमानतळांची संख्या ७४ होती, ती आज १६० झाली असल्याचं नायडू यांनी सांगितलं. सरकार
या योजनेद्वारे देशभरात, विशेषतः ईशान्य आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये, हेलिकॉप्टर सेवांनाही पाठिंबा देत असून ‘उडान’ योजनेला आणखी दहा वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांनी मोठी कारवाई
करत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं. गोलापल्ली परिसरात जंगल आणि डोंगराळ भागात ही चकमक
झाली. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला
आहे. नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षादलांना मिळालेल्या या यशामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था
अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज नोएडा
इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार
वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. सुतार यांनी २०० हून अधिक भव्य
पुतळ्यांची उभारणी करुन भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून
दिली. राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील अनेक नेत्यांच्या मूर्त्या
घडवल्या. शिल्पकलेतील योगदानाबद्दल सुतार यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण
पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंही
सन्मानित करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुतार यांना श्रद्धांजली
वाहिली आहे. एक उल्लेखनीय शिल्पकार, ज्यांच्या कौशल्यामुळे भारताला स्टॅच्यू ऑफ युनिटीसह काही सर्वात
प्रतिष्ठित स्मारकं मिळाली, त्यांच्या कलाकृती नेहमीच भारताच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि सामूहिक भावनेची शक्तिशाली अभिव्यक्ती
म्हणून प्रशंसित राहतील, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
सुतार यांच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक
कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला, अत्यंत बारकाईने केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या
कलेचं वैशिष्ट्य होतं, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली. तर सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातलं एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना
व्यक्त केल्या.
दरम्यान, राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांना दूरध्वनी करून विनंती केली होती.
****
दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार
प्रज्ञा सातव यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष
रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा
झाला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या
निधोना इथल्या ऋत्विक चव्हाण याची राष्ट्रीय हॉकी संघात निवड झाली आहे. गेल्या १६ डिसेंबरपासून
बुलडाणा इथं निवड शिबीर सुरु आहे. ऋत्विक खुलताबादच्या डॉ. बी. बी. चव्हाण मिलिटरी
स्कूलचा कॅडेट आहे.
****
शेतकऱ्यांचा पारंपरिक सण ‘दर्शवेळा अमावस्या’ निमित्त लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उद्या
शुक्रवारी जिल्ह्यात स्थानिक सुटी जाहीर केली आहे. दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी शेतकरी
आपल्या शेतीशी संबंधित अवजारे, बैलजोडी आणि शेतीला पूरक असलेल्या साधनांची पूजा करतात. लातूरसह, धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातल्या काही भागात हा सण उत्साहात साजरा
केला जातो.
****
बीड इथं येत्या ३१ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान स्वर्गीय
झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानतर्फे २५ वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला
आहे. यंदाच्या महोत्सवात आठ कीर्तनं तसंच चार संगीतमय संतचरित्र कथा सादर केल्या जाणार
आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या युवास्पंदन सामाजिक
संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्थेच्या वतीनं, श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रानिमित्त १० जानेवारीला राज्यस्तरीय
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. “स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा” ही स्पर्धा राज्यभरातल्या सर्व शाळांसाठी खुली असून ७ जानेवारीपर्यंत
प्रवेश स्वीकारले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment