Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
विकसित भारत- रोजगार आणि उपजीविका हमी योजना–विधेयकावर
लोकसभेत चर्चा, कृषीमंत्री आज देणार उत्तर
·
अणु ऊर्जा विधेयक लोकसभेत संमत, २०४७ पर्यंत
शंभर गिगावॅट अणू ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य होणार साध्य
·
निवडणूक अधिनियम १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत
उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
·
माणिकराव कोकाटे पदमुक्त, क्रीडा खात्याचा
कार्यभार अजित पवार यांच्याकडे
आणि
·
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात
****
विकसित
भारत- रोजगार आणि उपजीविका हमी योजना – ग्रामीण अर्थात ‘व्हीबी जी राम जी’ या विधेयकावरच्या
चर्चेवर लोकसभेत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आज उत्तर देणार आहेत. काल रात्री
१२ वाजेनंतरही सभागृहात या विधेयकावर चर्चा सुरु होती.
हे विधेयक
२० वर्षांपूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा-मनरेगा ची जागा
घेईल. या विधेयकात मजुरांना पूर्वीच्या शंभर दिवसांऐवजी वर्षभरात किमान सव्वाशे दिवस
कामाची हमी, वेतन अदा करण्याची कालमर्यादा, आणि पारदर्शक
अंमलबजावणी यंत्रणा प्रदान करण्याची तरतूद आहे.
या विधेयकावरच्या
चर्चेत काल डीएमकेच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा,
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे, यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान
भुमरे यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवत, या विधेयकामुळे ग्रामीण
अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भक्कम कायदेशीर चौकट तयार होत असल्याचं भुमरे
यांनी नमूद केलं. ते म्हणाले..
बाईट – खासदार संदिपान भुमरे
****
अणु ऊर्जा
विधेयक काल लोकसभेने संमत केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना, प्रस्तावित
कायद्यामुळे २०४७ पर्यंत शंभर गिगावॅट अणू ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल,
असं सांगितलं. काँग्रेसने या विधेयकाला विरोध दर्शवत, या विधेयकात पुरवठादाराचं दायित्व
ठरवलं नसल्यानं देशासाठी ही बाब हानीकारक असल्याचं, मनिष तिवारी
यांनी नमूद केलं. भाजपचे अनुप धोत्रे, शिवसेनेचे धैर्यशील माने,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, निरसन आणि
सुधारणा विधेयक तसंच सबका बिमा सबकी सुरक्षा ही विधेयकं काल राज्यसभेत आवाजी मतदानाने
मंजूर झाली.
****
निवडणूक
अधिनियम १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली
आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १९६१ च्या जिल्हा परिषदा आणि पंचायत
समित्या अधिनियमानुसार नामनिर्देशनपत्रं स्वीकारणं किंवा नाकारण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या
निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होतं. मात्र अशा प्रलंबित
अपीलांमुळे निवडणूक प्रक्रिया कालबद्धरित्या घेणं शक्य होत नसल्याने, अपील करण्याची
तरतूद वगळण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
**
संरक्षित
स्मारकांवरील अतिक्रमणं रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
समिती स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं
काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढवण्यात आली असून, यामध्ये राज्य
संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्थापन होणाऱ्या
राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक
जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता
दिली.
****
राज्यातल्या
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम
बुद्धिमत्ता-एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. यावेळी ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर
सादरीकरण करण्यात आलं.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या
परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची डिजिलॉकरमध्ये
निकाल पत्रिका उपलब्ध व्हावी, यासाठी अपार आयडी नोंदणी करणं आवश्यक
आहे. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून
त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी, अशा सूचना राज्य
मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिल्या आहेत.
****
सदनिका
घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्यानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडची सर्व खाती काढून
घेण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत
यांना पाठवलेल्या पत्रातील विनंतीनुसार राज्यपालांनी कोकाटे यांच्याकडील कार्यभार काढून
घेतला असून, ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
दरम्यान, याप्रकरणी
कोकाटे यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल अटक वॉरंट जारी केलं.
कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं अटक पुढे ढकलण्याची विनंती करणारा अर्ज त्यांच्या
वकिलांनी केला, मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावत या प्रकरणाच्या
अंतिम सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर ताशेरे ओढले. कोकाटे यांनी या निर्णयला
मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, याप्रकरणी उद्या शुक्रवारी
सुनावणी होणार आहे.
विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, या प्रकरणी बोलतांना, न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नसल्याने, कोकाटे
यांची आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नसल्याचं सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर विभागात खाजगी औद्योगिक टाऊनशीप उभारण्यासंदर्भात विभागीय आयुक्त जितेंद्र
पापळकर यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. जिल्हानिहाय भूखंड उपलब्धता, शासन तसंच
लँड बँकचं मॅपीग, यासंदर्भातील विद्यमान कायदे आणि नियम यासह
विविध बाबींचा आढावा घेत, औद्योगिक टाऊनशीप विकसित करण्यासाठी
अनुभवी विकासकाचा शोध घेण्याची सूचना आयुक्तांनी केली.
****
संसदेत
विचाराधीन असलेल्या व्ही बी जी राम जी या विधेयकाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास
संस्थेचे सचिव नरहरि शिवपुरे यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले…
बाईट – नरहरि शिवपुरे
****
धाराशिव
जिल्ह्यात येडशी इथं काल एक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. जिल्हा महिला आणि
बालविकास विभाग, पोलीस विभाग, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच तसंच ग्राम बाल संरक्षण समितीच्या
सदस्यांनी समन्वयाने ही कारवाई केली. सदर बालिकेच्या पालकांचं समुपदेशन करुन त्यांच्याकडून
विवाहसंदर्भात हमीपत्र लिहून घेण्यात आलं.
****
दक्षिण
भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव
इथली खंडोबाची यात्रा आजपासून सुरु होत आहे. २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी
प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं
आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी देवस्वारी आणि पालखी पुजनाने यात्रेला सुरुवात होईल.
****
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहात विद्यापीठाचे प्र
- कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी काल उपस्थितांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाची
शपथ दिली. ऊर्जेचा विवेकी वापर, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात
ऊर्जा बचतीचं महत्त्व, डॉ महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून
विशद केलं.
****
धाराशिव
जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात भोंजा हवेली
इथं काल केळी उत्पादक शेतकरी परिसंवाद झाला. मान्यवर तज्ज्ञांनी या परिसंवादात
उपस्थितांना मार्गदर्शन केलं. केळी उत्पादकांच्या थेट बागेत जाऊन त्यांना प्रोत्साहनही
देण्यात आलं.
****
राज्यात
काल सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्या
खालोखाल अहिल्यानगर इथं साडे नऊ, नाशिक तसंच जळगाव इथं सुमारे साडे दहा, छत्रपती संभाजीनगर इथं साडे अकरा तर परभणी इथं सुमारे १२ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment