Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२३ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ शेतकरी
नेते दिवंगत चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला
जात आहे. शेतकरी, ग्रामीण विकास आणि कृषी
सुधारणांसाठी चरणसिंह यांनी आयुष्यभर समर्पित भावनेनं कार्य केलं. अन्नसुरक्षा आणि ग्रामीण विकासासाठी अखंड
परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी
समाजानं सजग राहावं, या उद्देशानं २००१ पासून
राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चरणसिंह
यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. चौधरी चरण सिंह यांनी समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी तसेच शेतीच्या प्रगतीसाठी आणि
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपले जीवन समर्पित
केलं. राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान
देश कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधांनी समाजमाध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी यांनी
राष्ट्राचं आणि पिढ्यान्पिढ्यांचं भरण-पोषण करणारे शेतकरी म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचा
कणा असून, समाजाच्या शाश्वत अस्तित्वासाठी त्यांचं
योगदान अनमोल आहे, असं आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
****
ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांना महाराष्ट्रात परत पाठवण्याला मंत्रिमंडळाच्या
नियुक्ती समितीनं मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणून ते कार्यरत
होते. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात
आहे. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण
होणार आहे.
****
राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया
आजपासून सुरू होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.
दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची
यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी
रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी
होणार आहे.
या पार्श्वभूमीवर काल छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेच्या
वतीनं पत्रकार परिषदा तसंच बैठका घेऊन, निवडणूक कार्यक्रमाची
माहिती देण्यात आली.
****
राज्यातल्या विजयी नगराध्यक्ष आणि
नगरसेवकांचं दोन दिवसांचं शिबीर पुण्यात यशदा इथं घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. पुण्याजवळच्या
फुरसुंगी उरुळी देवाची इथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात
आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं त्यांनी
अभिनंदन केलं. या निकालाने सर्वांची जबाबदारी वाढल्याचं पवार म्हणाले.
****
नंदुरबार नगरपरिषदेच्या नवनियुक्त
नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेच्या रत्ना रघुंवशी 11 हजार 110 मतांनी नगराध्यक्ष पदी निवडून आल्या
आहेत. तर पालिकेत 41 पैकी 29 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून
आले आहेत.
****
यावर्षी आतापर्यंत देशात ५८० लाख
हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा
सुमारे ८ लाख हेक्टर जास्त आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं या महिन्याच्या १९ तारखेपर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीच्या
प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला. गेल्या वर्षी याच कालावधीतील तीन लाख हेक्टरच्या तुलनेत
यावर्षी ३०१ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर गहू पेरण्यात आला असल्याचं मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. १२६ लाख हेक्टरमध्ये
डाळींची लागवड आहे, तर भात लागवडीत १३ लाख
हेक्टरपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
****
1 एप्रिल 2026 पासून प्राप्तिकर विभागाला नागरिकांचे सोशल मीडिया, ई-मेल आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर
थेट प्रवेशाचा अधिकार मिळणार असल्याचा दावा समाजमाध्यमांवरील संदेशात करण्यात येत आहे.
हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं स्पष्ट
केलं आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्येच शोध कारवाईदरम्यान
या तरतुदी लागू होतात. सामान्य करदात्यांच्या खासगी डिजिटल माध्यमांसाठी या तरतुदी
नसल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे.
****
18 ते 22 डिसेंबर या कालावधीत मुंबई सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई
करत अंमली पदार्थ जप्त केले आहेत. बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून सुमारे 35 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात
आला, ज्याची अंदाजे किंमत 35 कोटी रुपये आहे. तसंच मस्कतहून आलेल्या एका प्रवाशाकडून
81 ग्रॅम अँफेटामाइन्स जप्त करण्यात
आलं, ज्याची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. याशिवाय, विशिष्ट माहितीच्या आधारे बँकॉकहून
आलेल्या प्रवाशांकडून 13 कोटी रुपयांचे अंमल
पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका
यांच्यादरम्यान टी-ट्वेन्टी मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे.
संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं
जिंकला आहे.
****
No comments:
Post a Comment