Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान
·
प्राचीन ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड
घातल्यास भारत पुन्हा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो-मुख्यमंत्र्यांकडून
विश्वास व्यक्त
·
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप-महत्त्वाची पाच विधेयकं
संमत
·
नांदेड जिल्ह्याच्या माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर-पशूप्रदर्शनाला
मोठा प्रतिसाद
आणि
·
१९ वर्षाखालीत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत
पाकिस्तान अंतिम लढत
****
राज्यातल्या
२३ नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
झाली असून कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध
जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे, दोन डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक
आयोगानं पुढे ढकललेलं हे मतदान आज होत आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सर्व मतदानाची
उद्या मतमोजणी रविवारी होणार आहे. या निवडणुकीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..
मराठवाड्यातल्या
फुलंब्री, मुखेड,
धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, या
नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. याशिवाय राज्यात विविध जिल्ह्यातल्या ७६ नगरपरिषदा आणि
नगरपंचायतींमधल्या १५४ सदस्य पदांसाठीही आज मतदान होणार आहे. यामध्ये छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या तीन,
तर वैजापूर तसंच गंगापूर
इथल्या दोन जागा, नांदेड जिल्ह्यात
भोकर, लोहा
आणि कुंडलवाडी इथल्या प्रत्येकी
एक तसंच बीड जिल्ह्यात परळी आणि
अंबाजोगाईतील प्रत्येकी चार तर बीड आणि धारूरमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
****
राज्य निवडणूक
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक तयारीचा आढावा
घेतला. मतदान प्रक्रियेसाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिका
आयुक्तांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी
पोलीस यंत्रणेसोबत प्रभावी समन्वय साधावा, अशा सूचनाही वाघमारे यांनी दिल्या.
****
महानगरपालिकांमध्ये
महायुती म्हणून लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
यांनी मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही
प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीबाबत
निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
****
प्राचीन
ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील
वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. भारत हा नवनिर्मितीचा
मूळ स्रोत असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले…
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कृत्रीम
बुद्धिमत्ता-एआयमुळे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व
करण्याची क्षमता भारतात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. ५४ आफ्रिकी देशांसाठीची
एक भव्य इमारत मुंबईत लवकरच उभारली जात असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी
उद्योजकांना आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आफ्रिकेत उत्पादन सुरू
झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचं नेतृत्वही भारत करेल,
असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
सदनिका
घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास मुंबई
उच्च न्यायालयानं काल नकार दिला. वैद्यकीय कारणास्तव कोकाटे यांची अटक न्यायालयानं
पुढे ढकलली. त्यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर
केला आहे.
****
संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला, लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज अनिश्चित
काळासाठी तहकूब झालं. या अधिवेशनात लोकसभेच्या १५ बैठका होऊन १११ टक्के कामकाज झाल्याची
माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. तर ९२ तास कामकाज झालेल्या राज्यसभेत या सत्राची
उत्पादकता १२१ टक्के राहिल्याची माहिती सभापती सी पी राधाकृष्णन् यांनी दिली. राज्यसभेचे
सभापती या नात्याने आपलं पहिलंच अधिवेशन होतं असं सांगून उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी
वरीष्ठ सदनाचे उपसभापती, तालिका सदस्य, सभागृह नेते, आणि विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानतानाच,
कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासाठी सर्व सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान,
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकंदर झालेल्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा…
एक डिसेंबर
पासून सुरु झालेल्या या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम् गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी
वर्षानिमित्त चर्चा झाली, तसंच निवडणूक
सुधारणा विषयावरही सविस्तर झाली. रोजगार, विमा क्षेत्रातल्या
सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ही सखोल चर्चा दोन्ही
सदनात पार पडल्या. महत्त्वाची पाच विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. त्यात विकसित
भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक, तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकाचा
समावेश आहे.
****
दरम्यान, राज्यसभेत
व्हीबी जी राम जी विधेयकावरील चर्चेदरम्यान झालेल्या गदारोळाप्रकरणी भाजपने आठ खासदारांविरोधात
हक्कभंग नोटीस दिली. काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या
खासदारांचं सभागृहातलं वर्तन लोकशाहीसाठी लाजीरवाणं असल्याचं भाजप खासदार निशिकांत
दुबे यांनी म्हटलं आहे, या खासदारांना कामकाजात सहभागी होऊ देऊ
नये, अशी मागणी त्यांनी केली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत कालपासून आरोग्याचा जागर करण्यात येत आहे. या यात्रेच्या
पार्श्वभूमीवर काल जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबीर
भरवण्यात आलं आहे. कंधार-लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या
प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे आरोग्य प्रदर्शन आणि तपासणी शिबीर २५ डिसेंबर
पर्यंत भाविकांसाठी खुलं राहणार आहे. दरम्यान, या यात्रेत पशू प्रदर्शनात देशभरातून
विविध जातींचे घोडे दाखल झाले असून घोडेबाजारात मोठी उलाढाल होत आहे. पशुप्रदर्शन स्पर्धेत
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील उजळंब इथले शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी
जातीच्या वळूंनी एक वर्षाखालील गटात प्रथम तर एक वर्षावरील गटात दुसरा क्रमांक पटकावला.
****
छत्रपती
संभाजीनगर हे आगामी काळात इलेक्ट्रीक वाहन उद्योगाचं केंद्र म्हणून ओळखलं जाईल, असा विश्वास,
अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर
इथं एसएफएस शाळेच्या मैदानावर महाराष्ट्र ट्रेड फेअर या भव्य प्रदर्शनाचं सावे यांच्या
हस्ते काल उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात आलेल्या
मोठ्या उद्योगांचा सावे यांनी आढावा घेतला.
****
मराठवाड्याच्या
अनेक गावांत काल वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह बीड तसंच
सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागात हा सण उत्साहात साजरा होतो. काळ्या मातीप्रती कृतज्ञता
व्यक्त करणाऱ्या या सणात वनभोजनाचं विशेष महत्त्व आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं आपल्या शेतावर कुटुंबीयांसह पारंपरीक पद्धतीने
वेळा आमावस्या साजरी केली.
****
१९ वर्षांखालील
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे. या
दोन्ही संघांनी काल उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या उपांत्य
सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं
दिलेलं १३९ धावांचं आव्हान भारताने दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं. विजयाचे शिल्पकार
ठरलेले एरॉन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा या दोघांना सामनावीर पुरस्कार विभागून देण्यात
आला. दुसऱ्या उपांत्य फेरीचे सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव
केला.
****
भारत आणि
दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेत कालचा शेवटचा सामना भारताने ३० धावांनी
जिंकून ३-१ अशा फरकानं मालिकाही जिंकली. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या
सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर २३१ धावांचं आव्हान ठेवलं.
मात्र पाहुणा संघ निर्धारित षटकांत २०१ धावाच करू शकला. १६ चेंडूत अर्धशतक करणारा हार्दिक
पांड्या सामनावीर तर मालिकेत दहा बळी घेणारा वरूण चक्रवर्ती मालिकावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला.
****
ईडी अर्थात
सक्तवसुली संचालनालयानं क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि
कलाकार उर्वशी रौतेला, सोनू सूद, मीमी चक्रवर्ती,
अंकुश हाजरा आणि नेहा शर्मा यांची सुमारे आठ कोटींची संपत्ती जप्त केली
आहे. अवैध बेटिंगप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली. या सर्वांनी या बेटिंग कंपन्यांची जाहिरात
केली होती.
****
राज्यात
काल सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं.
त्या खालोखाल नाशिक इथं सात पूर्णांक चार, पुण्यात आठ पूर्णांक तीन तर साताऱ्यात
दहा अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं साडे आठ अंश, तर छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment