Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२१ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून
दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या
हस्ते नामरूप येथे १२ हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचे उद्घाटन होणार
आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहे. त्याशिवाय ब्रह्मपुत्र नदीत जहाजातून
प्रवास करत पंतप्रधान स्थानिक शाळांमधील २५ विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार
आहेत. त्यानंतर गुवाहाटीतल्या पश्चिम बोरागाव इथं नव्याने उभारण्यात आलेल्या शहिद स्मारक
क्षेत्राला भेट देणार आहेत.
प्रधानमंत्र्यांनी काल पहिल्या दिवशी
गुवाहाटीत लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल
इमारतीचं उद्घाटन केलं. जवळपास सव्वा कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेली ही
इमारत एक लाख चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे. उद्घाटनानंतर जाहीर सभेला
संबोधित करताना, केंद्र सरकार आसामच्या
विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगून गेल्या ११ वर्षात राज्यात अनेक पायाभूत सुविधा
प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत असं ते म्हणाले.
****
नवभारत म्हणजे आर्थिक सुधारणांचा
आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. मुंबई
इथं वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये ते म्हणाले की, आज मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी, ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन नाही.
शतकानुशतके आपण वसुधैव कुटुंबकम् या तत्वज्ञानानं जगत आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आज भारतानं सन्मान, विश्वास आणि जागतिक पात्रता मिळवली
आहे, असंही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्री गोयल यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. कालचं
२३ नगरपरिषदा-नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या १४३ पदांसाठी झालेलं मतदान
तसंच गेल्या दोन डीसेंबर रोजी झालेलं मतदान अशा , एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची
मतमोजणी होत आहे. या प्रक्रियेसाठी संबंधीत ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात
करण्यात आला आहे. साधारणपणे दुपारी चार वाजेनंतर स्पष्ट निकाल समोर येण्याची शक्यता
आहे.
***
चिनमध्ये हांगचोओ इथं आयोजित जागतिक
बॅडमिंटन टूर अंतिम स्पर्धेत काल रात्री भारताच्या
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत कांस्य पदक पटकावलं.या जोडीला उपान्त्य सामन्यात
चिनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांनी हरवलं.
***
भारत-श्रीलंका महिला क्रिकेट टी-ट्वेंटीच्या
पाच सामन्यांच्या मालिकेत आज पहिला सामना विशाखापट्टणम इथं सायंकाळी सात वाजता सुरु
होणार आहे.
***
नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये यंदाच्या
हंगामातील सर्वात कमी म्हणजेच चार पुर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची
नोंद झाल्याची माहिती कुंदेवाडीतील कृषी संशोधन केंद्रानं दिली आहे. दरम्यान,आजही मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची
शक्यतास हवामान विभागानं वर्तवली आहे.
***
१९ वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक
एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतल्या, भारत-पाकिस्तान दरम्यान
अंतिम सामन्याला थोड्यावेळेपूर्वी प्रारंभ झाला.संयुक्त अरब अमीरातच्या दुबईत सुरु
असलेल्या या सामन्यात,भारतानं नाणेफेक जिंकून
प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानच्या चौथ्या षटकाच्या
तिस-या चेंडुवर एक बाद ३१ धावा झाल्या आहेत.
***
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक
संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित अकराव्या राष्ट्रीय कला उत्सवाला काल पुणे
इथं प्रारंभ झाला. या महोत्सवात ३७ राज्यातून ९१८ विद्यार्थी, १०८ शिक्षक सहभागी झाले आहेत. एकूण
बारा कला प्रकारांच्या स्पर्धा यात होत आहे. दरम्यान, पुणे इथं आयोजित पुस्तक महोत्सवाचा आज समारोप होत आहे.
आतापर्यंत सुमारे सात लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी याला भेट दिली आहे. या महोत्सवात, अटलजी : एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं
प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment