Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 13
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
अनुकंपा तत्त्वावरील १५ वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या
सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आज केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज
आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील २८९ कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ
वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते, यावेळी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित
होते.
अनुकंपा तत्वावरील एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशी
व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबर २०२६ पर्यंत
यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल असा
विश्वासही त्यांनी यावेळी दिला. यवतमाळ जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करु असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरमच्या विकासात योगदान
देणाऱ्या,
नऊ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या महत्वकांक्षी योजनांचा
दृरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आज सकाळी शुभारंभ केला. या योजनांद्वारे
मिझोरमच्या रेल्वे, रस्ते, ऊर्जा
आणि क्रिडा क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे. दरम्यान, मणिपूर
आणि आसाममधील विविध विकास कामांची कोनशीला तसंच लोकर्पणही आज पंतप्रधानांच्या
हस्ते झालं.
****
नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नवीन अंतरिम
सरकार स्थापन झाल्यानंतर भारतानं स्वागत केलं आहे. अंतरिम सरकार स्थापन झाल्यामुळं
नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य वाढेल,
जवळचा शेजारी, लोकशाही देश आणि
दीर्घकालीन विकास भागीदार म्हणून भारत दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि
समृद्धीसाठी नेपाळसोबत जवळून काम करत राहील, असं
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण इथं पंचायत समिती
कार्यालयात तालुक्यातील ग्रामीण भागातले रस्ते, गाडीवाट, पायवाट तसंच शेतात जाणारे मार्ग या सर्वांचं सीमांकन करण्याबाबत तालुकास्तरीय
आढावा बैठक पार पडली. यात शासनाच्या सर्व संबंधित कार्यालयांना विशेष सूचना
देण्यात आल्या असून, त्यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना शेतात
जाणं-शेतमाल वाहतूकीसाठी विनाअडथळा रस्ते उपलब्ध करून देण्याचं सूचित करण्यात आलं
आहे.
दरम्यान, पैठणसाठीच्या विविध योजना
आणि प्रलंबीत विकासकामांबात शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी अंकीत यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. पायाभूत सुविधा, शिक्षण,
आरोग्य, जलसंधारण, शेती,
महिला आणि बालकल्याण या क्षेत्रांतील मुद्द्यांवर या बैठकीत
आढावा घेण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाला
आहे. पूर्णा तालुक्यातील ढोणे पांगरा इथल्या शाळेत पावसाचं पाणी शिरलं, दरम्यान,
नागरिक आणि शिक्षकांच्या सतर्कतेनं विद्यार्थ्यांना सुखरूप
बाहेर काढण्यात आलं आहे. पुर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचं काम चालू असून
यंत्रावर काम करताना थूना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये चौघेजण अडकले होते. जिल्हा
प्रशासनाच्या पथकानं पुरात अडकलेल्या या कामगारांना सुखरूप वाचवलं.
****
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात भटक्या कुत्र्यांना
पकडण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची
दहशत निर्माण झाली असून दोन दिवसांपूर्वी चौबारा परिसरात कुत्र्यांच्या समुहानं
व्यापाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली होती. स्थानिकांच्या
मागणीनंतर नगरपालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
****
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील
सिंगणापूर,
पिंगळी, परभणी ग्रामीण, पूर्णा,
ताडकळस, कात्नेश्वर, पालम,
बनवस, पेठशिवणी या नऊ मंडळात
जोरदार पाऊस झाला असून कात्नेश्वर मंडळात सर्वाधिक १४७ पुर्णांक ५ अंश सेल्सियस
अतिवृष्टी झाली.
****
पुणे - अमरावती - पुणे या साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी आगामी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात येणार आहे. दौंड, अहमदनगर,
कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव,
मलकापूर, शेगाव, अकोला,
भुसावळ, मुर्तिजापूर आणि बडनेरा या
स्थानकावर विशेष रेल्वेचे थांबे असतील.
सात ऑक्टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष रेल्वेच्या
फेऱ्या होणार आहेत. याकाळात प्रत्येक मंगळवारी पुण्याहून सायंकाळी सात वाजून ५५
मिनिटांनी ही गाडी सुटेल आणि अमरावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून पाच
मिनिटांनी पोहोचेल. तर, प्रत्येक बुधवारी अमरावती
इथून दुपारी बारा वाजता सुटून पुणे इथं दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाबारा वाजता ही
गाडी पोहोचेल.
****
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीनं आज
सकाळी उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या चेन चेंग कुआन आणि लिन बिंग-वेई यांचा २१
विरुद्ध १७,
२१ विरुद्ध १५ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष
एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा सामना चायनीज तैपेईच्या चाऊ तीएन-चेनशी
होईल.
****
No comments:
Post a Comment