Monday, 10 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसद सदस्यांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींनी काल अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लोरन्को यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली. जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत, अंगोलासमवेत संसदीय सहकार्य वृद्धिंगत करण्याची आशा बाळगत असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या.

****

'सहकारिता कुंभ २०२५' या शहरी सहकारी कर्ज क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. हा दोन दिवसांचा कार्यक्रम राष्ट्रीय शहरी सहकारी बँक आणि कर्ज संस्था महासंघ तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयानं संयुक्तरित्या आयोजित केला आहे. स्वप्नांचं डिजिटलीकरण - समुदायांचं सशक्तीकरण हा या संमेलनाचा विषय आहे. नवोन्मेष आणि सामायिक दृष्टिकोनाद्वारे समुदायांना सक्षम बनवणं आणि देशातल्या आर्थिक समावेशनाचा सहकारी पाया मजबूत करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

****

भारतातून आणल्या गेलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं आदरयुक्त भावनेनं स्वागत केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या जनतेची आणि नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. भगवान बुद्धांचे हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्द याचा कालातीत संदेश देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भगवान बुद्धांची शिकवण हा भारत आणि भूतान यांच्यातल्या सामायिक अध्यात्मिक वारशाचा पवित्र दुवा असल्याचं यात म्हटलं आहे.

****

देशभरातल्या आठ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची मुदत काल संपली. जम्मू आणि काश्मीरमध्ये बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमध्ये आंता, झारखंडमध्ये घाटसिला, तेलंगणामध्ये ज्युबिली हिल, पंजाबमधे तरनतारन, ओदिशामधे नुआपाडा आणि मिझोराममधे डम्पा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणीही बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच १४ नोव्हेंबरला होणार आहे.

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला, तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महा मेट्रोला हरियाणामधील गुरुग्राम इथं झालेल्या १८व्या अर्बन मोबिलिटी इंडिया या राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महा मेट्रोनं केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाची, नाविन्यपूर्ण प्रदर्शनाची आणि माहितीच्या प्रभावी प्रसारणाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी इटलीमधल्या रोम इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचं वितरण होणार आहे. महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी या यशाचं श्रेय जनसंपर्क विभाग आणि त्यांच्या सांघिक कामगिरीला दिलं असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जनसंपर्क विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

****

६७ व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्घाटन काल पुण्यात ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि प्रसार भारती यांच्यावतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात विदुषी ज्योती हेगडे यांचं रुद्रवीणा वादन, पंडित मोहन श्याम शर्मा यांचं पखवाज वादन तसंच विजयकुमार गायकवाड आणि सहकाऱ्यानी सादर केलेल्या मराठी लोकसंगीताच्या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या २०२५च्या कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात, या क्रीडा प्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सवाई पद्मनाभ सिंह आणि कर्णधार सिमरन सिंह शेरगिल यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघानं उत्तम कामगिरी केली.

****

इजिप्तमध्ये सुरु असलेल्या आयएसएसफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भानवाला याने रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक पिस्तुल प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 January 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती स...