आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 30 October 2018
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.10.2018 07.10AM
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा
निर्णय गुरुवारपर्यंत लांबला
v मत विभाजनाची जाणीव असल्यामुळे शिवसेना- भाजप युती कायम- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
v दुष्काळसदृश ग्रामीण भागातल्या
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाचा मोफत प्रवास सवलत पास
आणि
v चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २२४
धावांनी दनदनित विजय
*****
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी
सोडण्याचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबला आहे. पाणी सोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात
याचिका दाखल झाली असून या याचिकेवरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पाणी न सोडण्याचा निर्णय
प्रशासकीय यंत्रणेनं घेतला. यामुळे गंगापूर- दारणा आणि पालखेड धरणातूल आजपासून पाणी
सोडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून पाणी
सोडण्याचा निर्णयही प्रशासनानं काल स्थगित केला. या धरणातून एक हजार नऊशे दशलक्ष घनफूट
पाणी काल जायकवाडीसाठी सोडण्यात येणार होतं, मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन
पाणी सोडू शकलं नाही.
निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये, या
मागणीसाठी अकोले तालुक्यातले शेतकरीही प्रवरा नदीच्या पुलावर दोन दिवसांपासून ठिय्या
आंदोलन करत आहेत. या मागणीसाठी अकोले शहरातही शेतकऱ्यांनी काल मोर्चा काढला.
****
शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती तुटली तर मतं विभाजित
होतील, या वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं युती कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल
बोलत होते. सरकार सकारात्मकतेनं, सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असताना, सरकारला
पुरेसा वेळ न देता फक्त राजकीय हेतूनं आंदोलनं करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी
राज्यात सुरू असलेल्या काही आंदोलनांच्या संदर्भात म्हटलं. स्वत:च्या कार्यकाळात कोणतंही
काम न करता, काम करणाऱ्या सरकारला अडवण्याचं, विरोधी पक्षांचं धोरण चुकीचं असल्याचं
ते म्हणाले. धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नसून, तो केंद्र सरकारला आहे,
राज्य सरकार यासंदर्भात योग्य ती शिफारस केंद्राला करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण आणि समन्वयासाठी एक स्वतंत्र
कक्ष निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव
लोणीकर यांनी काल मुंबईत दिली.
राज्यात
यावर्षी काही जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. सध्या काही
जिल्ह्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या
पाण्याच्या टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसाठी स्थायी आदेशाद्वारे
संबंधित यंत्रणांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत, असं लोणीकर यांनी सांगितलं.
****
राज्यात
निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन
महामंडळानं ग्रामीण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उर्वरीत
शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
दुष्काळसदृश म्हणून घोषित झालेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत असल्याचं, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. ही संपूर्ण सवलत एसटी
महामंडळामार्फत देण्यात येणार असून त्यासाठी महामंडळावर साधारण ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त
बोजा पडणार आहे. राज्यातल्या साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ
मिळेल, असे रावते यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारचे कर्मचारी तसंच अन्य पात्र कर्मचाऱ्यांचा १ जानेवारीपासून थकित तीन टक्के
महागाई भत्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात रोखीने देण्याचा आदेश काल जारी
करण्यात आला. एकूण ९ महिन्याची ही थकबाकी आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती
नरेश पाटील यांनी काल शपथ घेतली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी
त्यांना शपथ दिली.
****
राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना काल मुंबईत, प्रसिद्ध पार्श्वगायिका
पुष्पा पागधरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, शाल, मानपत्र, मानचिन्ह
अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
काँग्रेस पक्षानं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा काल
जालना जिल्ह्यात पोहोचली. मंठा इथं काल झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात
दिलेल्या आश्वासनाची सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जालना
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी परभणी जिल्ह्यात ही जनसंघर्ष यात्रा फिरली. सकाळी परभणीत
तर दुपारी पाथरी इथं जाहीर सभा घेण्यात आल्या. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा,
यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचं नमूद करत, महागाईनं त्रस्त
झालेल्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस
पक्ष उभा आहे, असं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितलं.
****
उन्हाळ्यातला पाणीटंचाईचा कालावधी लक्षात घेऊन नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी, नांदेड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांमधला,
पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा, पिण्यासाठी आरक्षित केला. कदम यांच्या
अध्यक्षतेखाली पाणी आरक्षणाबाबत जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली, त्यावेळी पालकमंत्र्यांनी
हा निर्णय घेतला.
या बैठकीनंतर पालकमंत्री कदम यांनी बिलोली तालुक्यातल्या केरुर गावाला
भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
येत्या दोन महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने
पाच हजार शेततळी तयार करण्याचं उद्दीष्ट ठेऊन सर्वांनी अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचे
निर्देश विभागीय आयुक्क डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दिले आहेत.
टंचाईसदृश्य परिस्थिती नियोजनासंदर्भात काल झालेल्या
आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना
राबवण्याकरता तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयानं
नियोजनपूर्वक कामं करण्याची सूचनाही डॉ. भापकर यावेळी केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींबाबत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रकुलगुरू
अशोक तेजनकर यांना काल एक निवेदन सादर केलं. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असून,
विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित काम
देण्यात यावं, वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, यासह विविध
मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
****
भारत - वेस्ट इंडिज यांच्यात काल मुंबईत झालेला चौथा
एकदिवसीय क्रिकेट भारतानं २२४ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिज
संघासमोर विजयासाठी ३७८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ
३७ व्या षटकात १५३ धावांवर सर्वबाद झाला. खलील
अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी
एक बळी घेतला. १६२ धावा झळकावणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाच सामन्यांच्या या
मालिकेत, भारतानं दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना येत्या गुरुवारी
तिरुवअनंतपुरम इथं होणार आहे
****
राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दर तीन वर्षांनंतर
मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यात या महत्त्वाकांक्षी अभियानाची
अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातल्या डावरगावचे या योजनेचे
लाभार्थी एकनाथ भांडे यांनी मृद आरोग्य पत्रिकेद्वारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
केल्यानं त्यांच्या पीक उत्पादकतेत वाढ झाली आहे. ते म्हणाले…
माझ्याकडे
१२ एकर शेती आहे. मी माझ्या शेतातली मातीचे परिक्षण करून घेतले. शेत जमीनीची भौतिक
आणि रासायनिक तपासणी केल्या नंतर पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढण्यात
आले. त्यानूसार आवश्यक असणारे शेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पूरवठा
एकात्मिक पध्दतीने जमीनस दिल्या मुळे माझ्या शेतमालाचे उत्पादन वाढले आणि माती आरोग्य
तपासणी अभियानांतर्गत जमीनीची प्रतवारी तपासल्यामुळे शेती फायद्याचे होऊ लागली आहे.
यामुळे मी प्रधानमंत्री कृषी पत्रिका अहवाल दिल्या प्रकरणी आभार मानतो.
****
लातूरमधल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी मृत्यू
प्रकरणातल्या आरोपीला मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी आमदार डॉ निलम गोऱ्हे यांनी
केली आहे. राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीनं महिला विषयक कायद्यांसंबधी
एक दिवसीय कार्यशाळा काल लातूर इथं घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपानंतर त्या
वार्ताहरांशी बोलत होत्या. कल्पना गिरी प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण – सी
बी आय करत असून हा खटला लवकर चालवावा असं, जामीनावर असलेला या खटल्यातल्या आरोपी आपल्याला
दूरध्वनीवरून सांगत असतो, याबाबत आपण पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली असल्याचं डॉ.गोऱ्हे
यांनी सांगितलं.
*****
***
Monday, 29 October 2018
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.10.2018 13.00
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
29 October 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२९ ऑक्टोबर २०१८
दुपारी
१.०० वा.
****
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ
देण्याला नकार देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला, सर्वोच्च न्यायालयानं
आज स्थगिती दिली. यासंदर्भात राज्यशासनानं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं
ही स्थगिती दिली असून, या प्रकरणातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली
आहे. मुंबई उच्च न्यायालयानं, या प्रकरणातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यां विरोधातला
तपास अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांना जास्त वेळ घेण्याची अनुमती देण्याचा, कनिष्ठ
न्यायालयाचा निर्णय नुकताच रद्द केला होता. राज्य पोलिसांनी पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना
केलेल्या अटकेमध्ये दखल देण्याला, तसंच त्यांच्या अटके संदर्भात विशेष तपास पथक स्थापन
करण्याच्या मागणीलाही सर्वोच्च न्यायालयानं
याआधीच नकार दिला आहे.
****
अयोध्येतल्या राम
जन्मभूमी-बाबरी मशीद विवादातल्या जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातल्या, सर्वोच्च न्यायालयात
दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात
आली आहे.या याचिकांची तत्काळ सुनावणी घेणार नसल्याचं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.
****
भारतात उद्योग उभारण्यासाठी
कमी पैशात मनुष्यबळ उपलब्ध असतं आणि भांडवलही कमी लागतं, यासाठी उद्योजकांनी भारतात
गुंतवणूक करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज टोक्यो इथे
मेक इन इंडिया चर्चासत्रात बोलत होते. ईझ ऑफ डुईंग बिझिनेस धोरणासह अन्य धोरणांमुळे
थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारत ही सगळ्यात खुली अर्थव्यवस्था असल्याचं नमूद करत, वर्ल्ड
इकॉनॉमिक फोरमच्या ताज्या यादीत भारताचं स्थान एकतीस क्रमांकांनी वर आल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं.
****
गुजरातमध्ये नर्मदा
नदीवरच्या सरदार सरोवरा समोर उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी - देशाचे पहिले
गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्या भोवती व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अर्थात
वैविध्यपूर्ण फुलांचं उद्यान बनवण्यात येणार आहे. गुजरात सरकारचा वनविभाग या परिसरात
शंभरहून जास्त प्रजातींचे वृक्ष, वनस्पती आणि हिरवळ लावणार आहे. जगातला सर्वात उंच
पुतळा ठरलेल्या, सरदार पटेल यांच्या या पुतळ्याचं येत्या परवा एकतीस तारखेला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज यांची आज पन्नासावी पुण्यतिथी आहे. अंधश्रद्धा आणि जातिभेद निर्मूलनासाठी खंजिरी
भजन आणि कीर्तनाचा तुकडोजी महाराजांनी प्रभावी वापर केला. भारत हा खेड्यांचा देश असल्यानं,
ग्रामविकास झाला तर राष्ट्रविकास होईल, अशी विचारसरणी असलेल्या आणि विश्वबंधुत्वाचा
संदेश देणाऱ्या या राष्ट्रसंताचं समाजाच्या सर्वच स्तरातून आज स्मरण केलं जात आहे.
****
बुलडाणा जिल्हयाच्या
खामगाव शहरात डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. यासंदर्भात झालेल्या
सर्वेक्षणात शहरातल्या ४८१ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली. डेंग्यूचा प्रसार होऊ
नये, यासाठी या परिसरात आरोग्य विभागानं डास निर्मुलनासह विविध उपाययोजना सुरू केल्या
आहेत.
****
मोफत आणि सक्तीच्या
शिक्षण कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, या आणि इतर मागण्यांसाठी राज्य शिक्षण
संस्था महामंडळ आणि सर्व शिक्षक संघटनांच्या औरंगाबाद विभाग शैक्षणिक व्यासपीठाच्या
वतीनं, येत्या दोन नोव्हेंबरला शैक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. पात्र शाळांना नियमानुसार
१०० टक्के अनुदान देण्यात यावं, सुधारित शिक्षकेतर आकृतीबंध लावण्यात यावा, सर्व विद्यार्थ्यांना
सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देऊ
नये, आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
****
देशभरात आजपासून
दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जनसामान्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा वाढावा,
असा उद्देश यामागे असून, भ्रष्टाचाराचं निर्मूलन, नवभारताची निर्मिती, अशी या सप्ताहाची
संकल्पना आहे. शासनाचे विविध विभाग, बँका आणि इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचार
विरोधी प्रतिज्ञेनं या सप्ताहाची सुरुवात होत आहे.
****
भारत - वेस्ट इंडिज
एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला, चौथा सामना आज मुंबईत ब्रेबॉर्न क्रीडा संकुलावर होणार
आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत, उभय
संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून, एक सामना बरोबरीत सुटला आहे.
*****
***
Subscribe to:
Posts (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...