आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 29 September 2019
Saturday, 28 September 2019
Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.09.2019....Evening Bulletin
Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –28
September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
सैन्यदलानं जम्मू - किश्तवार राष्ट्रीय महामार्गावर बाटोटे भागातील चकमकीमध्ये
तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. लष्कराचा एक जवान यात शहीद झाला आहे. सुमारे नऊ तास
चाललेल्या या चकमकीनंतर आता या भागातील शोध मोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराच्या
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. शोध मोहीम हाती घेतलेल्या लष्कराच्या धडक कृती दलावर
दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे
काका शरद पवार यांचा संबंध नसताना त्यांचं नाव घेतलं गेल्यामुळे अस्वस्थ झाल्यानं आमदारकीचा
राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्यांनी
काल संध्याकाळी आमदारकीचा राजिनामा दिला होता. पवार कुटुंबीयांमध्ये मतभेद असल्याचा
त्यांनी यावेळी इऩ्कार केला. या पत्रकार परिषदेवेळी भावनाविवश झालेल्या अजित पवार यांनी
राज्य सहकारी बँकेमधील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धच्या
आरोपांबद्दल प्रश्र्न उपस्थित केले.
****
दरम्यान, सरकार सुडबुध्दीचं राजकारण करीत असल्याचं शऱद पवार यांचं म्हणणं चुकीचं
आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी
केली आहे. ते आज नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शिखर बॅँकेतील घोटाळ्या संदर्भात
उच्च न्यायलयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती आणि त्यात शरद पवार यांचं नाव
असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अन्वयेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही
भंडारी यांनी दिली.
****
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई चुकवण्यासाठी
भाजपत आल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी शनिवारी
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोडून काढला आहे. त्यांच्या मतदार संघातील मतदार भाजपला
अनुकूल झाले आणि त्यांच्या रेट्यामुळेच ते भाजपत दाखल झाले असं सहस्रबुद्धे यांनी यावेळी
म्हटलं.
****
युतीची घोषणा येत्या दोन दिवसांत होईल अशी माहिती, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे
यांनी आज दिली. ते मुंबईत जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. युतीबाबत भाजप नेते
अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी सुरु आहे, काही जागांवर कोण जिंकू शकेल याबाबत
चाचपणी सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला
बसवायचं आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
****
भाजपच्या भंडारा जिल्ह्यातील एका आमदाराला महिला पोलिस अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी
आज अटक करण्यात आली आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी गेल्या १६ तारखेला कार्यकर्त्यांना
बांधकाम साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान केला होता, अशी
माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्यक्रमादरम्यान तिथं बंदोबस्तासाठी असलेली महिला अधिकारी
आणि आमदारांदरम्यान शिवराळ भाषा वापरल्यामुळं शाब्दिक चकमक उडाली होती.
****
पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण
वाढल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. ते आज औरंगाबाद
इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत अरूण साधू व्याख्यानमालेत ‘आजची माध्यमं आणि राजकारण’
या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. समाजाला जोडण्याचं आणि समाजातील विविध प्रश्नांना
वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी
म्हटलं. यावेळी खासदार तसंच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षावर
तीव्र टीका केली. चुकीचा इतिहास लिहला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा आज नोंदवण्यात आला आहे. जिंतूर तालुक्यातील
मौजे कोरवाडी इथं आमदार विजय माणिकराव भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक
सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला होता. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख
टी. व्ही. ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी पाहणी केली होती. ग्रामसेवक संदीप
बारवे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बाविसावा दीक्षान्त समारंभ
आज झाला.
मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांसदर्भात युवकांनी बदल घडवण्याचं आवाहन मुंबईच्या
भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीचे संचालक शुभाशिस चौधरी यांनी यावेळी केलं.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.09.2019 13.00
Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 28
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
स्कॉर्पिन श्रेणीतली दुसरी पाणबुडी आय एन एस खांदेरीचं
आज मुंबईत माझगाव डॉक इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण झालं. पाणबुडीची
निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं, ही अत्यंत अभिमानाची
बाब असल्याचं संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले. किनारपट्टीलगतच्या प्रदेशांवर मुंबईवरच्या
२६/११ सारखा हल्ला करायच्या तयारीत काही विघातक शक्ती आहेत मात्र त्यांचे हे मनसुबे
धुळीला मिळवले जातील असं त्यांनी सांगितलं. सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजबूत करण्यावर
केंद्रसरकारचा भर असल्याची माहिती त्यांनी
दिली. आय एन एस खांदेरी या पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे, याची जाणीव
पाकिस्तानला व्हायला हवी, असं सांगून, देशातल्या
शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तानचे पंतप्रधान
पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी
म्हटलं.
****
ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेची साधनं असावीत आणि
खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, यादृष्टीनं रोजगारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं, असं मत
केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे. हैदराबाद इथं
झालेल्या ग्रामीण संशोधक स्टार्ट-अप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात, ते काल बोलत होते.
शेतकऱ्यांची प्रगती आणि ग्रामविकासाकरता, केंद्र सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे,
असं ते म्हणाले. तरुणांमधले अभिनव कल्पनांचे जनक नवाभारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण
घटक ठरतील, असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी युवावर्गानं केंद्रसरकारच्या
विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं, असं आवाहन तोमर यांनी यावेळी केलं.
****
भारत, फ्रान्स, ब्रिटन,दक्षिण आफ्रिका, कॅनडा यांच्यासह
वीस देशांनी ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या खोट्या बातम्यांच्या प्रसारा विरोधातल्या
करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत माध्यमांचं स्वांतत्र्य अबाधित राहावं
यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या `रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स` या गटाची स्थापना
करायला या सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली.
****
भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला आहे.
लता मंगेशकर यांनी छत्तीसपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायचा विक्रम केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशाद्वारे त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रिय गृहमंत्री
अमित शहा यांनी काल संध्याकाळी प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष
यांनी काढलेल्या लता मंगेशकर यांच्या छायाचित्रांच्या संकलनाचं लोकार्पण केलं. लता दीदींनी आपल्या मधुर आवाजानं आणि सौम्यतेनं सर्व देशवासीयांना केवळ मंत्रमुग्ध केलं नाही तर संपूर्ण जगामध्ये देशाचा अभिमानही वाढविला
असल्याचं शाह यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
****
शिवसेना भाजप युतीतल्या जागा वाटपाला विलंब होत असल्याच्या
पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबईत कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन संबोधित
करत आहेत. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित
आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या
कार्यकर्त्यांचाही या बैठकीत सहभाग आहे.
****
काँग्रेस पक्ष पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक-पीएमसी
बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या बँकेतील रक्कम काढण्यावर लावलेल्या निर्बंधांविरूद्ध
न्यायालयात दाद मागणार आहे. काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी ही
माहिती दिली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पीएमसी बँकेच्या सोळा लाख खातेधारकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं रिझर्व बँकेच्या
गवर्नरना भेटण्यासाठी वेळ मागितली होती परंतु त्याना परवानगी मिळाली नाही, असंही गायकवाड यांनी म्हटलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होत असून, जिल्ह्यातली
बारुळ आणि मनार ही दोन धरणं पूर्ण भरली आहेत. या पावसाचा सोयाबीन कापणीवर विपरीत परिणाम
होत आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात
काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
****
पुणे परिसरात पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या
दुर्घटनांमधे मरण पावलेल्यांची संख्या आता एकवीस झाली आहे, आणखी पाच जण अद्याप बेपत्ता
आहेत. पोलीसांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली. पुणे शहरात पंधरा जण तर ग्रामीण भागात
सहा जण पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे मृत्युमुखी पडले.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.2019 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
मानवतेच्या रक्षणासाठी
जागतिक समुदायानं दहशतवादाविरुद्ध एकवटण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त
राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत काल न्यूयॉर्क इथं केलं. देशाचा विकास, हवामान बदलाचा
सामना आणि दहशतवादाला विरोध या मुद्यांवर त्यांनी यावेळी भर दिला. दहशतवादासंदर्भात
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधले मतभेद या संघटनेच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासतात
असं ते म्हणाले. भगवान गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची शांतीची
शिकवण ही भारताची जगाला भेट आहे त्यामुळेच दहशतवादा विरोधात भारताच्या पुढाकाराला विशेष
महत्त्व आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यभरात जवळपास सगळ्याच
मतदार संघात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यायला सुरुवात केली. अनेक मतदार संघातून इच्छुकांनी
काल अर्ज दाखलही केले. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं आर्यन राजे शिंदे यांनी अपक्ष
तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विशाल नांदरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आणि
कन्नड मतदारसंघातून एकानं उमेदवारी अर्ज भरला. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन
विधानसभा मतदार संघातून प्रत्येक एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंढरपूर
विधानसभा मतदारसंघात अक्कलकोट इथं काल एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. ठाणे विधानसभा मतदार
संघात भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाकडून भगवान भालेराव यांनी, अमरावती जिल्ह्यातल्या
बडनेरा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय भोंडे यांनी उमेदवारी अर्ज
दाखल केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी, अहेरी, आणि नाशिक पूर्वमधे प्रत्येकी
एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होत असून, जिल्ह्यातली बारुळ
आणि मनार ही दोन धरणं पूर्ण भरली आहेत. या पावसाचा सोयाबीन कापणीवर विपरीत परिणाम होत
आहे.
दरम्यान औरंगाबाद शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस
झाला.
*****
***
Subscribe to:
Posts (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...