Thursday, 27 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

मराठी भाषा दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. औरंगाबाद इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, मराठी भाषेचा प्रत्येकानं वापर वाढवला पाहिजे, याची सुरूवात स्वत:पासून करावी, असं आवाहन केलं. पंजाबी बांधवांनी त्यांच्या ग्रंथात संत नामदेवाचं अभंग सहज स्वीकारले, तसंच मराठीनेही अन्य भाषेतील शब्द संपदेबाबत सर्व समावेशक पद्धतीनं विचार करून अधिक समृद्ध होण्याची गरज रामदासी यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आज प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं.

 पुणे इथल्या अक्षर वाङमय प्रकाशन संस्थेनं यावर्षीपासून उत्कृष्ट वाचक पुरस्कार सुरू केला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्कर गायकवाड यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गायकवाड हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत.

 जालना जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे यांनी यावेळी व्यक्त केली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

 नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून आज मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले. कळमनुरी तालुक्यात बोधी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव या परिसरात आज पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले असून, भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम  प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या विरोधात रेणापूर परिसरातल्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाज्यासमोर काल दुपारपासून सुरू केलेलं धरणं आंदोलन आजही सुरू आहे. पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे.

रेणापूर शहरातलेही बहुतांश व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत
****

 हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिशा समितीची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या त्रेचाळीस योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या. कयाधू नदी काठावरील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावावी, प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी, पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवावी, आदी सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या.
****

 प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीला नेरळकर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं औरंगाबाद इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद इथं रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

 औरंगाबाद शहराच्या उल्कानगरी भागात खिंवसरा पार्क इथं असलेल्या एका इमारतीत तळमजल्यावरच्या गोदामाला आज पहाटे साडे ५ वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत संस्कार श्यामसुंदर जाधव या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसून गोदामात ठेवण्यात आलेल्या विजेच्या साहित्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.
****

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथले ६२८ तसंच सेलू तालुक्यातल्या गिरगाव इथल्या ९६ शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या याद्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या यादीतल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण देखील सुरु झालेले आहे. दुसरी यादी उद्या २८ फेब्रुवारीपासून पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे
*****
***

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दि.27.02.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2020 1 3.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची आज गरज असल्याचं, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी म्हटलं आहे. त्या आज विधानभवनात झालेल्या इये मराठीचीये नगरी या कार्यक्रमात बोलत होत्या. मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती देण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा ही संस्करातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता, आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मराठी भाषा दिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. विविध शाळा महाविद्यालयांमधून मराठी गौरव गीत, तसंच पोवाडे गायनासह अनेकविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिन्ट यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वागत केलं. मिन्ट हे काल भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध द्वी-पक्षीय मुद्यांवर चर्चा होईल, त्यानंतर काही करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
****
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळानं आज पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांत दिल्लीत झालेल्या घटनांकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं लक्ष वेधून, त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिल्याचं गांधी यांनी सांगितलं. या घटना रोखण्यात केंद्र तसंच राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही गांधी यांनी केली. या प्रकरणी राजधर्माचं पालन व्हावं, यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर करावा, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांनी केलं.
****
भारतीय वायूसेनेनं चीनमधल्या वुहान इथून आणखी ७६ भारतीयांना भारतात परत आणलं आहे. या भारतीयांसह बांगलादेश, म्यानमार, मालदीव, दक्षिण आफ्रिका, अमेरिका तसंच मेडागास्कर या देशांच्या ३६ नागरिकांनाही वुहानमधून परत आणण्यात आलं आहे. वुहान इथं काल गेलेल्या या विमानासोबत कोरोना आजारावरच्या उपचारासाठी आवश्यक उपकरणं पाठवण्यात आली, चीन सरकारच्या विनंतीवरून ही उपकरणं पाठवण्यात आल्याचं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जपानमध्ये थांबवून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर अडकून पडलेल्या ११९ भारतीयांना एअर इंडियाच्या विमानानं आज सकाळी दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं. त्यांच्यासोबत श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरु या देशांच्या पाच नागरिकांनाही परत आणलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मीरज इथला खाजगी सावकार संतोष कोळी याला आज पहाटे पोलिसांनी अटक केली, त्याच्या सराफी पेढीतून पोलिसांनी पंधरा लाख रुपयांचं सोनं जप्त केलं. कोळी याच्यासह सचिन गायकवाड यालाही आज अटक करण्यात आली.
****



AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांची जयंती २७ फेब्रुवारी हा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईत विधानभवनात यानिमित्तानं ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन, तसंच १२ बलुतेदारांच्या चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत पुरस्कार, डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज वितरण केलं जाणार आहे. औरंगाबाद इथं शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी या इयत्तेसाठी मराठी भाषा विषय येत्या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करण्यात येणार आहे. काल विधान परिषदेत हे विधेयक सर्वसंमतीनं मंजूर झालं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर एक लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.
आज मराठी भाषा दिनी हे विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्यानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
****
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली ९ गावं आणि ७७ वाड्यावस्त्यांवर आजही मराठी शाळा नसल्याचं समोर आलं आहे. या भागात कर्नाटक सरकार फक्त कन्नड शाळासाठी मदत करत आहे. जत तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना सरकारनं या भागातल्या मराठी शाळांकडे लक्ष देण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
****
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीला नेरळकर यांचं आज सकाळी ६ वाजता अल्पशा आजारानं औरंगाबाद इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या औरंगाबाद इथं रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.27.02.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...