आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 May 2024
TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 May 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० मे २०२४
सायंकाळी ६.१०
****
· नैर्ऋत्य मोसमी
पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
· लोकसभेच्या सातव्या
आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
· शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
· धाराशिव जिल्ह्यातील
२१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य
मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे
सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच
दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह
दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम
बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल,
असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या
वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार
वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा
निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला.
या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात
येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या
३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९
आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं
मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान,
लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश
आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा
पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा
निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय
कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण
रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून,
याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं
रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा
आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या
अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी
राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली.
त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या
६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं
जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक
मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार
यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट
च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी
उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी
शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या
फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने
शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही
कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले
अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश
आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या
पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या
झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर
आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी
नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित
आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं
काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात
उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य
प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता
घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज
राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर,
धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड
यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या
वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी
काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं
हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या
प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप
आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती
संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै.
ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार
जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील
ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप
आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी,
बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर
यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक
निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर
जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक
तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या,
ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार
गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या
विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम
आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय
देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या
जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम
आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी,
असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर
दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी
शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी
जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्त टेंडरवरच लक्ष असल्याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...