Sunday, 31 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक – मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

·      सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

·      कापसावरील आयात शुल्क आणखी पाच महिन्यांसाठी माफ

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ मधून देशवासियांशी संवाद साधणार

·      सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक –चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल

आणि

·      आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार

****

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी कालपासून अंतरवाली सराटी इथं सुरु केलेलं उपोषण मध्यरात्री स्थगित केलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्री पाटील यांनीही समाज माध्यमावरुन ही माहिती दिली.

दिलेल्या इशाऱ्यानुसार जरांगे हे रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात उपोषणाला बसले होते. मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबतचा मसुदा सादर केला. येत्या मंगळवारपर्यंत शासन आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई–नागपूर समृध्दी महामार्गावर जालना हद्दीतल्या नाव्हा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयसमोर काही तरुणांनी भर उन्हात अर्ध नग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तर लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या पळशी इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं.

****

केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं शुल्क पुढच्या पाच महिन्यांसाठी माफ केलं आहे. हा नियम उद्या १ जून पासून ३० ऑक्टोबर पर्यंत लागू असेल, असं अर्थमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

****

देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान काल ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देऊन निवृत्त झाले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा १३४ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूजऑनएअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET-UG मध्ये काल तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे तीन हजार ७६५ विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करुन दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रीक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं संस्थेनं सांगितलं आहे.

****

अकरावी प्रवेशासाठी दहावीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. ही कागदपत्रे अजूनपर्यंत न मिळालेल्या विद्यार्थ्यांना, ती मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो, असंही सरकारनं कळवलं आहे.

****

पुणे भेसळयुक्त दारू प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातल्या नऊ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून, तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकरणी मुंबईत भिवंडी इथल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर काल धाड टाकून मिथेनॉलचा ५ हजार ९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. पुणे प्रकरणातल्या दारूमध्ये वापरण्यात आलेलं मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा २१ वर पोहोचला आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

****

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा नीचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे. सुरवातीला पाण्याचा गढूळपणा २०० एनटीयू पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा १५ एनटीयू पेक्षा कमी करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या आठ आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, तसंच प्रशासकीय कर्मचा-यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्या एक जून रोजी प्रतिनिधीक स्वरुपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात २५ वर्ष विनाअपघात सेवा केल्याबद्दल सहा चालकांचा, तसंच २६० दिवस विना अपघात सेवा करणाऱ्या ५५७ चालकांना रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून, अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी काल गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मुख्य सुत्रधार जुबेर शफिक कुरेशी याच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीसांनी १३१ गोवंशांची सुटका केली. बकरी ईदच्या अनुषंगानं शहरात कत्तल करण्याच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणावर गोवंश डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात वनाच्छादित आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यफेरीच्या लढतीत सात्विक–चिराग जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा २१-१९, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिशा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

छत्रपती संभाजीनगर इथं नालेसफाईचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई कामांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचं दिसून आलं.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस, बीड ४१ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक नऊ, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****


Saturday, 30 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२६ सायंकाळी ६.१०
****
• मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
• आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण
• माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
• छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा नीचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश
आणि
• सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक-चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत दाखल
****
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केलं. दिलेल्या इशाऱ्यानुसार रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात ते उपोषणाला बसले. मराठा-कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
राज्य सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आजही जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करुन आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई नागपूर समृध्दी महामार्गावर जालना हद्दीतल्या नाव्हा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी राज्य सरकारचा निषेध केला. भर उन्हात अर्ध नग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेश सोहळा पार पडला. तनपुरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे, असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. महायुती सरकारसोबत आल्यानंतर राहुरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची चांगल्या प्रकारे सोडवणूक होईल आणि विकासाला आता अधिक गती मिळेल, असा विश्वास तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झालेला नसला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोवा राज्याचा ४० वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. आजच्याच दिवशी १९८७ मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. १९८१ मध्ये भारतीय लष्करात रुजु झालेले चौहान यांनी ४० वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा बजावली आहे. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा १३४ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, तसंच एआयआर न्यूज या संकेतस्थळ आणि न्यूजऑनएअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय, एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल्सवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथे नव्याने सुरु झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खाजगी कंपन्यांची ३०० कोटी रुपयांची गुंतवणुक आहे. प्रकल्पात दरदिवशी बाराशे टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी २८ टन ज्वलनशील वायू, १२० टन सेंद्रिय खत आणि ४०० टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू झाल्यावर वर्षभरात शहरातला कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा नीचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे. सुरवातीला पाण्याचा गढूळपणा २०० एनटीयू पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा १५ एनटीयू पेक्षा कमी करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या ८ आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परवा १ जून रोजी प्रतिनिधीक स्वरुपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात १ जून रोजी वर्धापन दिनानिमित्त २५ वर्ष विनाअपघात सेवा केल्याबद्दल सहा चालकांचा सपत्नीक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि २५ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे, विभागीय नियंत्रक अनुजा संजय दुसाने यांनी ही माहिती दिली. तसंच जिल्ह्यात २६० दिवस विना अपघात सेवा करणाऱ्या ५५७ चालकास सुरक्षित सेवा दिल्याबदल रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
****
कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेल्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाण्यांची २१ पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाण्यांची किंमत सुमारे ३१ हजार ३०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली इथल्या बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याकडून तीन वर्षीय डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा अभ्यासक्रम सुरू होईल, या मान्यतेमुळे बीआरटीसी ही भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी एआयसीटीई मान्यता मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, राज्यातला बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान, शाश्वत रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आज सोलापूर विद्यापीठात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. खास धनगरी गजीनृत्य आणि ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या या शोभायात्रेने शहराचं लक्ष वेधून घेतलं.
****
सिंगापूर ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यफेरीच्या लढतीत सात्विक चिराग जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा २१-१९, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिशा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जपानच्या जोडीने त्यांना २१-१६, १७-२१, २१-१३ असं पराभूत केलं.
****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२६ दुपारी १.०० वा.

****

राज्य सरकार मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक आणि पारदर्शकपणे कार्य करत असून, संविधान, कायदा आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच निर्णय घेतले जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडली. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल असा निर्णय सरकार घेणार नाही आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आणि काल जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, चर्चेतून समाधान न झाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला.

****

ऑपरेशन सिंदूरने भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून, नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना आज ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्राच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक असून, तिन्ही सैन्यदलांमधील समन्वयाचं महत्त्व अधोरेखित करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. पदवीधर कॅडेट्सनी व्यावसायिकता, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची सर्वोच्च मूल्यं जपावीत, असं आवाहन त्यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नका असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या इंधन पुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा सतत उपलब्ध ठेवण्यात यावा, शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना, तसेच उद्योग-व्यवसाय आणि जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात डिझेल तात्काळ उपलब्ध करून दिले जावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने निकालोत्तर फेरतपासणी आणि फेरमूल्यांकनाची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत अधिक पारदर्शकता मिळावी आणि कोणत्याही शंका दूर करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. निकालानंतरची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी मंडळ पूर्णपणे तयार असल्याचं CBSE ने स्पष्ट केलं आहे. फेरतपासणी, उत्तरपत्रिकांच्या प्रती आणि फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याबाबतची सविस्तर माहिती CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी निर्धारित वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे.

****

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी कारवाई करत 7 जिल्ह्यांतील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल 73 लाख 24 हजार 656 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह आणि भ्रामक जाहिरातींमधून विक्री केली जात असलेली तसेच दिशाभूल करणाऱ्या नावाचं औषध या स्वरूपातील औषधी जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण पद्धतीने राबवली जाईल.

****

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, एक अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग-CBI कडे सोपवण्यात आला असून, विषारी दारूचा पुरवठा, विक्री आणि यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेतला जात आहे. या घटनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मिळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. फुगेवाडी-दापोडी भागात १२ तर हडपसर परिसरात ६ जणांचा मृत्यू झाला. तर काही रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

****

म्यांमारचे राष्ट्रपती यू मिन आंग हलाईंग आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी ते बोधगया इथं पोहचले. बोधगया इथं दर्शन घेतल्यानंतर ते नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

परभणी तालुक्यातील ९ मंडळ अधिकारी आणि ५२ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आलं. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. नव्याने मिळालेल्या संगणकीय सुविधांमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, विशेषतः ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी आदी सुविधा नागरिकांनी सुलभपणे उपलब्ध करून देता येतील.

****

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथीयांच्या एका पथकाला आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी तृतीय पंथी करत आले आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमामुळे हातभार लागेल असं संकपाळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृती दल  गठीत करण्यात आलं असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. या दलामार्फत पदवी अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाची रचना, OJT/Internship संदर्भातील कार्यपद्धती, विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी मदत कक्ष, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या शिफारसी हे दल शासनास सादर करेल. ही  समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार नाट्य लेखक अभिराम भडकमकर यांना तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार महेश मांजरेकर यांना देण्यात येणार आहे. सन्मानपत्र आणि ३१ हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे, यंदाचा बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे सुनील देशपांडे यांना जाहीर करण्यात आला. सन्मानपत्र आणि १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जून अखेरीस हे  पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अड्याळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला, या अड्ड्यावरुन जवळपास १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मोहफुल सडवा नष्ट केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90 टक्केच पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल, तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघाचा टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने चेम्सफर्ड इथं इंग्लंडचा ३८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉंटन इथं खेळवला जाणार आहे. दरम्यान, 12 जूनपासून इंग्लंडमध्ये ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ८ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि १० जून रोजी इंग्लंडविरुद्ध कार्डिफ येथे सराव सामने खेळणार आहे.

****

कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव केला.

****

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 May 2026
Time: 09:00-09:10 AM
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۰۳/مئی ۶۲۰۲ء؁
وقت: 09.00 سے 09.10/ بجے
***** ***** *****
سرخیاں
پہلے خاص خبروں کی سرخیاں...
٭ NEET پیپر افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کے ذمہ داروں کا تعین کیا جائے: عدالت ِ عظمیٰ کا مشاہدہ۔
٭ مستقبل میں مہاراشٹر عالمی سطح پر AI کی قیادت کرے گا: وزیرِ اعلیٰ کا اعتماد۔
٭ قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم پر مہاوِکاس آگھاڑی کا فیصلہ۔
٭ جالنہ ضلع میں دیوار منہدم ہونے سے دو بچوں کی موت؛ پربھنی ضلع میں سڑک حادثے میں چار نوجوان ہلاک۔
اور۔۔۔ ٭ گجرات ٹائٹنس IPL کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
عدالت ِ عظمیٰ نے کہا ہے کہ NEET سوالیہ پرچہ افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کی ذمہ داری کا تعین کیا جانا چاہیے۔ اس سلسلے میں داخل درخواستوں پر جسٹس پی ایس نرسنگھ اور جسٹس آلوک آرادھیے کی بینچ نے کل سماعت کی۔ ان میں سے ایک درخواست میں قومی امتحانی ایجنسی (NTA) کی ازسرِ نو تشکیل یا اس کی جگہ میڈیکل کورسیز میں داخلے کیلئے ایک مضبوط اور خود مختار ادارہ قائم کرنے کا مطالبہ کیا گیا ہے۔ عدالت نے اس سلسلے میں حکومت کو حلف نامہ داخل کرنے کی ہدایت دی۔ اس مقدمے کی آئندہ سماعت جولائی کے دوسرے ہفتے میں ہوگی۔
دریں اثناء‘ مرکزی وزیرِ تعلیم دھرمیندر پردھان نے کہا ہے کہ NEET کا سوالیہ پرچہ افشاء ہونے کا معاملہ نہایت ہی سنگین ہے۔ 21 جون کو ہونے والے دوبارہ امتحان بہتر طور پر کرانا حکومت کی ذمہ داری ہے۔ کل نئی دہلی میں اخباری نمائندوں سے گفتگو کرتے ہوئے انھوں نے امتحان کے پورے عمل میں کسی قسم کی غلطی نہ ہو اس کیلئے ہر ممکنہ احتیاطی تدابیر اختیار کی جارہی ہیں۔ انھوں نے مزید کہا کہ معاملے سی بی آئی کے سپرد کیا جاچکا ہے اور اس خصوص میں روزانہ نئے انکشافات سامنے آرہے ہیں۔ اصل سازش تک پہنچنے اوراس کے مرتکب ملزمان کو سخت ترین سزائیں دلانے کیلئے حتی المقدور کوششیں جاری ہیں۔
***** ***** *****
عدالت ِ عظمیٰ نے ملک کی تمام عدالت ِ عالیہ کو حکم دیا ہے کہ زیرِ التواء مقدمات پر محفوظ کیے گئے فیصلے اندرونِ تین ماہ جاری کیے جائیں۔ سپریم کورٹ نے شخصی آزادی سے متعلق مقدمات کی فوری سماعت اور فیصلوں کی ضرورت پر بھی زور دیا۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے یقین ظاہر کیا ہے کہ آنے والے وقت میں مہاراشٹر صرف ہندوستان نہیں بلکہ پوری دنیا میں مصنوعی ذہانت یعنی AI کی قیادت کرے گا۔ ممبئی کے باندرہ- کُرلا کمپلیکس میں ٹیک وِیک 2026- کے افتتاح کے بعد خطاب کرتے ہوئے انھوں نے کہا کہ مہاراشٹر AI انقلاب کی قیادت کیلئے مکمل طور پر تیار ہے۔ انھوں نے ممبئی کی اقتصادی قوت‘ تکنیکی مہارت‘ مضبوط اسٹارٹ اَپ نظام اور جدید ٹکنالوجی اپنانے کی صلاحیت کی سمت توجہ مبذول کروائی۔ ان کے مطابق مسلسل تین برسوں سے مہاراشٹر سرمایہ کاری اور اسٹارٹ اَپس کی تعداد کے لحاظ سے ملک کی سرِ فہرست ریاست ہے۔
***** ***** *****
ریاستی قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم سے متعلق مہاوکاس آگھاڑی کی رُکن جماعتوں میں فیصلہ ہوگیا ہے۔ کانگریس کے ریاستی صدر ہرش وردھن سپکاڑ نے کل ممبئی میں نامہ نگاروں کو یہ اطلاع دی۔ چندرپور‘ ایوت محل‘ بھنڈارا- گوندیا‘ دھاراشیو‘ اہلیانگر‘ شولاپور‘ امراوتی اور بیڑ- لاتور اور ناگپور کے ضمنی الیکشن میں کانگریس امیدوار کھڑا کرے گی، جبکہ رائے گڑھ- رتناگری‘ جلگاؤں‘ پربھنی‘ ہنگولی اور سمبھاجی نگر میں شیوسینا اُدّھو باڑا صاحب ٹھاکرے پارٹی کے امیدوار میدان میں ہوں گے۔ راشٹروادی کانگریس شرد چندر پوار پارٹی کے پونا‘ تھانہ اور سانگلی- ساتارا سے امیدوار کھڑا کرے گی۔
***** ***** *****
نیشنل ڈیفنس اکیڈمی (NDA) کے 150 ویں کورس کی تقریب تقسیمِ اسناد کل پونہ کے کھڑک واسلہ میں پُروقار طریقے سے منعقد ہوئی۔ تقریب میں پڈوچیری کی سابق لیفٹیننٹ گورنر کرن بیدی بطورِ مہمانِ خصوصی شریک تھیں۔ اس موقع پر236 کیڈیٹس کو جواہر لال یونیورسٹی کی ڈگریاں تفویض کی گئیں۔
***** ***** *****
ریاست میں گیارہویں جماعت میں داخلے کی پہلی فہرست کل جاری کردی گئی۔ ثانوی اور اعلیٰ ثانوی تعلیم کے محکمے کے زیرِ انصرام تمام جونیئر کالجوں کیلئے آن لائن داخلے کا عمل جاری ہے۔ ان داخلوں کیلئے ریاست بھر سے 12 لاکھ 51 ہزارطلبہ نے رجسٹریشن کیا تھا۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جا رہی ہیں۔
***** ***** *****
شارجہ سے پیٹرولیم مصنوعات ہندوستان کی جانب لے آنے والے تیل بردار جہاز نسوس کیروس نے کامیابی سے آبنائے ہرمز پار کرلیا ہے۔توقع ہے کہ 3 جون کو یہ جہاز وشاکھا پٹنم کی بندرگاہ پہنچے گا۔ اسی دوران خلیجی ممالک میں جاری بحران کے پیشِ نظر حکومت نے LPG کمپنیوں کو ہدایت کی ہے کہ 30 دنوں کا ذخیرہ محفوظ کیا جائے۔
***** ***** *****
پیٹرول - ڈیزل اور گیس سلنڈر کی قیمتوں میں اضافے کیخلاف کل کانگریس کی جانب سے ریاست کے مختلف مقامات پر مظاہرے کیے گئے۔ ناندیڑ میں آئیٹی آئی کے احاطے میں واقع مہاتما پھلے کے مجسّمے کے روبرو مظاہرہ کیا گیا۔ مظاہرین نے بیل گاڑی پر لاد کر ٹو وہیلر اور سڑک پر ہی چولہے جلاکر روٹیاں سینکیں۔ یہ مظاہرہ ضلع صدر وٹھل پاؤڑے اور شہر صدر عبدالغفار کی قیادت میں کیا گیا۔
بیڑ میں ضلع صدر راہل سونونے کی قیادت میں مظاہرہ کیا گیا۔ اس موقع پر سونونے‘ نے انتباہ دیا کہایندھن کی قلّت دور کرکے قیمت میں کمی نہیں کی گئی تو تحریک مزید تیز کی جائیگی۔ پارٹی کی جانب سے ضلع کلکٹر کو محضر بھی پیش کیا گیا۔ دھاراشیو میں ضلع صدر امیش راجے نمبالکر کی قیادت میں مظاہرہ کیا گیا۔
***** ***** *****
جالنہ ضلع میں ایک قدیم مکان کی دیوار منہدم ہوجانے سے دو نابالغ بچوں کی موت واقع ہوگئی۔ عنبڑ تعلقے کے گھونگرڈے حد گاؤں میں کل یہ حادثہ پیش آیا۔ یہ دونوں بچے بکریوں کیلئے درخت کے پتے توڑ رہے تھے کہ مخدوش مکان کی دیوار گرگئی‘ جس کے باعث ان کی موت واقع ہوگئی۔
پربھنی ضلع میں کلیان-نرمل قومی شاہراہ پر ایک خانگی بس اور ٹووہیلر کے درمیان ہوئے حادثے میں چار افراد ہلاک ہوگئے۔ یہ حادثہ کل شب پیش آیا۔ حادثے میں ہلاک ہونے والے چاروں نوجوانوں کا تعلق مانوت سے بتایا جاتا ہے۔
***** ***** *****
قومی تحقیقاتی ادارے (NIA) نے کل ملک بھر میں 12 مقامات پر چھاپے مارکر متعدد افراد سے تفتیش کی۔ اس کارروائی میں چھترپتی سمبھاجی نگر کے والوج علاقے سے ایک شخص کو حراست میں لیکر پوچھ تاچھ کیے جانے کی بھی بات سامنے آئی ہے۔
***** ***** *****
مراٹھا ریزرویشن اور دیگر مطالبات کیلئے بھوک ہڑتال کے اپنے فیصلے پر قائم رہنے کے مؤ قف کا اظہار منوج جرانگے پاٹل نے کیا ہے۔ انتروالی سراٹی میں کل ریاستی وزیر رادھا کرشن وکھے پاٹل اور رکنِ اسمبلی پرساد لاڑ کے ساتھ ملاقات نتیجہ خیز ثابت نہیں ہوئی۔ تاہم جرانگے نے کہا کہ تحریری تیقن اور سرکاری حکمنامہ موصول ہونے پر آج صبح بھوک ہڑتال سے متعلق فیصلہ کیا جائے گا۔
***** ***** *****
محکمہ موسمیات نے پیش گوئی کی ہے کہ ایل نینو کے اثرات کے باعث اس سال جنوب مغربی مانسون اوسط سے کم90 فیصد رہے گا۔ محکمہ موسمیات کے ڈائریکٹر جنرل مرتیونجئے موہاپاترا اور وزارتِ ارضی سائنس کے سیکریٹری ڈاکٹر روی چندرن نے کل نئی دہلی میں مانسون 2026 کے دوسرے مرحلے کی طویل پیش گوئی جاری کی۔ ان کے مطابق جون سے ایل نینو کے اثرات میں اضافہ متوقع ہے اور وسطی و جنوبی ہندوستان میں بارش کا تناسب کم رہنے کا امکان ہے۔
***** ***** *****
کپتان شبھمن گل کی جارحانہ سنچری کی بدولت گجرات ٹائٹنس نے انڈین پریمیر لیگ (IPL) کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں داخلہ حاصل کرلیا ہے۔ کل نیو چنڈی گڑھ میں کھیلے گئے میچ میں گجرات نے راجستھان رائلز کو سات وکٹ سے شکست دے دی۔ راجستھان کی ٹیم نے پہلے بلّے بازی کرتے ہوئے مقررہ اوورز میں 214 رن بنائے‘ تاہم گجرات کی ٹیم نے یہ ہدف 19 ویں اوور میں ہی حاصل کرلیا۔ 53 گیندوں میں 104 رن بنانے والے شبھمن گِل کو مین آف دی میچ قرار دیا گیا۔ کل ٹورنامنٹ کا فائنل گجرات اور رائل چیلنجرز بنگلورو کے مابین کھیلا جائے گا۔
***** ***** *****
ریاست میں کل وردھا میں سب سے زیادہ درجہ حرارت 46 اعشاریہ آٹھ ڈگری سیلسیئس درج کیا گیا۔ مراٹھواڑہ میں پربھنی میں 42 اعشاریہ چارڈگری‘ ناندیڑ میں 42 اعشاریہ چھ ڈگری اور چھترپتی سمبھاجی نگر میں درجہ حرارت 41 اعشاریہ چار ڈگری سیلسیئس درج کیا گیا۔
***** ***** *****
سرخیاں
آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر....
٭ NEET پیپر افشاء ہونے کے معاملے میں غلطیوں کے ذمہ داروں کا تعین کیا جائے: عدالت ِ عظمیٰ کا مشاہدہ۔
٭ مستقبل میں مہاراشٹر عالمی سطح پر AI کی قیادت کرے گا: وزیرِ اعلیٰ کا اعتماد۔
٭ قانون ساز کونسل کی 17 میں سے 15 نشستوں کی تقسیم پر مہاوِکاس آگھاڑی کا فیصلہ۔
٭ جالنہ ضلع میں دیوار منہدم ہونے سے دو بچوں کی موت؛ پربھنی ضلع میں سڑک حادثے میں چار نوجوان ہلاک۔
اور۔۔۔ ٭ گجرات ٹائٹنس IPL کرکٹ ٹورنامنٹ کے فائنل میں۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...