Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२६ सायंकाळी ६.१०
****
· सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा
सुरू
· काँग्रेसकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
· अंमली पदार्थांविरोधात सामुहिक युद्धाची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडून व्यक्त
· शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटी रुपये निधी जाहीर
· राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण .
· क्रिकेटपटू अजिंक्य राहणे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून
निवृत्त
आणि
· मराठवाड्यात जालना,
परभणी तसंच हिंगोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट
****
सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने
प्रतिबंध सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरू झाली. राज्यमंत्री डॉ
जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सदनासमोर मांडलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी या चर्चेत सहभग घेत, सरकारने सर्वंकष राष्ट्रीय युवा रोजगार धोरण
सादर करावं,
तसंच केंद्र सरकारच्या विविध कार्यालयातल्या तसंच
संस्थांमधली रिक्त पदं तातडीनं भरावीत, अशी मागणी केली. सरकारने
जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करतांना खरगे यांनी, आंदोलकांवर
झालेल्या कारवाईप्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी
जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल
यांनी यासंदर्भात बोलतांना,
सरकारने उचललेल्या पावलांमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचं
सांगत, सरकारकडून योग्य दिशेनं सुरू असलेली कार्यवाही समजून घेण्याचं आवाहन केलं.
द्रमुकचे तिरुची शिवा यांनी आपल्या
पक्षाच्या भूमिकेनुसार नीट रद्द करण्याची मागणी केली. अण्णाद्रमुकचे एम तंबिदुराई, समाजवादी
पक्षाचे रामगोपाल यादव,
तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष, बिजू
जनता दलाचे संतृप्त मिश्रा,
आम आदमी पक्षाचे संजय सिंह, यांच्यासह अनेकांनी
या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला. ही चर्चा सध्या सुरू आहे.
**
लोकसभेनं आज वंदे मातरम संदर्भातलं
राष्ट्र गौरव अवमान विधेयक संमत केलं. राज्यसभेनं काल मंजूर केलेलं हे विधेयक
मंत्री नित्यानंद राय यांनी सदनासमोर मांडलं. डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी या
विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूने आपलं
मत मांडलं,
त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच सदनाने हे विधेयक आवाजी
मतदानाने मंजूर केलं. त्यापूर्वी नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थी आंदोलनावरच्या
कारवाईविरोधात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन
वाजेपर्यंत वारंवार बाधित झालं. वंदे मातरम संदर्भातलं विधेयक संमत झाल्यानंतर
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
अंमली पदार्थांच्या विरोधात सामुहिक
युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आज
मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे
युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री
म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं
अतिशय महत्त्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथही
मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
आजच्या युगात यशासाठी तांत्रिक
ज्ञानासोबतच संवाद कौशल्ये,
डिजिटल आणि एआय साक्षरता, चिकित्सक विचार आणि
नैतिक मूल्य देखील महत्त्वाची असल्याचं, राज्यपाल जिष्णु देव वर्मा
यांनी म्हटलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या
पदवीप्रदान समारंभात ते आज बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ
शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉ. जेष्ठराज जोशी यांना मानद 'डी.
एस्सी.' आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना मानद 'डी.
लिट.' पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान, राज्यपाल वर्मा
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं दाखल झाले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
यांनी राज्यपाल वर्मा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाला पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. मराठी
भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निमित्त
होणाऱ्या ९९व्या नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील पाच कोटी रुपयांची तरतूद
करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या १३ विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी
प्रत्येकी २५ लाख रुपये याप्रमाणे राज्यातील तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटी
रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला.
****
राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे
८२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. २७ जुलै अखेर ऊस वगळता १४४ पूर्णांक ३६
शतांश लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११७ पूर्णांक ६९ शतांश लाख हेक्टरवर पेरणी झाली
आहे. सोयाबीनची सर्वाधिक ४५ पूर्णांक १० शतांश लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस
साडे ३६ लाख हेक्टर,
मका ११ पूर्णांक ४३ शतांश लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी १०
पूर्णांक ६७ शतांश लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
एक जून ते २७ जुलै या कालावधीत राज्यात
सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या ९६
टक्के पाऊस झाला होता.
****
रजोनिवृत्ती आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी
सिंड्रोम विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आज
छत्रपती संभाजीनगर इथे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन झालं. सार्वजनिक
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उदघाटन
झालेल्या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केलं जाणार
आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात
परवा एक ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात
येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं
आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या
बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत
आपला अनुभव त्यांनी या शब्दांत सांगितला..
बाईट - अनुराधा चौधरी
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी
तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात ११ तालुक्यांतल्या एकूण ९७ हजार १९४
शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ २७ हजार ५००
शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेचे
उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान यांच्या शेतात डांबून ठेवलेल्या १९ गोवंशीय जनावरांची
पोलिसांनी धाड टाकून सुटका केली. याप्रकरणी उपनगराध्यक्षांविरुद्ध वसमत ग्रामीण
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
क्रिकेटपटू अजिंक्य राहणे याने सर्व
प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाजमाध्यमावरच्या
संदेशातून त्याने ही माहिती दिली. अजिंक्यने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २०२३
मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात,
तर शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला
होता. त्याने आपल्या कारकिर्दित एकूण ८५ कसोटी सामने, ९०
एकदिवसीय सामने आणि २० टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.
****
राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरु
आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज सकाळपासून मध्यम
स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. दुपारनंतर तासभर जोरदार पाऊस झाला.
नांदेड शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस
महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या
कारमध्ये कोणीही नसल्याने कोणीही जखमी झालं नाही. नांदेड जिल्ह्यात किनवट आणि
माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड
धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३५
पूर्णांक ५० मिलीमीटर पाऊस झाला.
परभणी शहरात सुरू असलेल्या पावसाच्या
पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात
काही भागात झाडं पडल्याने काही वाहनांचं नुकसान झालं, तसंच
वाहतुक विस्कळीत झाली होती
लातूर जिल्ह्यात संततधार पावसाने
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९
पूर्णांक ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरत
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने
मराठवाड्यात जालना,
परभणी तसंच हिंगोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट, छत्रपती
संभाजीनगर,
बीड आणि नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर धाराशिव आणि
लातूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर
महाराष्ट्र,
तसंच कोकणातल्या काही जिल्ह्यांनाही आज रेड तसंच ऑरेंज
अलर्ट देण्यात आला असून,
पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****