Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 19 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
गोरक्षणाच्या
नावाखाली होणाऱ्या हत्यांच्या घटनांची सरकारनं गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात संबंधित
राज्य सरकारांकडून माहिती मागवली आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी
आज राज्यसभेमध्ये प्रश्नकालातल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केलं. अशा घटनांमधल्या
दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्यसरकारांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
अल्पसंख्यांकांवर आणि दलितांवर होणाऱ्या कथित मारहाणीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या
स्थितीबाबत आज राज्यसभेमध्ये अल्पकालिक चर्चा झाली. राज्यसभेतले विरोधी पक्षांचे नेते
गुलाम नबी आझाद यांनी अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त करत, दोषींवर कडक कारवाईची मागणी
केली. सरकारलाही या घटनांबद्दल दु:ख असल्याचं नमूद करत, अशा दोषींवर कारवाई सुरू झाली
असल्याचं उत्तर संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिलं. विरोधकांच्या
घोषणाबाजीमुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार अडथळे आल्यानं उपसभापती कुरियन यांना
अनेकवेळा कामकाज स्थगित करावं लागलं.
दुसरीकडे
लोकसभेमध्ये, एकदा सदन स्थगित होऊन पुन्हा कार्यवाही सुरू झाल्यानंतर, काँग्रेस, तृणमूल
काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्थगन
प्रस्ताव दिला. शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल आणि त्यांच्या आत्महत्यांबद्दल त्वरित चर्चा
व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केली. मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, या मुद्द्यावर नियम १९३ ला अनुसरून चर्चा
केली जाईल, असं सांगत स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी काही काळ सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नियम १९३ नुसार
या विषयावर चर्चेची अनुमती दिल्यानंतर सदनाचं काम सुरळीत सुरू झालं.
****
वस्तू
आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी पूर्ण देशासाठी तसंच राज्यांसाठीही अतिशय लाभदायी
ठरेल, असं सरकारनं म्हटलं आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून देशाची करप्रणाली अधिक
पारदर्शक झाली आहे, असं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी केलं आहे.
नवी दिल्ली इथे आज सकाळी झालेल्या, भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर
ते माध्यमांशी बोलत होते. सरकार सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्षांशी चर्चा करण्यास तयार
असल्याचंही कुमार यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय
अवकाश संशोधन संस्था-इस्त्रो-ची व्यावसायिक शाखा एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडनं एकोणतीस
नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे एकसष्ठ लाख युरो इतक्या परदेशी चलनाची कमाई
केली असल्याची माहिती, सरकारनं आज दिली. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान
कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
****
मनमाड-धुळे-इंदूर
या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गासंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
येत्या एकोणतीस तारखेला धुळ्याला येणार आहेत, अशी माहिती धुळ्याचे खासदार आणि संरक्षण
राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज दिली आहे. धुळे ते पुणे रेल्वे सेवा सुरू
करण्याच्या सातत्यानं होणाऱ्या मागणीसंदर्भातही आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली असून,
लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचंही भामरे यांनी यावेळी सांगितलं.
****
गेल्या
वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितींमध्ये
कांदा विक्रीसाठी आणला होता, त्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
प्रति क्विंटल शंभर रुपये या दरानं हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात
येणार असून, या अनुदानाची कमाल मर्यादा दोनशे क्विंटलपर्यंत, अशी आहे. मागच्या वर्षी
उसाच्या पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न शासनामार्फत
करण्यात आला. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केल्यामुळे
आवक जास्त होऊन कांद्याचे दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं शासनानं हा
निर्णय घेतला आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती
निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यामुळे तिथली
बाजारपेठ आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे या परिसरातल्या शंभर गावांचा संपर्क
तुटला आहे. जिल्ह्यातल्या वैलोचना, खोब्रागडी, सती या नद्यांसह सगळ्या नाल्यांना पूर
आल्यानं अनेक रस्त्यांवरची वाहतूक थांबली आहे. जिल्ह्यात आणखी काही भागांमध्ये अतिवृष्टी
होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
****
खासदार
उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला.
सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या एका व्यावसायिकाला मारहाण करण्याचा आणि खंडणी मागण्याचा
गुन्हा भोसले यांच्यावर गेल्या फेब्रुवारी महिन्यात दाखल करण्यात आलेला आहे. भोसले यांच्या नऊ समर्थकांना
याप्रकरणी आधीच अटक करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment