Sunday, 3 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 03.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाच्या संरक्षणमंत्रिपदी निर्मला सितारामन यांची निवड झाली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यापूर्वी वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार सांभाळलेल्या सितारामन यांना राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्रिपदी बढती देत, त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार सुरेश प्रभू यांच्याकडे, तर पियुष गोयल यांच्याकडे रेल्वेसह कोळसा मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. स्मृती इराणी यांच्याकडे माहिती प्रसारण तसंच वस्रोद्योग, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक, तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. प्रधान यांच्याकडे कौशल विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालयासह गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली असून, उमा भारती यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार असेल.
राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार, आर के सिंह यांना ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, संतोष कुमार गंगवार यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, के जे अल्फोन्स यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे.
शिवप्रताप शुक्ल - अर्थराज्यमंत्री, अश्विनीकुमार चौबे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, अनंत कुमार हेगडे - कौशल्य विकास राज्यमंत्री, तर वीरेंद्र कुमार - महिला आणि बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहतील.

****

देहदान करण्यासाठी सावत्र आई - वडील, भाऊ - बहीण आणि कुटुंबातल्या अन्य सदस्यांना जवळच्या नातेवाईकांच्या व्याख्येत समाविष्ट करण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे देहदानाची आवश्यकता असणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. जवळच्या नातेवाईकांच्या व्याख्येची व्याप्ती वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यात दुरुस्तीसाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. मंत्रालयानं २५ सप्टेंबरपर्यंत यावर नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. 

****

२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचं महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. माहिती आणि प्रसारण महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. आदिवासींसाठी असलेल्या २५ हजार घरांपैकी १० हजार घरं पूर्ण झाली असून, घर बांधणी अनुदान वाटपातला गैरव्यवहार रोखण्यासाठी ही रक्कम थेट बँकेत जमा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये पोलिसांबद्दल लोकांच्या अपेक्षा आणि आकलनासंदर्भात सर्वेक्षण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नागपूर पोलिसांनी अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं असून, त्याचं सादरीकरण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. 

****

औरंगाबाद शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी, समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बांधकाम व्यावसायिकांच्या 'क्रेडाई' संघटनेच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांनी ‘पाणी’ या मुलभूत गरजेचा विचार करावा, तसंच व्यवसायात काम करणाऱ्या मजूर, ठेकेदारांना प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभधारक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील, यांचं आज पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज अहमदनगर जिल्ह्यातल्या नालेगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

****

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एक जण ठार, तर १४ प्रवासी जखमी झाले. काल मध्यरात्री कारला एसटीनं पाठीमागून धडक दिल्यानं मोटारीतला एक प्रवासी ठार झाला, तर एकाच कुटुंबातले चौघे जण जखमी झाले. चिपळूण तालुक्यातल्या असुर्डे गावाजवळ हा अपघात झाला.

****

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून संवैधानिक मान्यता द्यावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज लातूर इथं लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...