Monday, 4 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.09.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

चीन मधल्या शियामेन इथं सुरू असलेल्या नवव्या ब्रिक्स शिखर परिषदेत आज जारी करण्यात आलेल्या ब्रिक्सच्या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. ‘जगात कुठेही, कोणत्याही दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही’, असं या घोषणापत्रात म्हटलं आहे. यावेळी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा, हक्कानी, इसिस आणि तालिबानी या दहशतवादी संघटनांचा स्पष्ट उल्लेख करत त्यांचा निषेध करण्यात आला. दहशतवादी संघटनांना होणारी आर्थिक मदत थांबवली पाहिजे, असंही या घोषणापत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेऊन, विविध मुद्यांवर चर्चा केली.

****

राज्यस्तरीय लोकशाही दिनातून जनतेच्या आतापर्यंत ९९ टक्क्यांहून अधिक तक्रारी दूर करण्याचं काम सरकारनं केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या शंभराव्या ऑनलाईन लोकशाही दिनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १८ तक्रारींवर तत्काळ निर्णय घेतले. यात बीड, औरंगाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यातल्या तक्रारींचा समावेश होता.

जालना जिल्ह्यातल्या पानेवाडी इथले माणिकराव अवघड यांना शेततळ्याचं अनुदान मिळालं नसल्याच्या तक्रारीची, तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.    

****

येत्या १४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. १४ ऑक्टोबर रोजी धम्म प्रवर्तन दिन असून, या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नागपूर इथं दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी जात असल्यामुळे निवडणुकांची तारीख बदलावी असं ते म्हणाले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठ सप्टेंबरला मराठवाडा दौऱ्यावर येत असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.   

****

कर्जमाफीसाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या ५१ लाख ऑनलाईन अर्जांपैकी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक ऑक्टोबर पूर्वी पैसे जमा करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

****

राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, आणि नगर पंचायतींच्या कंत्राटी कामगारांचा राज्यस्तरीय मेळावा येत्या आठ सप्टेंबरला लातूर इथं आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपालिका-महानगरपालिका कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश संघटक अजय ठक्कर, प्रदेश अध्यक्ष अनंत लांडगे यांनी आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पालिकांमध्ये गेल्या दहा वर्षापासून काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करावं, गुत्तेदारांकडून कंत्राटी कामगारांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, आदी मागण्यांवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे.

****

आपल्या समस्या सोडवण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांचं अनुकरण न करता आपण स्वत: उपाय शोधले पाहिजे, असं मत नवी दिल्ली इथल्या नॅशनल फिजीकल लॅबोरेटरीजचे संचालक डी. के अस्वाल यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक पुरस्कार, अस्वाल यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्प से सिध्दी अंतर्गत आपण आपल्या समस्यांचं सर्वांनी मिळून निराकरण केल्यास, येत्या काही वर्षात आपला देश एक विकसित राष्ट्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

उद्या अनंत चतुर्दशी. गणोशोत्सवाची उद्या सांगता होत आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, विसर्जनासाठी ठराविक जागा नेमून दिल्या आहेत. औरंगाबाद इथल्या श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे उद्या सकाळी अकरा वाजता संस्थान गणपती इथून मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शहरात औरंगपुरा भागात जिल्हा परिषद मैदानावर मुख्य विर्सजन विहीर असून शिवाजीनगर, हडको एन १२, हर्सुल, सातारा परिसर, चिकलठाणा, संर्घषनगर, मुकुंदवाडी याठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी उपकेंद्राचं आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उपकेंद्रामुळे परभणी शहर आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, असं मत व्यंकटेश्वरलू यांनी यावेळी व्यक्त केलं. या उपकेंद्रात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देणार असल्याचं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितलं.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...