Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्नीकरणाची
मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात
ही माहिती दिली. बँक खाती तसंच मोबाइल क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्न करण्याविरोधात
दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान महान्यायवादी के के वेणुगोपाल यांनी ही मुदत ३१
डिसेंबर २०१७ ऐवजी ३१ मार्च २०१८ करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
****
गुजरात विधानसभेच्या एकशे ब्याऐंशी जागांसाठी येत्या नऊ
आणि चौदा डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ए.के.जोती
यांनी आज हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या टप्प्यात एकोणनव्वद जागांसाठी आणि
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित त्र्याण्णव जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीत सगळ्या मतदान
केंद्रांवर व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होणार असल्याचं
जोती यांनी सांगितलं. या मतदानाची मतमोजणी येत्या अठरा डिसेंबरला होणार आहे.
****
येत्या आठ नोव्हेंबरला भारतीय जनता पक्ष ‘काळं धन विरोधी
दिन’ पाळणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथे
एका पत्रकार परिषदेत दिली. या दिवशी भाजपचे नेते देशभरात भ्रमण करणार असून, काळ्या
धनाच्या विरोधात योजलेल्या उपायांबद्दल जनतेला माहिती देणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं.
****
कृषी क्षेत्रासमोर मोठी आव्हानं असून, या पुढच्या काळात
जैव तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या
समन्वयातून भारतीय शेतीची प्रगती होईल, असा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन संस्था –
इस्त्रो चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी
इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बत्तीसाव्या पदवीप्रदान समारंभात ते आज बोलत
होते. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी तसंच पीएच
डी प्रमाणपत्रं वितरित करण्यात आली.
दरम्यान, राज्यपालांनी या दौऱ्यात कृषी तंत्रज्ञान माहिती
केंद्रातील प्रदर्शनाला भेट तसंच एकात्मिक शेती पध्दती मॉडेलची पाहणी केली. आदर्श ग्राम
योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास मॉडेलचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं.
****
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत बिनचूक माहिती
देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास
सुरूवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कर्जमाफीची
रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेतल्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईत
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक झाली, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सगळ्या
जिल्ह्यांमधल्या सहकारी बॅंका आणि सहकार उपायुक्तांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
****
उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचं प्रमाण कमी ठेवणाऱ्या संस्था
विश्वासपात्र ठरतात, असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे.
परभणी इथं वैश्य नागरी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते
आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीनं
नंदकुमार घोडेले, तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीनं विजय औताडे यांनी आज उमेदवारी
अर्ज दाखल केले. महापौर तसंच उपमहापौर पदासाठी येत्या २९ तारखेला निवडणूक होणार आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ
सुधीर गवळी यांना दोन लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तक्रारदार
शेतकऱ्यांकडून जमिनीवर ले आऊट मंजुरीसाठी, गवळी यांनी लाच मागितली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं पन्नास षटकात नऊ बाद २३० धावा केल्या आहेत.
तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून न्यूझीलंड मालिकेत आघाडीवर आहे.
****
जालना इथल्या आर. डी. भक्त फार्मसी महाविद्यालयात आयोजित
आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात १२५ किलो वजन गटात बीडच्या
बलभीम महाविद्यालयाचा अक्षय शिंदे यानं, तर मुलींच्या ७२ किलो वजन गटात औरंगाबादच्या
देवगिरी महाविद्यालयाच्या माधुरी लहासे हिने विजेतेपद मिळविलं. विविध वजन गटांमध्ये
विजयी झालेल्या कुस्तीपटुंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक तसंच प्रमाणपत्रांचं वितरण
करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment