Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
**
सकल देशी उत्पादनाच्या विकास दरावर
टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना पंतप्रधानांचं जोरदार प्रत्युत्तर; देशात
नकारात्मक वातावरण तयार न करण्याचं आवाहन
** आगामी
सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्न आणि कमी दर्जाच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री
रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
** शासकीय
दरापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या सहकारी दूध संघांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे
राज्य सरकारचे आदेश
आणि
** कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी जालन्याचा
क्रिकेटपटू
विजय झोलची निवड.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकल देशी उत्पादनाच्या विकास
दरावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना काल जोरदार प्रत्युत्तर दिलं. यापूर्वीच्या
सरकारच्या सहा वर्षाच्या काळात आठ वेळा विकास दर पाच पूर्णांक सात दशांश टक्के किंवा
त्यापेक्षा कमी होता असं त्यांनी स्पष्ट केलं. नवी
दिल्लीत भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या सुवर्ण जयंती समारोहाचं उद्घाटन करतांना काल
ते बोलत होते. देशात यापेक्षाही वाईट स्थिती आली होती असं सांगतांना, त्यांनी
आर्थिक विकास दर हा एका तिमाहीत कमी होऊन शून्य पूर्णांक दोन दशांश आणि दीड टक्क्यांपर्यंत
खाली आला होता. ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत घातक होती, कारण
त्याच वेळी भारत हा चलनवाढीच्या वाढलेल्या दराविरुध्द तसंच चालू खात्यातली तूट आणि
आर्थिक नुकसानीच्या विरूध्द लढत होता असं ते म्हणाले. काही
लोक देशाची प्रतिष्ठा आणि सचोटीची सामाजिक रचना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा
आरोप त्यांनी यावेळी केला. अशा लोकांना व्यवस्था आणि संस्थांमधून बाहेर काढण्यासाठी
सरकारनं पहिल्या दिवसापासूनच एक अभियान सुरु केलं असल्याचं मोदी म्हणाले. टीका
करणारे जे सांगत आहेत ते सर्वच चुकीचे नाही, मात्र
देशात नकारात्मक वातावरण तयार करु नये असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. सरकारनं
देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरकारनं
केलेल्या उपाययोजनांमुळे आगामी काळात देश विकासाच्या नव्या दिशेनं जाईल अशी आशाही पंतप्रधानांनी
यावेळी व्यक्त केली.
****
ज्या जिल्ह्यातल्या सगळ्या बँकांची परिपूर्ण माहिती प्राप्त
होईल, त्या जिल्ह्यात तातडीनं कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी
माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ते काल
मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक तातडीनं संबंधित
बँकेला द्यावा, अशी सूचनाही सहकारमंत्र्यांनी केली आहे.
****
शेतकरी कर्जमाफी घोषित झाल्यानंतर
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याकरता वेळ लागत असल्यानं शेतकरी आत्महत्या
वाढल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
सुनिल तटकरे यांनी केला आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी
बोलत होते. कर्जमाफी योजना जाहीर करून तीन महिने उलटले तरी पात्र
आणि अपात्र अर्ज याची माहिती दिली जात नसल्याचं ते म्हणाले. पाच
नोव्हेंबरला किसान सेलच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असून शेतकरी कर्जमाफीसह अन्य
मागण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्न आणि कमी
दर्जाच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारांनी आवश्यक ती कारवाई
करण्याचे निर्देश, केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान
यांनी काल दिले. गुणवत्तेची हमी देणाऱ्या हॉलमार्क योजनेची अंमलबजावणी सरकार
करत असताना देखील कमी दर्जाच्या दागिन्यांची होणारी विक्री ही चिंतेची बाब असल्याचं
ते म्हणाले. याचबरोबर भेसळयुक्त मिठाई आणि अन्नाची विक्री ही देखील गंभीर
बाब आहे, असं पासवान यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल
आहे.
****
शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरानं दूध
उत्पादकांचं दूध खरेदी करणाऱ्या राज्यातल्या सहकारी दूध संघांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे
आदेश, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत. शासनानं
जाहीर केलेले खरेदी दर काही दूध संघांनी लागू केले नाहीत, तर
काहींनी लागू करून पुन्हा दर कमी केल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्यानंतर, जानकर
यांनी हा आदेश दिला आहे.
****
राज्यातल्या राज्यमार्गांवर पहिल्या टप्प्यात शंभर ठिकाणी
प्रसाधनगृहांसह जनसुविधा केंद्रं उभारण्यात येणार आहेत. राज्य
शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांमध्ये यासंबंधी काल सामंजस्य
करार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यातली शंभर ठिकाणं निवडण्यात आली
असून, यासाठी कंपन्यांना जागा निवडण्यास सांगण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बडोदा इथं होणाऱ्या एक्क्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांना आजपासून येत्या अकरा तारखेपर्यंत अर्ज करता
येणार आहेत. रविवार वगळता इतर दिवशी महाराष्ट्र
साहित्य परिषदेच्या कार्यालयात हे अर्ज दाखल करता येतील. परिषदेचे
कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.
****
मराठवाड्यात सर्व आठही जिल्ह्यातल्या दोन हजार १९ ग्रामपंचायतींसाठी
येत्या शनिवारी सात ऑक्टोबरला मतदान होत आहे. यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार असून, या निवडणुकीच्या
प्रचाराची मुदत आज संपणार आहे.
दरम्यान, नांदेड वाघाळा
महापालिकेसाठीयेत्या ११ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व आस्थापनांनी
मतदानाच्या दिवशी सुटी द्यावी, असे निर्देश प्रशासनानं जारी केले
आहेत.
****
राज्यात पाच ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पर्यटन
पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं उद्या
शुक्रवारी सहा ऑक्टोबरला औरंगाबाद शहरातल्या
ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या
सार्वजनिक ठिकाणी ‘महास्वच्छता अभियान’ राबवण्यात
येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम
भापकर यांनी काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद शहरात कलाग्राम इथं सीताफळ महोत्सवाचं आयोजन
करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पुणे इथं होणाऱ्या २३ वर्ष वयाखालच्या कर्नल सी. के.
नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या महाराष्ट्रासाठीच्या संघात
जालन्याचा रणजीपटू विजय झोल याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. येत्या आठ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा होणार असून या संघात नांदेडचा
शमशुझमा काझी, परभणीचा जयदीप भराडे यांचाही समावेश आहे.
****
यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला, मात्र त्यांनंतर
५२ दिवस पावसानं दडी मारल्यानं, मराठावाडा विभागातल्या ३१२ गावांची
खरिपाची हंगामी पैसे आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली असल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयानं जाहीर केलेल्या अहवालात म्हंटलं आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९३ तर परभणी जिल्ह्यातल्या २१९ गावांचा समावेश
आहे.
****
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजने अंतर्गत औरंगाबाद
जिल्ह्यात भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थ्यांची संख्या अत्यल्प असल्याची माहिती भविष्य
निर्वाह निधी विभागाचे विभागीय आयुक्त एम.एच वारसी यांनी
दिली. ते काल औरंगाबाद इथं केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीनं
आयोजित चर्चासत्रात बोलत होते. खाजगी संस्था आणि कारखान्यांमध्ये
कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन पंधरा हजार
रूपये पर्यंत आहे आणि जे कर्मचारी एक एप्रिल २०१६ नंतर रूजू झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत
या योजनेत सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
लातूर इथले अखिल भारतीय सोमवंशीय आर्य क्षत्रीय समाजाचे
अध्यक्ष, सुनिल माढेकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते
५९ वर्षांचे होते. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या सांगवी सारणी इथं, सोयाबिनची मळणी सुरू असताना, मळणी यंत्र अंगावर पडून,
काल दोन महिलांचा मृत्यू झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड - ईसाद
मार्गावर काल सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर
जखमी झाला आहे. जखमीला गंगाखेड इथल्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील पिकांसाठी जायकवाडी धरणातून आठ पाणी
पाळ्या देण्यात याव्यात अशी मागणी शिवसनेच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात
आली आहे. जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत
काल एक लेखी निवेदन दिलं.
****
No comments:
Post a Comment