आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, भारतीय कंपनी सचिव संस्था-आय.सी.एस.आय.- च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ
होणार आहे. देशभरातल्या कंपनी सचिवांशी संवाद साधण्यास आपण उत्सुक आहोत, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँक आज चौथं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर
ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीनं काल मुंबईमध्ये उद्योग जगताच्या
प्रतिनिधींसोबत दोन दिवसांच्या विचार विनिमय बैठकीला सुरुवात केली.
****
भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्त्रो-मध्ये आजपासून जागतिक अवकाश सप्ताह साजरा
करण्यात येत आहे. दरवर्षी चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान हा सप्ताह जगभरात साजरा करण्यात
येतो.मानवाचं आयुष्य समृद्ध करण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या असलेल्या सहभागाचं
प्रतिक, अशी या सप्ताहाची ओळख आहे.
****
उद्योजक विजय मल्ल्या याला काल ब्रिटन पोलिसांनी मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक
करून, नंतर त्याची जामिनावर मुक्तताही केली. येत्या चार डिसेंबर पर्यंत मल्ल्या जामिनावर
मुक्त राहू शकणार आहे. मल्ल्याचं प्रत्यार्पण करावं, अशी मागणी भारतानं केल्यानंतर
ब्रिटीश पोलिसांनी ही
कारवाई केली असून, मल्ल्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला
असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे.
****
ऑनलाईन पध्दतीनं रेल्वे तिकीट घेतल्यास
त्यावरील सेवाकरातून सूट देण्याची सवलत मार्च २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. मागच्या
वर्षी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर, ऑनलाईन पध्दतीनं तिकीट
घेण्यास प्रोत्साहन मिळावं, यासाठी सरकारनं ही सवलत जाहीर केली होती.
या निर्णयामुळे ऑनलाईन पध्दतीनं तिकीट घेणाऱ्या प्रवाशांचे प्रत्येक तिकिटामागे वीस ते चाळीस रूपये वाचणार
आहेत.
****
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे
कर्मचारी येत्या सतरा तारखेपासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार
संघटनेनं या संपाची घोषणा केली आहे.
****
No comments:
Post a Comment