Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 14 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- भारतनेटच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण, आरोग्य, आणि शेतीबाबतची माहिती गावागावापर्यंत पोहोचवणार - केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद
- संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत, येत्या अधिवेशनात सरकारला कामकाज करू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा
- पैठणच्या जायकवाडी आणि माजलगाव धरणातून रबी आणि उन्हाळी पिकांसाठी प्रत्येकी चार वेळा पाणी सोडण्याचा निर्णय
आणि
- जालना जिल्ह्यात बीड-औरंगाबाद महामार्गावर एक कोटी सहा लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त
****
भारतनेटच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण,
आरोग्य, शेती आदींबाबतची माहिती गावागावापर्यंत पोहोचणार असल्याचं, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये, जलदगती ब्रॉड बॅण्ड
इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतनेट, या योजनेच्या दुसऱ्या,
आणि अंतिम टप्प्याचा शुभारंभ काल नवी दिल्लीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या योजनेद्वारे येत्या मार्च २०१९ पर्यंत देशातल्या एकूण दीड लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्ड
सेवेनं जोडण्यात येणार आहे.
****
काश्मीरमधल्या वैष्णव देवीला
जाणाऱ्या भाविकांच्या संख्येवर राष्ट्रीय हरीत लवादानं, मर्यादा घातली असून, आता दररोज
फक्त ५० हजार भाविकचं देवीचं दर्शन घेऊ शकतील. देवीच्या दर्शनासाठी बनवण्यात आलेल्या
नवीन मार्गावरून फक्त पायी जाणारे भक्त आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्याच जाऊ शकतील,
असा खुलासाही आदेशात करण्यात आला आहे. घोडे अथवा, पालख्यां मधून जाणाऱ्यांवर बंदी
घालावी, अशा आशयाच्या एका याचिकेवर सुनावणी काल झाली, तेव्हा लवादानं हे आदेश दिले.
****
लोकप्रतिनिधींद्वारे करण्यात
येणाऱ्या, जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं काम अधिक प्रभावीरित्या होण्यासाठी,
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेत सुसंवाद, तसंच समन्वयाला प्राधान्य द्यावं, असे
निर्देश विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या प्रमुख, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले
आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीत
त्या काल बोलत होत्या. विविध विभागांकडे प्राप्त होणाऱ्या लोकप्रतिनीधींच्या पत्रांना
सात दिवसाच्या आत पोच देऊन, योग्य ती कार्यवाही
दोन महिन्याच्या आत करुन, त्याबाबत अहवाल द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी
केली.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांची
चेष्टा केली असून, संपूर्ण कर्ज माफी होईपर्यंत, येत्या अधिवेशनात सरकारला कामकाज करू देणार नाही, असा इशारा, राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं शेतकरी मेळाव्यात
ते काल बोलत होते. आष्टी तालुक्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते, बाळासाहेब आजबे यांनी
काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानिमित्त हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात
आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारच्या कामकाजावर नाराजी
व्यक्त करत, अधिवेशनात याचा जाब विचारणार असल्याचं सांगितलं.
****
सांगली पोलिसांच्या मारहाणीत
मृत्यूमुखी पडलेल्या, अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. काल त्यांनी कोथळे यांच्या कुटुंबियांची
भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. सांगली शहर पोलिसांनी केलेलं हे कृत्य, क्रौर्याची
सीमा ओलांडणारं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील कायदा
आणि सुव्यवस्थेची ही भयावह परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीनं सांगलीत
येऊन कोथळे कुटुंबियाला आधार देण्याची गरज आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. राज्य शासनाकडून कोथळे कुटुंबियांना
आवश्यक ती मदत केली गेली नाही, तर प्रदेश कॉंग्रेसकडून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत
केली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरू यांची १२८ वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्त आज
देशभरात त्यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे. पंडीत नेहरू यांची जयंती बालदिन म्हणूनही साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानंही
बालकांसाठी स्पर्धा तसंच माहितीपूर्ण कार्यक्रमांचं सर्वत्र आयोजन करण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य उर्दू अकादमीचे, २०१५
आणि २०१६ वर्षासाठीचे विविध पुरस्कार काल, अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांच्या
हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आले. मराठवाड्यातल्या अनेक साहित्यिक, समिक्षक, शिक्षक
तसंच पत्रकारांना विविध श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये औरंगाबादचे नुरुल
हसनैन, असवद गौहर, डॉ कीर्ती जावळे, डॉ शर्फु निहार, अब्दुल वहीद, शेख मोहम्मद शरफुद्दीन,
डॉ अब्दुल अजीज, मोहम्मद अब्दुल हाई, डॉ सहर सईदी, इंतेकाज अफजल, बीडचे काझी मकदुम,
सबिहा बेगम, मोहसीन अहमद, सिद्दीकी मोहम्मद इरफान, अंबाजोगाईचे, डॉ अकोला गौस, लातूरचे
डॉ मोहम्मद खलील सिद्दीकी, नांदेडचे मोहम्मद इमामुद्दीन, परभणीचे डॉ सलीम मोहियोद्दीन,
यांचा त्यात समावेश आहे.
****
पैठणच्या जायकवाडी आणि माजलगाव धरणातून
रबी आणि उन्हाळी पिकांसाठी प्रत्येकी चार वेळा पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत
घेण्यात आला. या बैठकीस उपस्थित असलेले पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
यांनी निम्न दुधना प्रकल्पातलं पाणी, संपादीत क्षेत्राच्या बाहेर गेल्यानं झालेल्या
नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्याची तसंच
पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकांची दुरुस्ती तातडीनं करण्यात
मागणी केली.
****
जालना जिल्ह्यातल्या गोंदी
पोलिस ठाण्याच्या पथकानं काल बीड -औरंगाबाद महामार्गावर एका ट्रकमधून एक कोटी सहा लाख
रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला. या कारवाईमध्ये दोन संशयिताना ताब्यात घेण्यात
आलं आहे. कारवार्इबाबत पोलिसांनी अन्न प्रशासन विभागास माहिती दिली असून, रात्री उशीरापर्यंत
कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रस्ते बांधण्यासाठी
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी दिले आहेत. परभणी इथं काल खड्डेमुक्त रस्ते अभियानासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत
होते. रस्त्यांच्या दुरूस्तीची कामं त्वरीत पूर्ण करुन, परभणी जिल्हा १५ डिसेंबर पर्यंत
खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हिंगोली जिल्ह्यातले
रस्तेही खड्डे मुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या शेती पिकासाठी देण्यात येणारी कृषिपंपाची वीज जोडणी तोडण्यात येऊ नये, तसंच,
तोडण्यात आलेल्या जोडण्या त्वरीत सुरळीत कराव्यात, असे निर्देश,
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. नांदेड
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते.
****
औरंगाबाद
शहरातल्या नारेगाव इथल्या कचरा डेपोसंदर्भात, स्थानिक नागरिकांच्या असलेल्या तक्रारी
सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले
आहेत. औरंगाबाद महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाबाबत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते.
शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावण्यासाठी, प्रत्येक वॉर्डात कचऱ्यापासून
खत निर्मिती करणारं यंत्रं बसवण्याचा विचार करावा, असं ते म्हणाले.
****
विनाअनुदानित
शाळांना १०० टक्के अनुदान देण्याच्या मागणीसाठी काल औरंगाबाद इथं विनाअनुदानित शिक्षक,
शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं.
शिक्षकांच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना
देण्यात आलं.
*******
No comments:
Post a Comment