Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 13 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि अमेरिका यांच्यातील
संबंध आशियाई देशांसाठी खूप महत्वाचे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. फिलिपाईन्सची राजधानी मनीला इथं सुरु असलेल्या आसियान शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान
मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली,
त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ट्रंप यांनी आशियाई राष्ट्रांच्या दौऱ्यादरम्यान
भारताची स्तुती केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान सुरक्षेच्या
मुद्यावर चर्चा करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही
दबावाशिवाय नि:पक्षपातीपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय पोलिस सेवा २०१६ तुकडीच्या अधिकाऱ्यांना
संबोधित करताना ते बोलत होते. पोलिस सेवेत तंत्रज्ञान हे महत्वाचं साधन असून, आपल्या
जबाबदाऱ्या पार पाडताना पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत होत असल्याचं ते म्हणाले. नागरिकांना
संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहनही
राष्ट्रपतींनी यावेळी केलं.
****
भारतनेटच्या माध्यमातून डिजिटल
शिक्षण, आरोग्य, शेती आदींबाबतची माहिती गावागावापर्यंत पोहोचणार असल्याचं केंद्रीय
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये
जलदगती ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतनेट या योजनेच्या
दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा शुभारंभ आज नवी दिल्लीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत
होते. या योजनेद्वारे येत्या मार्च २०१९ पर्यंत देशातल्या एकूण दीड लाख ग्रामपंचायतींना
ब्रॉडबॅण्ड सेवेनं जोडण्यात येणार आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या सहा डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमीवर सोयी
सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिल्या आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. महापरिनिर्वाण
दिनानिमित्त चैत्यभूमी इथं येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क परिसरात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीमार्फत अल्पोपहार आणि भोजनाची सोय यंदाही
करण्यात येणार असून, या काळात या परिसरात स्वच्छता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
****
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यामधल्या
भ्रमणध्वनीवरच्या संभाषणालाही राजशिष्टाचार लागू असल्याचं विधान परिषद विशेषाधिकार
समितीच्या प्रमुख डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं आज त्यांच्या अध्यक्षतेखाली
समितीची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
आमदार आणि खासदारांच्या विकास निधीला दिरंगाई होत असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत
लेखी अहवाल देण्याचे तसंच लोकप्रतिनीधींनी मागवलेल्या माहितीला त्वरीत उत्तर देण्याचे
निर्देश देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. सध्या महाराष्ट्रात वेगळ्या राज्य निर्मितीची
मागणी मागे पडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या नारेगाव इथल्या
कचरा डेपोसंदर्भात स्थानिक नागरिकांच्या असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे
निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका घनकचरा
व्यवस्थापनाबाबत आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची दररोज
विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे यंत्रं बसवण्याचा
विचार करावा, असं ते म्हणाले.
****
रस्ते बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा
वापर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. परभणी
इथं आज खड्डेमुक्त रस्ते अभियानासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. रस्त्यांच्या दुरूस्तीची
कामं त्वरित पूर्ण करुन, परभणी जिल्हा १५ डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश
त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
विनाअनुदानित शाळांना १०० टक्के
अनुदान देण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद इथं विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या
वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांच्या विविध
मागण्यांचं निवेदन यावेळी उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्वर
महाराज यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटनेच्या वतीनं आज
सोलापूर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या
काळात कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी शहरातल्या विविध भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला होता.
****
No comments:
Post a Comment