Monday, 22 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 दिल्ली पोलिसांनी आज एका कारवाईत इंडियन मुजाहीद्दीन तसंच सिमीच्या दहशतवाद्याला अटक केली. अब्दुल सुबहान कुरेशी असं त्याचं नाव असूब, तो २००८ साली गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

 जम्मू काश्मीरमधल्या आर एस पुरा, कनाचक, पर्गवाल आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा केला, यात एक नागरिक ठार तर अनेक जण जखमी झाले. काल संध्याकाळी सहा वाजेपासून पाकिस्तानी सैन्यानं राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत तसंच जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार करत भारतीय चौक्या तसंच नागरी क्षेत्राला लक्ष्य केलं. या हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. गुरुवारपासून पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हल्ल्यात पाच जवान, तसंच सात नागरिकही ठार झाले, तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

****

 उद्योगपती विजय मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पणासंदर्भात दाखल खटल्याची सुनावणी लंडनच्या एका न्यायालयात आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. गेल्या सुनावणीत भारतानं सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी केली नसल्यामुळे काही निकाल लागला नव्हता. प्रत्यार्पण वॉरंटवर विजय मल्ल्याचा जामिन दोन एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून मल्ल्या विदेशात पळून गेल्यामुळे भारतानं मल्ल्याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली आहे. भारतानं आता न्यायाधीशांना अपेक्षित असलेल्या सगळ्या बाबींचं स्पष्टीकरण दिलं असून, यात मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात मल्ल्याला नियमित आरोग्य सेवा प्रदान करण्याबाबातही स्पष्टीकरण दिलं असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

****

 संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास न्यायालयानं संमती दर्शवली आहे. पद्मावत हा चित्रपट येत्या २५ तारखेला संपूर्ण देशाभरात प्रदर्शित होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिनेमॅटोग्राफ कायद्याच्या कलम सहा अन्वये राज्य सरकारला कोणत्याही वादग्रस्त चित्रपटाचं प्रदर्शन थांबवता येत असल्याचा दावा या राज्यांनी केला आहे.

****

 विचार, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी लुडबुड करू नये, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. राजकीय आणि सामाजिक जीवनात कवि, साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंतांचं स्थान मोठं असून, लिखाणातून समाजजीवनावर प्रभाव पडत असतो, असं त्यांनी सांगितलं.

****

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिमा कोरेगाव इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत्यू झालेल्या योगेश जाधव या तरुणाच्या कुटुंबियांची नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या आष्टी इथं भेट घेतली. जाधव याच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीनं पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून जाधव कुटुंबियाना शेतजमीन, घरकुल, मयताच्या लहान भावास नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, योगेशच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं ते म्हणाले.

****

 अहमदनगर जिल्ह्यात टाकळीमिया इथं ऊसाच्या फडाच्या जवळ खेळत असलेल्या नितीन राठोड या पाच वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या मुलाचे आई वडील ऊसतोड करत होते. या बालकाला राहुरी इथल्या दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

****

 राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टीसह १६ गावांचा विकास करण्यासाठी १८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं आहे. परतूर तालुक्यातल्या मौजे परतवाडी, हास्तुरतांडा, रायगव्हाण आणि फुलवाडी इथं विविध विकासकामांचा शुभारंभ लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आष्टी इथं कृषी माल उद्योग प्रक्रिया समूह वसाहत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि दीवीज शरण यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज ऑस्ट्रेलियाच्या ऑलिवर मराच आणि क्रोएशियाच्या मेट पॅविच या जोडीशी होणार आहे. दुसरीकडे दीवीज शरण आणि त्याचा जोडीदार अमेरिकेचा राजीव राम ही जोडी ब्राझीलच्या मार्सेलो मेलो आणि पोलंडच्या लूकास्ज कुबोट यांच्या विरुध्द खेळणार आहे. लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीला काल उपांत्य पूर्व सामन्यात पराभव पत्करावा झाला होता.

****

***




No comments: