Monday, 26 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.02.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००

****

 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशूपालन तसंच दुग्धोत्पादन अशा, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे.

 राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत विधान भवनात राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना,  गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, तसंच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसह राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणातून घेतला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मात्र राज्यपालांचं भाषण सुरू असतानाच, सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

 दरम्यान, २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प येत्या नऊ मार्चला सादर होणार असून, राज्यातल्या सध्याच्या समस्या आणि त्यावरचे उपाय, यासंदर्भात या अधिवेशनात प्रामुख्यानं चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.

 अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत एकूण सोळा विधेयकं मांडली जाणार असल्याचं सांगितलं. कर्जमाफीसाठी ज्यांना अर्ज भरता आला नाही, अशा शेतकऱ्यांना येत्या एक मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आणखी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं. शेतकरी कर्जमाफी योजना अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले.

****

 जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात काल पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा उखळी तोफांमधून मारा केला. काल संध्याकाळच्या सुमारास नौशेरा क्षेत्रातल्या रहिवासी भागात आणि भारतीय चौक्यांवर पाकिस्ताननं अंधाधुंद गोळीबार केल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं. सीमेवर तैनात लष्कराच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

****

 औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगाव इथं आयोजित मुस्लिम धर्मियांच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाचा आज दुपारी समारोप होत आहे. कालच्या दुपारच्या नमाजनंतर, चार हजार ७०० जणांचा सामुहिक विवाह सोहळाही काल या ठिकाणी पार पडला.

*****

***


No comments: