Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या
दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना
उत्तीर्ण होण्यासाठीच्या किमान गुणांमधे एकवेळ सूट बहाल करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. केवळ यंदाच्या तुकडीसाठीच उत्तीर्ण
होण्यासाठी एकूण ३३
टक्के गुणांचा निकष
लावण्यात येणार आहे. त्यांना मंडळाची परीक्षा आणि
अंतर्गत तपासणी परीक्षांमधे वेगवेगळे ३३ टक्के गुण मिळवावे लागणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्या एक मार्चपासून सुरुवात होत आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता
प्रवेश परिक्षा - नीट साठी केंद्रांची संख्या १०७ वरुन १५० करण्यात आली असल्याचं केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. या परीक्षेसाठी राज्यात सहा
केंद्रं वाढवण्यात आली आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजी
देसाई यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना
आदरांजली अर्पण केली आहे. देसाईंची निष्ठा आणि नि:स्वार्थ समर्पण युवकांना नेहमीच प्रेरणा
देत राहील, असं त्यांनी आपल्या ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांच्या पार्थिव देहावर
आज दुपारी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, श्रीदेवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत सेलिब्रेशन
क्लब इथं त्यांचे चाहते तसंच सिनेसृष्टीतल्या अनेकांनी गर्दी केली आहे. गेल्या शनिवारी
त्यांचं दुबईत निधन झालं, त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल रात्री त्यांचं
पार्थिंव मुंबईत दाखल झालं.
****
मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमचा
भाऊ इकबाल कासकर याच्या पोलिस कोठडीत ठाणे पोलिसांनी येत्या सहा मार्चपर्यंत वाढ केली
आहे. कासकर याच्यासह त्याच्या साथीदारांना ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये
अटक केली होती आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. सध्या
तो ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे.
****
सरकारनं हज यात्रेसाठी विमानाच्या तिकीटांच्या किमतीत
कपात केली आहे. या किमतीत २० हजार रुपयांपासून ९७ हजार रुपयांपर्यंत कपात केली जाणार
असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. . ****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी
नीरव मोदी याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावं, अशी मागणी सक्तवसूली संचालनालयानं मुंबईतल्या विशेष
न्यायालयात केली आहे. नीरव मोदीच्या परदेशातल्या व्यवसायाची तसंच मालमत्तांची माहिती मागणारी
कायदेशीर पत्र सहा देशांना पाठवण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिली आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उभारण्यात आलेलं
हे विशेष न्यायालय आज नीरव मोदीच्या अनुपस्थितीविषयी त्याच्या वकीलाची बाजू ऐकणार
आहे.
****
अन्नधान्याचं उत्पादन २०१७-१८ या वर्षात २७७ पूर्णांक ४९ दशलक्ष टन इतकं विक्रमी होईल अशी अपेक्षा सरकारनं
व्यक्त केली आहे. मागील वर्षात हेच उत्पादन २७५ पूर्णांक ११ शतांश दशलक्ष टन इतकं होतं. यंदा डाळींचं उत्पादन ८२ शतांश मेट्रिक टनांनी वाढून २३ पूर्णांक ९५ मेट्रिक टन होईल अशी अपेक्षा आहे. कडधान्यांच्या उत्पादानात वाढ तर तेलबियांच्या
उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे.
****
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने बनावट
फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाविरोधात जालना इथं सायबर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील सुनील अग्रवाल असं या तरुणाचं
नाव असून, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. अर्थमंत्र्यांच्या नावाने पक्षातील
काहीजणांना फ्रेंड रिक्वेस्ट मैत्री विनंती प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
वरिष्ठ पातळीवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
****
२०१९ या वर्षाच्या अखेरपर्यंत अहमदनगर - बीड - परळी
रेल्वेमार्गाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे यांनी काल विधानभवन इथं या रेल्वेमार्गासंदर्भात आढावा
बैठक घेतली त्यावेळी, त्या बोलत होत्या. बीडमधल्या राष्ट्रीय महामार्गांची कामं अधिक
वेगानं आणि गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*****
***
No comments:
Post a Comment