Thursday, 12 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.07.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या नाणार प्रकल्पावरुन विधान सभेत आज सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी लाऊन धरत शिवसेनेसह विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणा बाजी केली. प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधकांनी या मुद्यावर चर्चेची मागणी लाऊन धरली. पुढच्या पिढ्या उध्वस्त करण्यासाठी हा प्रकल्प असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल प्रभू यांनी केला. या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं होतं. 

****



 बचतगट देशातल्या ग्रामीण भागात विशेषत: लहान व्यवसाय आणि कामगारांसाठी महत्वाची भुमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज देशभरातल्या विविध बचत गटांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. बचत गट हे गरीब महिलांसाठी आर्थिक आधार असल्याचं ते म्हणाले. देशभरातल्या अडीच लाख ग्रामपंचायतींच्या करोडो गरीब कुटुंबांना उपजिविकेसाठी अनेक संधी उपलब्ध करुन देणं, हे राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका मिशन अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजनेचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या महिलांना सशक्त बनवणं ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून ओळख असणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचं आज पुणे इथं निधन झालं, ते ९९ वर्षांचे होते. जगप्रख्यात अध्यात्मिक गुरु असलेले वासवानी यांनी मानवता, शांतता, प्राणी हक्क आणि शाकाहारचा संदेश दिला. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव साधू वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

****



 जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्याच्या कांदी जंगलात सुरु असलेल्या दहशतवादी विरोधी अभियानात आज एक अज्ञात दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. काल याच परिसरात झालेल्या गोळीबारात लष्कराचे कमांडो शहीद झाले. दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम अजुनही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 ई कॉमर्स क्षेत्राला नियंत्रित करण्यासाठी भारत नियम तयार करत असल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्र व्यापार विकास परिषदेतल्या बैठकीत ते  बोलत होते. भारतात दरवर्षी ५१ टक्क्यांच्या दरानं हे क्षेत्र वाढत असून, ते नियंत्रित ठेवण्यासाठी कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 फरार हिरे व्यापारी निरव नोदी आणि मेहुल चोकसी यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं मुंबईच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पीएनबी घोटाळ्या प्रकरणी अलिकडेच लागू करण्यात आलेल्या फरार आर्थिक अधिनियमा अंतर्गत दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या असून, त्यांची साडे तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

****



 मुंबईत पावसानं उघडीप दिल्यामुळे, गेले चार दिवस पावसाच्या तडाख्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, रेल्वे मार्गावर पाणी साठल्यानं विस्कळीत झालेली रेल्वे सेवा सुरळीत सुरु झाली आहे. गेल्या दहा दिवसांत मुंबईत सुमारे ८६५ मिलीमीटर पाऊस झाल्याचं वामान खात्यानं सांगितलं आहे. पावसाळा सुरु झाल्या पासून आता पर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे. येत्या शनिवार पर्यंत मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस चालूच राहण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.



पालघर जिल्ह्यात पालकमंत्री विष्णु सावरा यांनी अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागाची पाहणी केली. नागरिकांना प्रशासना मार्फत सर्व त्या प्राथमिक सोयी सुविधा पुरवल्या जात असून, पावसाचं पाणी ओसरल्यानंतर बाधित क्षेत्रांचे पंचनामे करणार असल्याचं सावरा यांनी सांगितलं.



 नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातल्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 फिनलँड इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील आय ए ए एफ जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय धावपटू हेमा दासनं महिलांच्या चारशे मीटर प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अन्य भारतीय धावपटू जिस्मा मॅक्यू हिला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

****



 भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत असून, पहिला सामना नॉटिंगहम इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका भारतानं दोन - एक अशी जिंकली आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...