Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 15 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जुलै २०१८
सकाळी ६.५० मि.
****
Ø शासकीय सेवेतलं
बढतीमधलं आरक्षण
अबाधित ठेवण्यासाठी सरकार नवं विधेयक आणणार- केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
Ø नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम- पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण
Ø शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय
नृत्यांगना सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर नियुक्ती
Ø थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी
व्ही सिंधू महिला एकेरीच्या
अंतिम फेरीत दाखल, दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट
सामन्यात भारताचा इंग्लंड कडून ८६ धावांनी पराभव
आणि
Ø विश्वचषक फुटबॉल
स्पर्धेत फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात आज अंतिम सामना
****
शासकीय सेवेत बढती मधलं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकार
नवं विधेयक आणण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबाद मध्ये माध्यमांशी बोलत होते. संसदेच्या
येत्या हिवाळी अधिवेशना मध्ये हे विधेयक मांडण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले. अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचं रक्षण
करण्यासाठी सरकार अध्यादेश काढण्याचा विचार करत असल्याचंही आठवले यावेळी म्हणाले.
सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वी इतर मागासवर्गीय
प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा सरकार विचार करत असल्याचंही आठवले म्हणाले.
****
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे इथं ते
काल वार्ताहरांशी बोलत होते. समृद्धी महामार्ग
आणि नाणार प्रकल्पाचा मुद्दा वेगळा असून, हा प्रकल्प होऊ देणार नसल्याबाबत, शिवसेना ठाम असल्याचं ते म्हणाले. सरकारनं
गेल्या वर्षी जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसून, शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
राज्य सभेवर
चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. यात शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा,
शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा
समावेश आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, सामाजिक कार्यकर्त्या अनु आगा आणि प्रसिद्ध
वकील के परासरन यांचा कार्यकाळ संपल्यानं सदनातल्या चार
जागा रिक्त झाल्या होत्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२९ जुलैला आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग असेल.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य
एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
थकीत वीज देयकामुळं जालना जिल्ह्यातल्या
१४९ गावांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी काल जालना इथं ही माहिती दिली. जून महिन्याच्या अखेरीस या गावांचा
वीज पुरवठा थकीत वीज देयकामुळं महावितरणनं खंडित केला होता. जिल्ह्यातल्या अनेक शिष्टमंडळांनी
लोणीकर यांना भेटून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जिल्ह्यातल्या
विद्युत विकासावर भर देण्यात येत असून जिल्ह्यासाठी ३३ केव्हीची ४९ केंद्र प्रस्तावित
करण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी यावेळी दिली.
****
राज्यात सुरू करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड
मोहिमेत लातूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, तसंच
स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सक्रीय सहभाग नोंदवण्याचं आवाहन
जिल्हाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. काल लातूर इथं आयोजित आढावा
बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, १३ जुलै पर्यंत जिल्ह्यात ३६ लाख वृक्ष लागवड करून उद्दिष्टाच्या
११० टक्के काम करून लागवड मोहिमेत सध्या राज्यात आघाडी घेतल्या बद्दल त्यांनी प्रशासनाचं
कौतुक केलं.
****
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातला परिसर आणि सभागृहाच्या सुशोभिकरणाचं उद्घाटन काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते
झालं. विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर,
जिल्हाधिकारी उदय चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी
बागडे यांनी कार्यालयातल्या सभागृहाच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालया प्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाचा दर्जा सुधारण्याच्या सूचनाही
त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी केल्या.
****
अमरनाथ यात्रेला गेलेल्या दोन भाविकांचा काल हृदविकाराच्या
झटक्यानं मृत्यू झाला. यापैकी एक जण औरंगाबाद शहरातले रहिवाशी असून पुंडलिकराव माकोडे
असं त्यांचं नाव आहे. दुसरा भाविक राजस्थान मधल्या उदयपूरचे रहिवाशी आहेत. अमरनाथ यात्रेत
यावर्षी आतापर्यंत २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयांन तयार
केलेल्या जनसेतू या ॲपचं उद्धाटन काल औरंगाबाद इथं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया
रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. महिलांवरील अत्याचार, अपघात, चोरी, वाहतूक कोंडी वृद्ध व्यक्तींना मदत या आणि इतर अनेक समस्यांसाठी
या ॲपचा नागरिकांना उपयोग होणार असून पोलिस अधिक्षक आरती सिंह यांच्या संकल्पनेतून
हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात पॅनिक कॉलची सुविधा असून एका क्लिकवर पोलिसांची मदत
मिळणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. काल
झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया
मारिस्का तुनजुंग हिचा २३ - २१, १६
- २१, २१ - ०९ असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहाराशी होणार
आहे.
****
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात
काल इंग्लंडनं भारताचा ८६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १- १ अशी बरोबरी
केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघांनं जिंकण्यासाठी भारता समोर
३२३ धावांच उद्दिष्ट ठेवलं. मात्र निर्धारीत ५० षटकात भारत २३६ धावांचं करू शकला.
****
रशियातल्या मॉस्को इथं आज विश्वचषक
फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात खेळला जाणार आहे. क्रोएशियानं
प्रथमच तर फ्रान्सनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
धडक मारली आहे.. रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार असून हा चषक कोण पटकावणार
याकडं फुटबॉल प्रेमीचं लक्ष लागल आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत
करत बेल्जियमनं स्पर्धेतलं तिसरं स्थानं पटकावलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव नगरपचांयतीच्या नवीन
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २४ जुलैला नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होईल. विद्यमान
पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानं ही निवडणूक होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ४८८ गावामंध्ये उद्यापासून
अति विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. गर्भवती आणि शून्य ते
दोन वर्ष वयोगटातल्या बालकांसाठी असलेल्या या मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हापरिषदेच्या
आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेत काल
साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
उघड्यावरील मांस तथा खाद्य विक्री बंद करणं, शहरातल्या
दवाखान्यांमध्ये साथीच्या रूग्णांना मोफत सेवा देणं, रूग्णांना
तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीनं नियंत्रण कक्ष उघडणं यासह विविध निर्णय
घेण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
शासनाच्या १३ कोटी वृक्ष मोहिमेअंतर्गत
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात काल वृक्षारोपण करण्यात आलं. आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास महामंडाळाचे
अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार
घोडेले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह
मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं काल लोणंद
इथला मुक्काम आटोपून तरडगाव कडे प्रस्थान केलं. तरडगाव
कडे जात असताना प्रथेप्रमाणे पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं साजरं झालं.
देहूहून
निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल सणसर
इथं होता. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी काल उस्मानाबाद जिल्ह्यात दांडेगाव मुक्कामी पोहोचली, पालखी आज अनाळे मार्गे पंढरपुराकडे प्रयाण करेल, या प्रवासा
दरम्यान, नागरडोह इथं पालखीचा तिसरा रिंगण सोहळा आज होणार आहे.
****
औरंगाबाद इथं जगन्नाथ
रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला. सिडको परिसरातल्या जगन्नाथ मंदिरातून ही
यात्रा सुरू झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा
यांच्या मूर्ती ठेवलेला, फुलांनी सुशोभित रथ ओढण्यासाठी,
भाविकांनी गर्दी केली होती. पुढचे
सात दिवस चालणाऱ्या या रथयात्रेचा २२ जुलैला समारोप होणार आहे.
****
राज्यात काल
अनेक भागात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर
आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जालना शहरासह बदनापूर,
परतूर, मंठा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातही
काल सलग तिसऱ्या दिवशी सर्वत्र पावसानं हजेरी लावली. नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरु असून,
धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात इतर ठिकाणी
पावसाचं प्रमाण काल कमी झालं असलं, तरी
किनारपट्टीवर जोरदार वादळी वाऱ्यांमुळे उधाण आलं आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात
आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment