Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 18 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जुलै २०१८
सकाळी ६.५० मि.
****
Ø जमावाकडून होणारे हिंसक हल्ले रोखण्यासाठी नवीन कायदा
करण्याचा विचार करावा - सर्वोच्च न्यायालयाची संसदेला सूचना
Ø संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात
Ø दूध आंदोलन प्रकरणी
तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारचं चर्चेचं आवाहन
Ø उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय
स्थापन होणार
आणि
Ø समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या
अनेक धरणांच्या साठ्यामध्ये वाढ
****
जमावाकडून होणाऱ्या हिंसक हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी
संसदेनं नवीन कायदा करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. देशभरात
विविध कारणांवरून होत असलेल्या हिंसक घटना रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात
अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे, या याचिकेवर सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. जमावा कडून होणारे
क्रूर हल्ले ही समाजाची सवय होऊ नये यासाठी कठोर कारवाई करत त्यांचा बिमोड करणं अत्यावश्यक
असल्याचं निरीक्षण न्यायालयानं या सुनावणी दरम्यान नोंदवलं. यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक
उपाय योजना आणि दंडात्मक तरतुंदींविषयक सूचनाही न्यायालयानं केल्या आहेत. या प्रकरणी
पुढील सुनावणी २८ ऑगस्टला होणार आहे.
****
संसदेचं पावसाळी
अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. दहा ऑगस्ट पर्यंत
चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पार्श्व
भूमीवर केंद्र सरकारनं काल
सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं
कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत
करण्यात आलं. लोक सभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देखील काल
संध्याकाळी सर्व पक्षीय बैठक घेतली. या अधिवेशनात सरकारची विविध मुद्यांवर कोंडी करण्याची
रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही दिल्लीत
बैठक झाली.
****
राज्य
सरकार दूध उत्पादक आंदोलनकर्त्यांशी चर्चेला तयार असून, या
प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं संबंधित नेत्यांनी चर्चेला यावं असं आवाहन दुग्धविकास
मंत्री महादेव जानकर यांनी काल विधान परिषदेत केलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी
पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन
चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातले साठ टक्के दूध संघ खाजगी असल्यामुळे
शेतकऱ्यांच्या खात्यात दुधाचं थेट अनुदान देणं शक्य नाही, असं
त्यांनी स्पष्ट केलं. दूध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान दोन
महिन्यां ऐवजी पाच महिन्यां पर्यंत देण्यात येईल अशी घोषणा जानकर यांनी केली.
****
दरम्यान, सरकार
कडून चर्चे साठी कोणतही आमंत्रण आलं नसल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. गुजरातहून
मुंबईकडे दूध वाहतूक करणारे टँकर पालघर जिल्ह्यातल्या दापचरी इथं संघटनेनं अडवले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते
दरम्यान, काल उत्तर महाराष्ट्रातून दुधाचे ६६ टँकर
पोलीस बंदोबस्तात मुंबईस रवाना झाले.
काल सकाळी जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातून विदर्भात जाणारं, पाच
हजार लीटर दूध, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड़ा विदर्भ सीमेवर, सिंधी
इथं रस्त्यावर ओतून दिलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात आणि कोकणात वैद्यकीय शिक्षण
महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल
विधान परिषदेत केली. पुढच्या
शैक्षणिक वर्षात ही महाविद्यालयं सुरू होतील. वैद्यकीय शिक्षणातलं प्रादेशिक आरक्षण रद्द करावं, तसंच
मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून जागा वाढवाव्यात अशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी केली. त्याला उत्तर देताना महाजन
यांनी, हे आरक्षण १९८५ पासून लागू असून, तत्कालीन
सरकारनं मराठवाड्यात एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं नाही, असं
सांगितलं. यावर विरोधकांनी आक्षेप घेत
मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी केली.
****
राज्यातल्या अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची
शिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत देण्यात येईल, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बरोबरच महाविद्यालयाच्या
निधी संदर्भातही लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
****
डोंगराळ भागासह सर्वच माध्यमिक शाळांना सद्य स्थितीत,
संच मान्यते मध्ये २० विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक मंजूर करण्यात येत असल्याची माहिती,
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य दत्तात्रय सावंत यांनी
मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक
रत्नाकर गुट्टे यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी काल विधान परिषदेत केला. गुट्टे यांनी बनावट कंपन्यांची नोंदणी करून बँकांची
आणि शेतकऱ्यांची साडेसात हजार कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचं, मुंडे म्हणाले.
****
पीक
विमा तसंच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाईपोटी, ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट
रक्कम जमा झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते.
मुंबई
इथल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या
महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
विकास हक्क हस्तांतरण - टीडीआर संदर्भातली
प्रक्रिया पारदर्शी आणि सुटसुटीत करण्याच्या सूचना महानगर पालिकांना देण्यात येतील, असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. औरंगाबाद महानगर पालिकेच्या या संदर्भातल्या तक्रारी बाबत
तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल, असं ते म्हणाले.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही दुरुस्ती बाबत जिल्हा
शल्य चिकित्सक यांच्या मार्फत कारवाई सुरु असून, सुरक्षे
बाबत संबंधितांस सूचना देण्यात आल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या
रुग्णालयातून नवजात बालिका पळवल्या संदर्भात पोलीस तपास करत असल्याचं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात अनेक भागात काल मुसळधार
पाऊस झाल्यानं अनेक धरणांच्या साठ्यात वाढ झाली.
सातारा
जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून काल दुपारी
धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग
सुरु करण्यात आला आहे.
अहमदनगर
जिल्ह्यातल्या मुळा धरणातला पाणीसाठा ३६ टक्के, तर
भंडारदा धरणातला पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. निळवंडे
धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं,
जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात काल सायंकाळपर्यंत सात हजार ७५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु होती. धरणातला
पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
औरंगाबाद इथं सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन ॲग्रिकल्चर अँड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज -
सीटाच्या वतीनं शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरण या विषयावर काल
एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं. शेतकऱ्यांना ई-साक्षर करणं गरजेचं असल्याचं मत सीटाचे कार्यकारी संचालक फिरोज मसानी यांनी
यावेळी व्यक्त केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव पोलीस ठाण्यातला पोलिस
शिपाई अशोक गाढे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल तीन लाख रुपये लाच
घेताना अटक केली. त्याचा साथीदार शिर्डी पोलीस ठाचा जमादार अल्ताफ अहमद शेख फरार झाला
आहे. एका चोरीच्या प्रकरणात आरोपी करण्याची धमकी देऊन या दोघांनी सात लाख रुपये लाच
मागितली होती.
कोल्हापूर इथं ‘भारत राखीव बटालियन ३’च्या उपअधीक्षकासह
सहा जणांना काल लष्करी जवानांकडून चाळीस हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. यामध्ये
एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि लिपिकाचा समावेश आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेत्री रिता भादुरी यांचं काल
पहाटे मुंबईत निधन झालं. त्या
६२ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंडांच्या आजारानं त्रस्त
असलेल्या भादुरी यांच्यावर दोन आठवड्यांपासून मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू
होते, काल पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
क्रिकेट - इंग्लंड इथं झालेली तीन एकदिवसीय सामन्यांची
मालिका इंग्लंडनं दोन एक अशी जिंकली आहे. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं
भारताचा आठ गडी राखून पराभव केला.
****
पश्चिम
रेल्वेच्या राजकोट-ओखा सेक्शन मधल्या कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वे रूळ वाहून
गेल्यानं, ओखा रामेश्वरम एक्सप्रेस काल
रद्द करण्यात आली होती. परिणामी ही गाडी आज
मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे धावणार
नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं
आहे.
****
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये
चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्यानं, या कर्मचाऱ्यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे. यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात
योग्य तो न्याय देण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल नागपूर
इथं पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment