Sunday, 1 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.07.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 July 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****

उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यात एका बस दुर्घटनेत आज ३५ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अन्य चार जखमी झाले. धूमकोटहून मनकोटला जाणारी ही बस पिपली - भोन मार्गावर दोनशे फूट खोल दरीत कोसळली. पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी येथे बचाव कार्य करत आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

****

वस्तू आणि सेवा कर- अर्थात जीएसटी कर प्रणाली लागू झाल्याला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरात जीएसटी दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त नवी दिल्लीत साजऱ्या करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यापारी समुदायाच्या प्रतिनिधींनी आपले या करासंदर्भातले अनुभव सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी यावेळी बोलताना, जीएसटीला यशस्वी केल्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले.

****

विधानसभेच्या, येत्या चार तारखेपासून नागपूरमध्ये सुरू होणार असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष सरकारला नाणार प्रकल्प आणि शेतकरी कर्ज माफी, या मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय प्लॅस्टिकबंदी आणि बुलेट ट्रेन हे मुद्देही विरोधी पक्ष उचलून धरतील, असा अंदाज पीटीआय वृत्तसंस्थेनं व्यक्त केला आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची अपेक्षा आहे, तसंच शेतकऱ्यांना जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी आणि महामार्गांसाठीच्या जमिनी वेगानं संपादित करण्यासाठी, यासंदर्भातल्या नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील अशीही अपेक्षा आहे. भाजपानं हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडेल अशी आशा व्यक्त करत, सरकार विरोधी पक्षांशी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

****

दरम्यान, विधानसभेचं हे अधिवेशन सुरू असतानाच, विधान परिषदेच्या, २७ जुलैला रिक्त होणार असलेल्या अकरा जागांसाठीची निवडणूक सोळा जुलैला होणार आहे. निवृत्त होणाऱ्या अकरा सदस्यांमध्ये तीन सदस्य काँग्रेसचे, चार राष्ट्रवादी काँग्रेसचे, दोन भाजपचे तर प्रत्येकी एक सदस्य शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. विधानसभेमध्ये भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष असून, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन उमेदवार असू शकतील.

****

कायम खाते क्रमांक-पॅन कार्ड, आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्याचा निर्णय काल केंद्र सरकारनं घेतला आहे. काल ही मुदत संपणार होती. आतापर्यंत पाचवेळा ही मुदत वाढवण्यात आली आहे.

****

खराब हवामानामुळं थांबवण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज जम्मूहून पुन्हा सुरू झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६८७७ भाविकांची चौथी तुकडी पहलगाम आणि बालटालकडे कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली आहे. साठ दिवसांच्या या यात्रेचा समारोप २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे. 

****

आकाशवाणीच्या औरंगाबाद आणि मुंबई केंद्रांवरुन प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळांमध्ये आजपासून बदल होत असून, औरंगाबाद केंद्रावरून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी प्रसारित होणारं बातमीपत्र आता संध्याकाळी सहा वाजता तर मुंबई केंद्रावरून दुपारी पावणेदोनला प्रसारित होणारं बातमीपत्र आजपासून दुपारी तीन वाजता प्रसारित होईल. तसंच, मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वासहाला प्रसारित होणारं डीटीएच बातमीपत्र आजपासून संध्याकाळी पाचला प्रसारित होणार आहे.

****

नाशिक इथल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. बँकेचे प्रशासक जे.एस.भोरिया यांनी काल पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली. या बँकेच्या अनियमित कामकाजामुळे साडेचार वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नियुक्त केले होते.

****

दुबई इथे झालेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारतानं चौथ्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. भारतानं काल इराणचा ४४-२६ अशा फरकानं पराभव करत हा किताब मिळवला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...