Thursday, 12 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.07.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 12 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

राज्यातल्या गरीब जनतेला कोणत्याही आजारासाठी अनुदानाऐवजी शंभर टक्के मोफत उपचार उपलब्ध करुन देणारी योजना, राज्य सरकार आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाच्या औषधावरील वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकारनं वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. हाफकिन संस्थेकडून होणारा औषध पुरवठा येत्या सहा महिन्यात सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

****

भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आणि या समाजात स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची, तसंच सामाजिक माध्यमांवर नियंत्रण आणण्याची मागणी आज विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. अशा घटनांबद्दल राज्य सरकारनं याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून काही लोकांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा आजही करण्यात आली. सरकार भटक्या विमुक्तांच्या पाठीशी असून, त्यांची जनगणना करुन त्यांना ओळखपत्र द्यायला पाहिजे, असं मत भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी मांडलं.

****

जलजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये एप्रिल २०१८ मध्ये ५३ हजार ५१२ पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली, त्यापैकी केवळ नऊ टक्के दूषित पाणी आढळलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातला नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत विधानसभेत आज शिवसेनेसह विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. यामुळे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू, साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे पी वासवानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वासवानी यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन आणि समाज सेवेप्रति त्यांचं समर्पण नेहमी स्मरणात राहणार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर वासवानी यांच्या निधनानं मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. वासवानी यांचं आज पुणे इथं निधन झालं, ते ९९ वर्षांचे होते.

****

भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डनं नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. गरीबीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याची, तसंच कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

पैठण इथून आषाढी वारीसाठी निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज पाटोद्याहून निघाली असून, दिघोळ इथं आज पालखीचा मुक्काम असेल. पालखीचं दुसरं रिंगण आज पारगाव घुमरे इथं पार पडलं. देहू इथून निघालेली संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज वरवंड इथून पाटसमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केलं, तर आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज वाल्हे मुक्कामी असेल.

****

लातूर शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांनी सांगितलं. लातूर शहरात केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसंच शहराच्या विकासाकरता येणाऱ्या अडचणी आणि सद्यस्थितीचा आढावा आज गायकवाड यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजानांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

****

नांदेडहून अकोला मार्गे अमृतसरला जाणारी साप्ताहिक रेल्वेगाडी येत्या २५ जुलै आणि एक ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. अमृतसर रेल्वे स्थानकावर १९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे ही गाडी रद्द करण्यात येत असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...