Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 2 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२ ऑगस्ट २०१८
दुपारी १.००
वा.
****
भारतात स्वच्छतेच्या क्षेत्रात
वेगानं प्रगती होत असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटानियो गुटेरस यांनी म्हटलं
आहे. राष्ट्रपती भवनात आज आयोजित महात्मा गांधी
आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. जगातल्या अनेक
भागात आजही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप
सिंह पुरी, पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यावेळी उपस्थित होते. स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या देशांनी एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचं
पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. गांधीजींनी स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेला प्राथमिकता
दिल्याचं ते म्हणाले. ‘स्वच्छ भारत पुरस्कारां’चं वितरण यावेळी करण्यात आलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांना अभिवादन केलं आहे. आज आपण गांधीजींच्या दिडशेव्या
जयंती वर्षात प्रवेश करत असून, गांधीजींच्या स्वप्नांना साकार करण्याची ही योग्य संधी
असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. तर लाल बहादूर शास्त्री हे सौम्य
व्यक्तिमत्व, कुशल नेतृत्व आणि साहसाचं प्रतिक होते, असं सांगून पंतप्रधानांनी, शास्त्रीजींना
अभिवादन केलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधल्या
रामगिरी इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री गांधी जंयतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा
संदेश पदयात्रेत सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद इथं गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं शहरात स्वच्छता सेवा संवाद यात्रा काढण्यात आली. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष
डॉ. भागवत कराड यांनी पीर बाजार चौकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करुन संवाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत कार्यकर्त्यांनी स्वच्छतेविषयी
जनजागृती करणारे फलक झळकावत घोषणा दिल्या. सिडको परिसरात आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत
ही यात्रा काढण्यात आली.
****
भारतीय किसान युनियननं कर्जमाफी, इंधन दर कपात या
प्रमुख मागण्यांसाठी काढलेला मोर्चा दिल्लीच्या सीमेवर पोहचला आहे. पोलिसांनी उत्तरप्रदेश
आणि दिल्लीच्या सीमेवर हा मोर्चा अडवल्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. पीटीआयनं दिलेल्या
वृत्तानुसार, हरीद्वारमधल्या टिकैत घाट इथं २३ सप्टेंबर रोजी हा मोर्चा सुरू झाला असून,
उत्तरप्रदेशमधले हजारो शेतकरी कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत.
****
पॅरिस हवामान बदलाच्या करारातल्या काही मुद्यांवर
पुन्हा विचार करण्यास भारतानं सहमती दर्शवली नाही. हा करार स्वीकारत करण्यात आल्याचं
भारतानं म्हटलं आहे. ऐतिहासिक हवामान बदल करारातून ट्रम्प सरकारनं माघार घेतल्यामुळे
भारतावर काही विपरीत परिणाम होणार नाही, असं पर्यावरण सचिव सी के मिश्रा यांनी म्हटलं
आहे. पॅरिस करारावर २०१५ मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, हवामान बदलामुळे होणाऱ्या
दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी विविध देशांची क्षमता वाढवणं, हा या कराराचा उद्देश
आहे.
****
माहितीचा अधिकार अधिनियमाचा उपयोग अर्जदार आणि प्रशासनातले
अधिकारी यांनी प्रगल्भपणे केला तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होवून विकासासाठी
हातभार लागू शकेल, असं राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी म्हटलं आहे. जागतिक
माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते.
माहिती अधिकार हे अमोघ शस्त्र असून, याचा उपयोग समाजातलं दु:ख, दैन्य आणि वेदना दूर
करण्यासाठी केला पाहिजे असंही त्यांनी पुढे नमूद केलं.
****
जॉर्जिया मधल्या बटूमी इथं सुरु असलेल्या जागतिक
बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुषांच्या गटात भारतानं इजिप्तचा पराभव केला. भारताच्या
विश्वनाथन आनंद आणि इजिप्तच्या बी अमिन यांच्यातला सामना अनिर्णित राहीला, मात्र काल
या स्पर्धेतल्या सातव्या सत्रात भारतानं इजिप्तपेक्षा जास्त गुण मिळवले. महिलांच्या
गटात भारत आणि जॉर्जियामधले सगळे सामने अनिर्णित राहीले.
****
तैपेई
इथं आजपसून सुरु होत असलेल्या चिनी तैपेई विश्वकरंडक बॅडमिंटन स्पर्धेत अजय जयराम
आणि सौरभ वर्मा या खेळाडूंवर भारताची मुख्य मदार असेल. मात्र, डेन्मार्क
खुली बॅडमिंटन स्पर्धा आणि फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धाही या महिन्यात होत
असल्यानं भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी
तैपेईच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
****
चंदीगढ इथं पार पडलेल्या राष्ट्रीय स्क्वॅश शालेय
क्रीडा स्पर्धेत हिंगोलीच्या रेवा नगरे हीनं१४ वर्ष वयोगटात कांस्य पदक पटकावलं. गेल्या
२५ ते २९ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली.
*****
***
No comments:
Post a Comment