Wednesday, 3 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



  चँपिअन्स ऑफ द अर्थहा सन्मान, पर्यावरण सुरक्षेसाठी भारतीयांच्या कटीबद्धतेचं प्रमाण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा हा पर्यावरण विषयक सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना आज नवी दिल्ली इथं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाश्वत विकास आणि हवामान बदलासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी यावेळी केलेल्या भाषणात, संयुक्त राष्ट्रसंघाचे आभार व्यक्त करत भारतासाठी हा गौरवाचा दिवस असल्याचं म्हटलं आहे. भारतानं पॅरिस हवामान बदल करारावर कोणत्याही दबावाखाली स्वाक्षरी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांसोबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रोन यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****



 दिल्लीतल्या किसान घाट परिसरात शेतकऱ्यांनी सुरु केलेलं आंदोलन आज पहाटे मागे घेतलं. आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर आंदोलनाच्या नेत्यांची काल चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण करावीत, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

****



 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी गौतम नवलखा यांची नजरकैद रद्द करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आज सकाळी यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आल्याचं राज्य सरकारच्या वकीलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

****



 राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी खोट्या बातम्या पसरवत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख अनिल बालुनी यांनी केला आहे. गांधी यांचा खोटेपणा प्रत्येकवेळी उघडकीस येतो, असं ते म्हणाले. आयएल आणि एफएस कंपनीला सरकार आर्थिक पाठिंबा देत असल्याचा, तसंच राफेल कराराबाबतचा काँग्रेस अध्यक्षांचा दावा खोटा ठरला, याकडे बालुनी यांनी लक्ष वेधलं.

****



 जम्मू-कश्मीरमध्ये, दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका तळावरून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. त्यात दोन एके ४७ बंदुका, चार युबीजीएल बाँब, एक बाँबक्षेपक आणि मोठ्या प्रमाणावर काडतुसांचा समावेश आहे. दोडा जिल्ह्यात १९९० ते २००० या काळात, दहशतवाद्यांचा वावर जास्त असताना, हा तळ वापरात असावा, असा अंदाज आहे.

****



 युवकांनी उद्योग व्यवसायांची उभारणी करून, रोजगार निर्माता व्हावं, यासाठी त्यांच्या गुणांना पोषक वातवरण तयार करणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी, स्टार्टअप भारत महाराष्ट्र यात्रेला झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते, केंद्र सरकार ई मार्केट तयार करत असून, उद्योगांचं नियमन, विपणन आणि वित्तपुरवठा या तीन प्रमुख बाबींवर हे ई मार्केट सहायक ठरेल, असं प्रभू म्हणाले.

****



 छत्तीसगढमधल्या कोंडागाव जिल्ह्यात एका महिलेसह सात लक्षलवाद्यांनी काल केंद्रीय राखीव पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं. हे नक्षलवादी मर्दापाल आणि डोंगढ भागात सक्रिय होते. या नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आवश्यक मदत दिली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

****



 मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला आज चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमिनीवर उतरताना बगळ्यानं धडक दिली. वैमानिकानं प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे उतरवलं. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा मात्र यामुळे खोळंबा झाला. विमान तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं जेट एअरवेज प्रशासनानं जाहीर केलं.

****



 मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करावा तसंच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शासनानं जाहीर करावी, अन्यथा १९ ऑक्टोबरला पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात स्वाभीमानी शेतकरी पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा खासदार राजु शेट्टी यांनी केली आहे. बुलढाणा इथं आयोजित कापूस आणि सोयाबीन परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...