Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 6 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
६ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि रशियानं सर्व
प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत दहशतवादाचा सामना करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या
दुटप्पी भूमिकेचा अंगिकार न करता निर्णायक आणि सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याच्या
भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर
पुतीन यांच्यामध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात
ही माहिती देण्यात आली. दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या
जाळ्याचा नायनाट करणं गरजेचं असल्याचही उभय नेत्यांनी यावेळी मान्य केलं.
****
भारतामध्ये रशियन गुंतवणूकीला
चालना देण्यासाठी ’जलद गतीची ’एक खिडकी योजना’ राबवणार असल्याचं वाणिज्य मंत्री सुरेश
प्रभू यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारत-रशिया व्यापार शिखर परिषदेत बोलत
होते. दोन्ही देशांना हायड्रोकार्बन, सोने, हिरे, लाकूड, औषधी, कृषी, वीज निर्मिती,
उड्ड्यन आणि रेल्वेसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या संधी असल्याचं
प्रभू यावेळी म्हणाले. रशिया भारतासोबत सहकार्य वाढवण्यासाठी एक स्वतंत्र धोरण तयार
करत असल्याचं रशियाचे आर्थिक विकास विभागाचे मंत्री मॅक्सीम ओरेशकिन यांनी म्हटलं आहे.
****
चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर, रिझर्व
बँकेच्या सात पूर्णांक चार
टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त
राहण्याची अपेक्षा असल्याचं आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितलं आहे.
पतधोरण समितीनं जारी केलेल्या निवेदनाचं आणि व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाचं
सरकार स्वागत करत असल्याचं गर्ग यांनी ट्वीट केलं आहे. चलन फुगवट्या बाबत केंद्रानं केलेलं मूल्यमापन पतधोरण समितीच्या मूल्यमापनाशी
सुसंगत असल्याचं गर्ग यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय जनता दल
पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव
यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसीच्या
उपहारगृह कंत्राट भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मंजुर केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग
आणि सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयानं या दोघांसह
इतर आरोपींना १९ नोव्हेंबर पर्यंत हा अंतरिम जामीन मंजुर केला आहे.
****
भारतानं पंकज शर्मा यांची जिनेव्हामध्ये होणार असलेल्या
संयुक्त राष्ट्र संघाच्या नि:शस्त्रीकरणाबाबत आयोजित परिषदेसाठी भारताचे कायम स्वरुपीचे
प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. अमनदीप गिल यांच्या जागी शर्मा यांची निवड करण्यात
आली आहे. शर्मा सध्या परराष्ट्र व्यवहार विभागामध्ये नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय
सुरक्षा विभागाचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांची दोन दिवसीय
बैठक बोलावली आहे. ही बैठक आज मुंबईत सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं
काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांना अर्ध्या
अर्ध्या जागा देण्याची मागणी केल्याचं, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
****
बांबू हस्तकला प्रशिक्षण
केंद्राच्या माध्यमातून राज्यातल्या ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या
समृध्द होईल असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. पुणे
इथल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल बांबू हस्तकला आणि कला केंद्र तसंच ग्रंथालय
इमारतीच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. वृक्षारोपण, वन्यजीवांचं संरक्षण आणि आदिवासी समाजाचं सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या
वनविभागाचा भर असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं.
****
फळांचा राजा असलेला कोकणच्या “हापूस” आंब्याला
बौध्दिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झालं आहे. केंद्रीय आद्योगिक धोरण
आणि प्रोत्साहन विभागानं मानांकनाची अधिकृत घोषणा केली. देशातल्या ३२५ उत्पादनांना
आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झालं असून, यामध्ये महाराष्ट्रातल्या ३१ उत्पादनांचा
समावेश आहे. या उत्पादनात पैठणी साडी, मराठवाड्याचे केसर आंबे, जालन्याचे
गोड संत्री, पुणेरी पगडी, आदींचा समावेश आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात राजकोट इथं सुरु असलेल्या
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी, भारतानं वेस्ट इंडिज संघाला
फॉलोऑन दिला आहे. आज शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या २१ षटकात दोन बाद
९४ धावा झाल्या होत्या. भारत ३७४ धावांनी आघाडीवर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment