Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 8 October 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
८ ऑक्टोबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि फ्रान्सदरम्यान झालेल्या राफेल खरेदी करारासंदर्भातल्या
एका जनहितयाचिकेवर येत्या दहा तारखेला सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज होकार
दिला. या कराराचे तपशील जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, तसंच काँग्रेस
आणि भाजप सरकारांनी या विमान खरेदी संदर्भात केलेल्या करारांतल्या किमतीचा तुलनात्मक
अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा, अशा मागण्या या याचिकेमध्ये करण्यात आल्या
आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या पीठापुढे
या याचिकेची सुनावणी होणार आहे.
****
केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत
घटनापीठानं नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करणारी एक याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय अय्यप्पा भक्त संघाच्या अध्यक्ष
शैलजा विजयन यांनी ही याचिका दाखल केली असून, या मंदिरात, सर्व वयाच्या महिलांना प्रवेश
देण्याचा निर्णय अकारण असल्याचं यात म्हटलं आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं
हा लिंगाधारित भेदभाव असल्याचं नमूद करत या महिन्याच्या अट्ठावीस तारखेला सर्वोच्च
न्यायालयानं या मंदिरात असलेली महिलांसाठीची प्रवेशबंदी हटवली होती.
****
एअरसेल मॅक्सिस प्रकरणी
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांच्या अटकेला दिल्ली
न्यायालयानं एक नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग
- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी चिदंबरम यांच्याकडून दाखल अर्जावर
सविस्तर उत्तर देण्यासाठी तसंच यासंदर्भात युक्तिवाद करण्यासाठी आणखी मुदत मागितली,
त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणी पुढची सुनावणी एक नोव्हेंबरला ठेवली असून, चिदंबरम
पितापुत्रांना त्या तारखेपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
****
विदेशात राहणारे भारतीय हेच खरे भारताचे सांस्कृतिक राजदूत
आहेत, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे
इथे भारतीय समुदायाला संबोधित करताना ते काल रात्री बोलत होते. भारत आणि ताजिकिस्तान
यांच्यात अनेक शतकांपासून जवळचे संबंध असल्याचं नमूद करत, उभय देशांमधला व्यापार वाढवण्या
सोबतच, नागरिकांमधला परस्पर संपर्क वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रपती आज ताजिकिस्तानचे
अध्यक्ष एमामोली रहमोन यांची भेट घेणार आहेत. उभय नेत्यांदरम्यान अनेक महत्त्वाच्या
मुद्द्यांवर चर्चा आणि महत्त्वाचे अनेक करार होण्याची अपेक्षा आहे.
****
भारतीय वायू दलाचा आज शहाऐंशीवा स्थापना दिन साजरा
होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी भारतीय हवाई दलाला शुभेच्छा देत, भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व
शूर जवानांना सलाम, अशा शब्दात एका ट्विटसंदेशातून आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
पतगांच्या मांज्यानं गळा चिरला गेल्यामुळे पुण्यातल्या
भोसरी इथल्या एका महिला डॉक्टरचा काल मृत्यू झाला. डॉक्टर कृपाली निकम आपल्या दुचाकीवरून
नाशिक फाटा उड्डाणपुलावरून जात असताना मांज्यामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत
झाली. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचं घोषित केलं.
****
सुरक्षित वाहतुकीचे नियम डावलणाऱ्या शालेय विद्यार्थी
वाहतुक करणाऱ्या वाहनांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र
माने यांनी घेतला आहे. याशिवाय, सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात,
यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं संयुक्त मोहिम राबवण्याचा निर्णयही घेण्यात
आला आहे. औसा तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर बसचालक आणि मदतनिसानं अत्याचार केल्याची
घटना नुकतीच उघडकीस आली, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
मुदखेद-नांदेड-परभणी
रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरु असल्यानं परवा दहा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत,
आठ दिवस मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशत: तर काही पूर्णत: रद्द
करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची
नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या झरी इथं शाश्वत स्वच्छतेसाठी
आजपासून दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात उघड्यावर
शौचमुक्त गाव संकल्पनेसह विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment