Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 October 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राफेल
लढाऊ विमान खरेदी करारात सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी यांनी केला आहे. वर्धा इथं आज आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी
सेवाग्राम मध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. या करारावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावं,
अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासनं दिली,
शेतकरी कर्जमाफी केली नाही, शेतमालाला हमीभाव दिला नाही, देशात बरोजगारी वाढली अशी
टीका त्यांनी केली. सरकार देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप गांधी
यांनी यावेळी केला.
****
भारिप
बहुजन महासंघ आणि मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन - एमआयएम या पक्षांनी वंचित बहुजन आघाडी
स्थापन करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद
इथं आज झालेल्या दोन्ही पक्षांच्या जाहीर सभेत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी
यांनी, महाराष्ट्रात एमआयएम पक्ष भारीप बहुजन महासंघाला पाठिंबा देईल, अशी घोषणा केली.
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षानं मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या हीतासाठी कोणतंही
कार्य केलं नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
लोकपाल,
लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी
घोषित केलेलं आजपासूनचं उपोषण राज्य सरकारच्या आश्वासनामुळे स्थगित केलं आहे. आज अहमदनगर
जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं अण्णांचं आंदोलन सुरु होणार होतं, मात्र जलसंपदा मंत्री
गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धि इथं जाऊन सरकारच्या वतीनं अण्णांशी चर्चा केली.
त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली. काही मागण्यांवर सरकारनं सकारात्मक
पावलं टाकली, तर काही मागण्या मान्य झाल्या, मात्र अद्याप काही आश्वासनं केवळ कागदावरच
आहेत, पंरतु सरकारवर विश्वास ठेवावा लागेल, असं अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज सर्वत्र विविध
कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. मंत्रालयात मंत्री विनोद तावडे आणि महादेव जानकर
यांनी, तर विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गांधीजी आणि
शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
लातूर
शहरात खासदार सुनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी स्वच्छता
करुन महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली. यावेळी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता दिंडी काढण्यात
आली.
हिंगोली
शहरात भारतीय जनता पक्षातर्फे स्वच्छता सेवा संवाद रॅली काढण्यात आली. बीडमधे जिल्हाधिकारी
कार्यालयात उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
धुळे
शहरातही रॅली काढून जिल्हा परिषद आवारात विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. महात्मा
गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांना समर्पित व्हायचं असेल तर, आपण सर्वजण
स्वच्छतेचा नारा देऊ या, असं आवाहन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून औरंगाबाद शहर राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी
कॉंग्रेसच्या वतीनं सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात आज शहागंज परिसरातल्या महात्मा
गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत धारण करून
तसंच तोंडाला काळ्या पट्या लावून आंदोलन करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आमदार सतीश चव्हाण यावेळी उपस्थित होते.
हिंगोली
शहरातही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनं तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध
करण्यात आला.
****
जालना
- अंबड - वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गाचं भुमिपूजन आज अंबड इथं सार्वजनिक बांधकाम
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. ३७७ कोटी रुपये खर्च करुन हा सिमेंट रस्ता
करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद
इथं ‘ज्ञानोत्सव २०१८’ चं आयोजन करण्यात आलं असून, शिक्षणतज्ज्ञ अतुलभाई कोठारी यांच्या
हस्ते आज या ज्ञानोत्सवाचं उद्घाटन झालं. समाज परिवर्तनासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांना
दिशा देण्याचा प्रयत्न ज्ञानोत्सवाच्या माध्यमातून होत असल्याचं कोठारी यावेळी म्हणाले.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या ग्रामबाल विकास केंद्राचा आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. कुपोषण मुक्तीसाठी जिल्ह्यात २५२ ग्राम बाल विकास केंद्र
स्थापन करून जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या केंद्राला गौरवण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment