Wednesday, 3 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

अटल सौर कृषी पंप योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राज्यात सात हजार सौर कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार असून, त्यापैकी २२ पूर्णांक पाच टक्के पंप अनुसूचित जाती आणि जमातींच्या लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.

‘संजय गांधी निराधार योजना’ आणि ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’तल्या दिव्यांग व्यक्तींना देणात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. याअंतर्गत आता ४० ते ७९ टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा ८०० रुपये, ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेत धान भरडाईसाठी केंद्राच्या दरा व्यतिरिक्त राज्याकडून अतिरिक्त ३० रुपये प्रति क्विंटल दर देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १० रुपये प्रति क्विंटल दर दिला जातो.

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यस्तरीय प्रयोगशाळा नागपूर इथं राहणार असून, इतर ठिकाणांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळा अंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संशोधन करण्यात येणार आहे.

****

राफेल लढाऊ विमानं भारतीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतील, असं हवाई दल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनला आपल्या भागीदाराची निवड करायची होती. त्यामध्ये सरकार आणि भारतीय हवाई दलाची कोणतीही भूमिका नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राफेल एक उत्तम प्रतीचं विमान असून, ते जेव्हा उपखंडात येईल, तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं धनोआ यांनी नमूद केलं.  

****

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येईल, या यात्रेची तयारी सुरु झाली असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली इथं आज हज यात्रेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावर्षीची हज यात्रा झाल्यानंतर लगेच पुढच्या यात्रेची तयारी सुरु होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हणाले.

****

भारतीय लघु उद्योग विकास बँक - सिडबीनं राष्ट्रीय स्तरावरच्या उद्योजक जागरुकता अभियान - उद्यम अभिलाषाची सुरुवात केली. याअंतर्गत नीति आयोग २८ राज्यांमधल्या ११५ आकांक्षित जिल्ह्यातल्या १५ हजार युवकांना उद्योजकतेचं प्रशिक्षण देण्यासाठी निवडणार आहे. या जिल्ह्यांमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी सिडबी सहकार्य करणार असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. हे अभियान संपूर्ण देशात पुढचे सहा दिवस सुरु राहणार आहे.

****

नवकल्पना असणाऱ्यांना आणि स्टार्टअप विकसित करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमुळे मोठं व्यासपीठ मिळणार असल्याचं राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे राज्यात नव उद्योजक घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते. स्टार्टअप यात्रेच्या निमित्तानं राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

थोर स्वतंत्र सेनानी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या करम इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वीज पुरवठा सुरळीत ठेवावा या मागणीसाठी महावितरणच्या उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. एका आठवड्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील, असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

भूतानमध्ये थिंपू इथं सुरु असलेल्या अठरा वर्षांखालच्या ‘सॅफ’ महिला फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. येत्या शुक्रवारी हा सामना होईल. काल झालेल्या सामन्यात भारतानं मालदिवचा आठ - शून्य असा पराभव केला.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून राजकोट इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

****

No comments: