Sunday, 7 October 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 07.10.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 7 October 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.००

****

सरकारनं देशातील प्रशासन आणि व्यवहार पारदर्शक बनवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देहरादून इथं पहिल्या उत्तराखंड गुंतवणूकदार संमेलनात ते आज बोलत होते. देशातील घोटाळेबाजीला आता आळा बसला असून, त्यामुळे बँकिंग प्रणालीला मोठं बळ मिळालं आहे, तसंच देशातली राजकोषीय तूट कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात ४०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण आणि १०० नवी विमानतळं आणि हेलिपॅड उभारणीची प्रक्रियाही सुरू असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, ‘आयुष्यमान भारत योजने’मुळे आरोग्य क्षेत्रातली गुंतवणुकही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं नमूद केलं.

****

आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारांवरच्या उपचारांसाठी राज्यातल्या ९० टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शंभर कोटी रुपये, तीन वर्षात टप्प्याटप्प्यानं देण्यात येतील, तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ.सुनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे, या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यातल्या पाणी टंचाईच्या स्थितीचं मूल्यांकन करणारा अहवाल १३ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं सांगितलेल्या चार घटकांवर हा अहवाल आधारलेला असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. राज्यात दुष्काळ जाहीर करायचा की नाही, किंवा दुष्काळी परिस्थितीबाबत या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

देशात वाढती धर्मांधता आणि जातीयवाद रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असून, आता होऊ घातलेल्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गोर गरीबांचा कोणताही विचार केला नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी केलेल्या भाषणात सरकारवर टीका केली. 

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या बागलपार्डी इथल्या भाविकांच्या गाडीला उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद इथं अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. आज पहाटे अयोध्येहून परत येताना हा अपघात झाला. जखमींवर अलाहाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

****

सुरक्षित वाहतुकीचे नियम डावलणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने यांनी घेतला आहे. याशिवाय, सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं संयुक्त मोहिम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. औसा तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर बस चालक आणि मदतनिसानं अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

****

महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी शासनाच्या वतीनं विविध कायदे तयार करण्यात आले असून, या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र, तसंच राज्य शासन विशेष प्रयत्न करत असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज आयोजित ‘लिंगभाव जाणीव आणि महिला बाल अत्याचार विषयक कायदे’ या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. स्त्रीभ्रुण हत्या, लैंगिक अत्याचार, बालविवाह यावरील प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून याबाबत जागृती करण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अकरावी प्रवेशासाठी तिसऱ्या प्राधान्य फेरीनंतरही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यामुळे प्रवेश प्रक्रिया समितीनं आता चौथी आणि शेवटची प्राधान्य फेरी जाहीर केली आहे. ही फेरी उद्यापासून २० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून त्यानंतर मात्र ही प्रक्रिया बंद केली जाईल, असं शिक्षण उपसंचालक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, काही कारणांमुळे महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेले, एटीकेटी, प्रवेश रद्द केलेले, तसेच नव्यानं नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...