Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधी मंडळाचं
हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरू होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी आणि
विरोधी पक्षाच्या वतीनं बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकांमध्ये अधिवेशनातली रणनीती ठरवण्यात येणार
आहे. विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक दुपारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी मंत्रीमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयला विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी बंदी घातल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी टिका केली आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये काल ते वार्ताहारांशी
बोलत होते. भ्रष्टाचार प्रकरणात एखाद्या राज्याची स्वायतत्ता कायम राखली जाऊ शकत नाही
असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल सरकारनं घेतलेल्या भूमिकेचा शारदा चिट फंड घोटाळ्यात
समावेश असलेल्या तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही
याकडेही अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
****
केंद्र सरकारनं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांची महसूल सचिव म्हणून, तर
महसूल विभागाचे विशेष सचिव गिरीशचंद्र मुरमू यांची व्यय सचिव म्हणून नियुक्ती केली
आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनं काल याची अधिसूचना जारी केली. पांडे यांच्याकडे विशिष्ट
ओळख प्राधिकरणाचा कार्यभार सध्या कायम ठेवण्यात आला आहे.
****
नुकताच अवकाशात सोडण्यात आलेला दळण वळण उपग्रह जी सॅट
- २९ निर्धारित कक्षेत स्थिर करण्याच्या तिसऱ्या पायरीवर यशस्वीपणे पोहोचला आहे. उपग्रह
सुखरुप असून, लवकरच तो निर्धारित कक्षेत स्थिर होईल, असं इस्रोचे अध्यक्ष
के. सिवन यांनी सांगितलं.
****
देशात कोळसा उत्पादन आणि पुरवठ्याबाबतच्या समस्यांचं निराकरण
करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं
आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत भारत कोळशाची कमी प्रमाणात आयात करेल आणि कोळशाचा
दर्जाही वाढला आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात
काल ते बोलत होते.
****
जैविक इंधनाचा विमान उड्डाणासाठी सुरक्षित स्वरुपात वापर
करता येईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबईत एका
पुस्तक प्रकाशनानंतर ते बोलत होते. या पुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये भारताचा
पुढाकार याविषयीची माहिती देण्यात आली आहे. या विमानात २५ टक्के जैविक इंधनाचा वापर
करण्यात आला होता. मात्र, केवळ जैविक इंधनाचा वापर करूनही विमान उड्डाणे घेतली जाऊ
शकतात असंही त्यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात श्रीपत पिंपरीजवळ
खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले. बार्शी
कुर्डुवाडी राज्य मार्गावर वांगरवाडी हद्दीत आज पहाटे ही दुर्घटना घडली. ही बस नांदेडहून
मुंबईच्या दिशेनं जात होती. जखमींना बार्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम येत्या २७ नोव्हेंबरपासून
पासून राबवली जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर नागरिक, पालक-बालक
यांच्यात जनजागृती व्हावी म्हणून लातूर शहरात आज पालक - बालक रॅलीचं आयोजन करण्यात
आलं होतं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी रॅलीला हिरवा
झेंडा दाखवला. यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मोहीमेअंतर्गत नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातल्या
मुला-मुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे.
****
विद्यार्थ्यांनी समोर असलेली आव्हानं पेलून, आपला
दबदबा निर्माण करावा, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. परभणी
इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल आयोजित ‘युवकांची सामाजिक जबाबदारी
आणि भविष्यातली आव्हानं’ या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी
सामाजिक जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी निकम यांच्या हस्ते विविध
परिक्षांमध्ये राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
भारतीय महिला कुस्तीपटूंनी जपानच्या फुजीमीमध्ये आयोजित
१५ वर्षांखालील आशियाई महिला कुस्ती विजेतेपद स्पर्धेत तीन सुर्वण पदकांसह एकूण सात
पदकं मिळवून दुसरं स्थान पटकावलं. काल झालेल्या आठ देशांच्या स्पर्धेत भारतानं एक रौप्य
आणि एक कांस्य पदकही मिळवलं. स्वीटी, पूजा
रानी आणि कोमल यांनी सुवर्ण पदक तर पिंकी, एंटिम आणि
भाग्यश्री फंड यांनी रौप्य तसंच प्रतिभा जांघूनं एकमेव कांस्य पदक जिंकलं. २०२ गुण मिळवून जपान पहील्या, १८१
गुणांसह भारत दुसऱ्या, तर १२५ गुण मिळवून कझाकीस्तान तिसऱ्या स्थानावर राहीला.
*****
***
No comments:
Post a Comment