Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१९ नोव्हेंबर २०१८ सकाळी
७.१० मि.
****
Ø सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग निर्माण करून मराठा
समाजाला आरक्षण; मात्र अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का नाही - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ø राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत; सरकारच्या
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
Ø मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे
- कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं शासकीय महापूजेत, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
यांचे विट्टल चरणी साकडे
आणि
Ø हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची समग्र मांडणी झाली नाही -ज्येष्ठ
साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांचं मत
****
सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग निर्माण करून
मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्यात येईल, हे आरक्षण देताना
अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल सांगितलं. आजपासून सुरू होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य
मागास वर्ग आयोगानं मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबत अहवालात केलेल्या
शिफारशी राज्य सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मागासवर्गीय आयोगानं तीन शिफारशी केल्या. पहिली
शिफारश आहे मराठासमाज हा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात येत आहे.
तसेच त्यांचे शासकीय व निमशासकीय क्षेत्रातली सेवेमध्ये पुरेसे प्रतिनिधीत्व नसल्याचे
निर्दशनास येईल. मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित केल्यामुळे
भारतीय संविधानाच्या कलम १५-४ व १६-४ मधील तरतूदीनूसार हा समाज आरक्षणाचे फायदे
घेण्यासाठी पात्र आहे.
या आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची परवानगी
आवश्यक नाही. याबाबत आपण महाअधिवक्त्यांशी चर्चा केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विधीमंडळाच्या आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी
अधिवेशनात यासाठी कायदा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाचं
स्वरूप ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं, की, धनगर समाजाला वेगळं साडे तीन टक्क्यांचं आरक्षण आजही आहे. पण ते त्यांना
भटके आणि विमुक्त जमातीमधून दिलं जातं. हे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातून देण्यात
यावं, अशी या समाजाची मागणी आहे, मात्र या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अधिकार राज्य
सरकारला नाही, त्यामुळे या बाबतची शिफारस लवकरच केंद्र सरकारला केली जाईल, असं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत
सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी
बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षांची बैठक झाली. या अधिवेशनात
विविध मुद्यांवर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या अधिवेशनात
मराठा आरक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धनगर आणि मुस्लिम
आरक्षणाचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबरोबरच राज्यातली
दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारकाचा मुद्दा, जलयुक्त शिवार
योजनेतला कथित भ्रष्टाचार, अवनी वाघिणीचा मृत्यू, अशा अनेक मुद्यांवरून अधिवेशनात वादळी
चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी
राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे, असं
साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे,
कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं विट्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर
ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातले बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या
पत्नी आनंदी मेंगाणे यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला,
पाटील यांच्या हस्ते या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
आज प्रबोधिनी कार्तिकी अर्थात एकादशीनिमित्त पंढरपूर
इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यातल्या
ठिकठिकाणच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
****
देशभरात आजपासून कौमी एकता सप्ताह सुरू होत आहे.
सांप्रदायिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकतेची भावना मजबूत करणं हा या सप्ताहाचा उद्देश
आहे. या सप्ताहाअंतर्गत, देशभरात बहु सांस्कृतिक आणि बहु धार्मिक समाजात सहिष्णुता,
सह-अस्तित्व आणि बंधुभावाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करणाऱ्या विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड - एच ए एल मध्ये
कुठल्याही प्रकारच्या कामाची कमतरता नसून, या कंपनीला १२७ तेजस विमान बांधणीचं काम
दिलेलं आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. ते काल नाशिक
इथं वार्ताहरांशी बोलत होते. एच ए एल मध्ये काम नसल्याच्या चर्चा पसरवल्या जात असून,
त्या चुकीच्या असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची समग्र मांडणी झाली नाही,
असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद
इथं श्याम बोधनकर स्मृती पुरस्कारांचं वितरण डॉक्ट मोरे यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी
ते बोलत होते. मुस्लिम शासक आणि हिंदूबहुल जनता असतानाही या लढ्याचे नेते स्वामी रामानंद
तीर्थ, आणि श्याम बोधनकरांसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, धार्मिक तणाव निर्माण होऊ
दिला नाही, याकडे मोरे यांनी लक्ष वेधलं. यावेळी स्वातंत्र्यसैनिक ना वि देशपांडे यांच्या
हस्ते, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना सेवागौरव पुरस्कार, उस्मानाबादच्या
हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या डॉक्टर शुभांगी अहंकारी यांना इंद्रायणी बोधनकर पुरस्कार,
तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सचिव शहाजी भोसले यांना प्रोत्साहन पुरस्कारानं गौरवण्यात
आलं
****
स्वातंत्र्य सेनानी आणि निवृत्त सहाय्यक आयुक्त वसंतराव
पेडगावकर यांचं काल सायंकाळी औरंगाबाद इथं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते
८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा वाजता, प्रतापनगर इथे
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथले व्यावसायिक शंभु काकडे
यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून दोन लाख रुपयांचं कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवला
आहे. याविषयी बोलतांना ते म्हणाले –
माझा फोटोग्राफिचा
व्यवसाय असून, मला भांडवला अभावी व्यवसाय करण्यासाठी मर्यादा पडत होत्या. यातच मला
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली. कागद पत्रांची पुर्तता करून सेलू येथिल
स्टेट बँक ऑफ इडिया मध्ये अर्ज दाखल केला. बँकेने २लाख रूपयांचे कर्ज मंजूर केले. त्यातूनच
मी दोन क्यामिरे घेतले. यामूळे माझा व्यवसाय वाढला आहे.
****
रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या
वतीनं काल राज्यभरात महावॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंगोली शहरातल्या संत नामदेव
कवायत मैदानावरून काढण्यात आलेल्या या फेरीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी
झाले. अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत रॅलीच्या
माध्यमातून माहिती देण्यात आली. नांदेड सह अन्य शहरांतूनही आयोजित महावॉकेथॉनला चांगला
प्रतिसाद मिळाला.
****
जालना इथं काल फन रनर फाउंडेशनच्या वतीनं फनरनर्स
जालना मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन हजार २०० स्पर्धक यात सहभागी झाले होते.
पाच, १० आणि २१ किलोमीटर या तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली.
****
लातूर जिल्ह्याच्या काही तालुक्यात काल पाऊस झाला.
नांदेड तसंच उस्मानाबाद इथं आज पहाटेच्या सुमारास पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे.
****
भारतीयांनी भाषा, प्रांत, संस्कृती आणि राहणीमानात
असलेल्या विविधतेतून एकता साकारली असल्याचं मत, भारतीय राष्ट्रीय युवक प्रकल्पचे संस्थापक
ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केलं. लातूर
इथं विलासराव देशमुख फाऊंडेशन, गोल्ड क्रेस्ट हाय आणि राष्ट्रीय युवा योजना यांच्या
संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात ते काल बोलत होते. महाराष्ट्रासह
१८ राज्यातली बालकं या आनंद महोत्सवात सहभागी झाली आहेत.
****
लातूर
इथं काल गोवर- रुबेला लसीकरणाच्या
माहितीसाठी पालक - बालक रॅली
काढण्यात आली. राज्यात हे लसीकरण येत्या २७ नोव्हेंबरपासून पासून, नऊ
महिने ते पंधरा वर्षे वया दरम्यानच्या मुलांसाठी राबवलं जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रॅलीला हिरवा
झेंडा दाखवला.
****
महिलांच्या
जागतिक मुष्टीयुद्ध विजेतेपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोम हिनं उपांत्य फेरीत
प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत काल मेरी कोमनं ४८ किलो वजन
गटात कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत हे यश मिळवलं. मनिषा मौन, लवलीना बोरगोहेन आणि भाग्यवती कचरी यांनीही
आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment