Monday, 19 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 संपूर्ण देशात स्वच्छता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त दिलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी, गेल्या चार वर्षांपासून देशात स्वच्छता अभियान वेगानं सुरु असल्याचं नमूद केलं. स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या नागरिकांचं त्यांनी अभिनंदन केलं.

****



 झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राणी लक्ष्मीबाई या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत असून, त्यांच्या सारख्या महान स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.



 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही पंतप्रधानांनी आज त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग आहे.

****



 विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधानसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीतच विविध अहवाल तसंच २०१८-१९ च्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****



 महिला पोलिसांची आठवी राष्ट्रीय परिषद आजपासून झारखंडमधे रांची इथं सुरु होत आहे. पोलिस संशोधन आणि विकास संस्थेनं राज्य पोलिस दलाच्या सहकार्यानं परिषदेचं आयोजन केलं आहे. महिला पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी देशातलं हे एकमेव व्यासपीठ आहे. या परिषदेच्या माध्यमातून लैंगिक शोषणांविरोधात उपाय शोधण्याचं काम होत असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. याखेरीज महिला पोलिसांना विश्रांती कक्ष त्यांच्या अपत्यांसाठी पाळणाघरं अशा सोयी सुविधा देण्याबाबतचे मुद्देही परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात येतील.

****



 एल्गार परिषद प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयानं डावे कार्यकर्ते वरवरा राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरवरा राव यांना स्थानबद्ध ठेवण्याची हैदराबाद उच्च न्यायालयानं दिलेली मुदत शनिवारी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पुण्याजवळ भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं.

****



 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज होत आहे. बँकांखेरीजच्या वित्तीय संस्थांसाठी रोख रकमेचे निर्बंध, छोट्या उद्योगांना पतपुरवठा आणि नवीन आर्थिक गुंतवणूक चौकट या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी ही बैठक बोलावली आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या अजनुज इथले जवान कपिल गुंड यांच्या पार्थिव देहावर आज अजनुज इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये १५ नोव्हेंबरला झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलं.

****



 कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी लातूर-पंढरपूर कार्तिकी रेल्वे ही विशेष गाडी आज खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. या रेल्वेबरोबरच बिदर-पंढरपूर, अदिलाबाद-पंढरपूर रेल्वे गाडया खास भाविकांच्या सोयीसाठी सुरु केल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

****



 निसर्गावर अवलंबित शेती अडचणीत असून केंद्रासह राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांसाठी गटशेती किंवा कृषी उद्योग उभारण्याचं धोरण जाहीर करुन त्यांच्या आर्थिक प्रगतीसह शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचं काम केलं, असं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत निलंगा तालुक्यातल्या रामलिंग मुदगड इथं उभारण्यात आलेल्या गोदाम आणि खरेदी केंद्राचं उद्घाटन काल निलंगेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. निलंगा तालुक्यातल्या विविध गावांना भेट देवून निलंगेकर यांनी दुष्काळी परिस्थितीसह अन्य समस्यांची माहिती घेतली.

****



 राज्यात काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पावसानं हजेरी लावली, तर आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरात मध्यरात्री दोन तास चांगला पाऊस झाला. या पावसामुळे रबी पीकांना उपयोग होईल, तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. सातारा जिल्ह्यातही काल हलका पाऊस झाला असून, आज वातावरण ढगाळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments: