आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
वर्धा इथल्या पुलगाव परिसरात असलेल्या लष्करी तळावर
भीषण स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. आह पहाटे ही दुर्घटना
घडली. देवळी तालुक्यातल्या सोनेगाव आबाजी गावाजवळ बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून
पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर सावंगी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटाच्या
आवाजामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या
स्फोटाबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
छत्तीसगढ विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं
आज मतदान होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी पाच
वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. १९ जिल्ह्यातल्या ७२ जागांसाठी एक हजार ७९ उमेदवार रिंगणात
असून, एक कोटी ५४ लाखहून अधिक मतदार आहेत. मतदान शांततेत पार पडावं यासाठी निवडणूक
आयोगानं चोख बंदोबस्त ठेवला आहे.
****
उस्मानाबाद नगर परिषदेचे शिवसेना नगरसेवक अक्षय ढोबळे
यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी नगरसेवक पदावरुन अपात्र केलं आहे. ढोबळे यांनी
उस्मानाबाद शहरातल्या आनंदनगर भागात नगरपालिका खुल्या भुखंडावर अतिक्रमण करुन बांधकाम
केल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पक्षाच्या लता धनवडे यांनी केली होती.
****
वर्धा जिल्ह्यातल्या बरबडी इथली सरपंच अनिता शिवरकर
हिला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना पती, मुलगा आणि सचिवासह काल अटक करण्यात आली.
या चौघांनी, झालेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी कंत्राटदाराला बत्तीस हजाराची लाच
मागितली होती.
औरंगाबाद तहसील कार्यालयातला वाहनचालक अविनाश जाधव
यालाही, वाळूची वाहतूक निर्वेधपणे होऊ देण्यासाठी वाळू वाहतूकदाराकडून दीड लाख रुपयांची
लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष
आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र संकेतस्थळावर
भरण्यासाठीचा आणि नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
वाढवण्यात आला आहे. या निवडणुकीच्या बाकीच्या वेळापत्रकात काही बदल झालेला नाही.
*****
***
No comments:
Post a Comment