Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राज्य
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या
पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अधिवेशनातली
रणनीती ठरवण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या बैठका झाल्या. विरोधी पक्ष विविध मुद्यांवर
सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा
अहवाल सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही
अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबरोबरच अवनी वाघिणीचा मृत्यू,
राज्यातली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारकाचा मुद्दा, जलयुक्त
शिवार योजनेतला भ्रष्टाचार अशा अनेक मुद्यांवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता
आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली.
****
पंजाबमधल्या
अमृतसर मध्ये राजासांसी इथल्या निरंकारी सत्संग भवनात आज बॉम्बस्फोट झाला, यात तीन
जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. दुचाकीवर आलेल्या दोघा सशस्त्र व्यक्तींनी
सत्संग भवनात घुसून मंचावर बॉम्ब फेकल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. जखमींना अमृतसर
इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या
हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी संपर्क
साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
****
एकविसाच्या
शतकातल्या गरजेनुसार उच्च शिक्षण प्रणालीचं पुनर्निर्माण करण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज क्रिया विद्यापीठाचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. देशात उच्च दर्जाच्या संशोधकांची संख्या कमी असल्याबद्दल
आणि पीएचडी पदवी मिळवणाऱ्यांची संख्या कमी झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
****
तामिळनाडूत
गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहेत. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर
नवं वादळ तयार होत असल्याचा इशारा केंद्रीय वेधशाळेनं दिला आहे. या वादळाचा महाराष्ट्राला
धोका नसल्याचं केंद्रीय वेधशाळेचे वैज्ञानिक एम. मोहापात्रा यांनी सांगितलं. मात्र
सावधानतेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या मच्छिमारांना पुढील पाच दिवसांत समुद्रात
न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
****
देशभरात
उद्यापासून कौमी एकता सप्ताह सुरू होणार आहे. सांप्रदायिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकतेच्या
भावनेला मजबूत करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. बहु सांस्कृतिक आणि बहु धार्मिक समाजात
सहिष्णुता, सह-अस्तित्व आणि बंधुभावाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्याची ही एक
संधी आहे. सप्ताहाअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंदुस्थान
एअरोनॉटिक्स लिमिटेड - एच ए एल मध्ये कुठल्याही प्रकारच्या कामाची कमतरता नसून, या
कंपनीला १२७ तेजस विमानांचं निर्माण कार्य देण्यात आलं असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. एच ए एल मध्ये
आता काम नसल्याच्या विविध चर्चा पसरवल्या जात असून, त्या चुकीच्या असल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं.
****
रस्ते
सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आज राज्यभरात महावॉकेथॉनचं
आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
हस्ते वॉकेथॉनचं उद्घाटन करण्यात आलं. यात सुमारे तीनशे युवक आणि शालेय विद्यार्थ्यांनी
सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिंगोली
शहरामध्येही महा वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावरून
काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. अपघात
कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत रॅलीच्या माध्यमातून
माहिती देण्यात आली.
नांदेड
इथंही आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉनला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त लहुराज माळी
यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
****
जालना
इथं आज फन रनर फाउंडेशनच्या वतीनं फनरनर्स जालना मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.
दोन हजार २०० स्पर्धक यात सहभागी झाले होते.
पाच,
१० आणि २१ किलोमीटर या तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब
दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मॅरेथॉनला हिरवा
झेंडा दाखवला.
****
औरंगाबाद
शहरातल्या कलाग्राम इथं सुरु असलेल्या तीन दिवसीय औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनातल्या
एका दालनाला आज दुपारच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव
घेत आग विझवली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
****
No comments:
Post a Comment