Tuesday, 20 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, मराठा आरक्षण, राज्याच्या काही भागातला दुष्काळ आणि अवनी वाघीण या मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कामकाज सुरु होताच दोन्ही सभागृहात विरोधकांनी हे मुद्दे लावून धरले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी आघाडीतल्या शिवसेनेनंही लावून धरला. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली. लिंगायत, मुस्लीम आणि धनगर समाजालाही आरक्षण द्या असं त्यांनी सांगितलं. यावेळी विरोधकांकडून सभागृहात गदारोळ सुरूच राहिला. त्यांनी राजदंड पळवला आणि तालिका अध्यक्षांनाही घेराव घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात आलं.

विधान परिषदेतही गदारोळामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, त्यावर नियम २६० अन्वये चर्चा प्रस्तावित असल्याचं सांगून सभापतींनी तो फेटाळून लावला. प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दोन वेळा अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.

****

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. त्या आज इंदूर इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या. अंतिम निर्णय पक्षाचा असेल, मात्र आपण निर्णय घेतल्याचं स्वराज यांनी सांगितलं.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगित केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालावर वर्मा यांनी दिलेलं उत्तर प्रसारित झाल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पुढची सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.

****

छत्तीसगढ विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान आज शांततेत पार पडलं. दुपारी चार वाजेपर्यंत ५८ पूर्णांक ४७ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.

****

वर्धा जिल्ह्यातल्या पुलगांव इथल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटातल्या मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. तसंच या स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख, तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. या घटनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी आणि समितीनं एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

****

धुळ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र पक्षातर्फे लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनपा निवडणुकीत सर्व ७४ जागांवर स्वाभिमानी भाजपा म्हणून लोकसंग्राम अंतर्गत उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. गोटे यांनी पक्षातर्फे त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांना महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

****

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय समाजातून आरक्षण देण्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाज आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचं ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितलं. ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना इथल्या ३७४ जाती आणि बारा बलुतेदारांच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली.

****

जालना वस्तू आणि सेवा कर कार्यालयातल्या राज्य कर अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. प्रदीप देशमुख असं या अधिकार्याचं नाव असून, कर चुकवेगिरी प्रकरणात दंड न आकारता एका हॉटेल व्यवसायिकाचं गोठवलेलं बँक खात पुन्हा कार्यरत करण्याचं पत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

राज्यात आजही अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे साखर कारखान्यांच्या उसतोडी बंद पडल्या असून, अनेक ठिकाणी उसाने भरलेली वाहनं जागेवरच अडकून पडली आहेत. पावसामुळे द्राक्ष शेतीचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम, उस्मानाबाद जिल्ह्यातही आज पाऊस झाला.

****

No comments: