Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
04 December 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
०४ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
नौदल दिवस आज साजरा होत आहे. नौदल
प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख एयर चीफ
मार्शल बी एस धनोआ यांनी आज नवी दिल्लीत अमर जवान ज्योती इथं पुष्पचक्र अर्पण करुन
हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नौदल दिनानिमित्त
नौसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहे. देशाच्या समुद्री सीमांचं रक्षण, व्यापारी मार्गांची
सुरक्षा आणि आपत्तीच्या काळात मदत उपलब्ध करण्यासाठी असलेल्या नौदलाच्या कटिबद्धतेचा
देशाला अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
मुंबई
पोर्ट ट्रस्टकडून विकसित करण्यात येणारं ईस्टर्न फ्रंट तसंच मुंबईजवळच्या अरबी समुद्रात
उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकामुळे, सागरी सुरक्षेला कोणत्याही
प्रकारचा धोका नसल्याचं, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस
अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी म्हटलं आहे. पश्चिम नौदल कमांडशी सल्ला मसलत करुनच ही विकास
कामं केली जात आहेत, असं लुथरा यांनी आयएनएस कोची इथं आयोजित पत्रकार परिषदेत
सांगितलं. आयएनएस विराटचं सागरी वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव संरक्षण
मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या किनाऱ्यालगत
विकसित करण्यात येत असलेल्या ड्राय पोर्ट सुविधेमुळे, देखभाल
खर्चात कपात होईल असं ते म्हणाले.
****
उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहर जिल्ह्यात सायना हिंसाचार प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गोहत्येच्या
संशयावरून उसळलेल्या या हिंसाचारात, ग्रामस्थांनी
केलेल्या हल्ल्यात दगावलेले पोलीस निरिक्षक सुबोध कुमार सिंग यांच्या कुटुंबियांना
५० लाख रूपये मदत देण्याची घोषणा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली
आहे. या हिंसाचारासंदर्भात येत्या ४८ तासात अहवाल द्यावा, असे
निर्देश त्यांनी गुप्तचर खात्याच्या अपर महासंचालकांना दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर, या
दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी
ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान या भागातली परिस्थिती सध्या नियंत्रणात असून या
भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
तामिळनाडु मधल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र
कळघम - एआयएडीएमकेचे माजी नेते टी टी व्ही दिनकरन यांच्यावर दिल्लीच्या न्यायालयानं
गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित केला आहे. पक्षाचं दोन पानं असलेलं निवडणूक चिन्ह
मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्यासंबंधी हे आरोप निश्चित करण्यात
आले आहेत. दिनकरन आज न्यायालयात हजर झाले असता, त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले.
याप्रकरणी पुढची सुनावणी १७ डिसेंबरला होणार आहे.
****
उच्च शिक्षणातल्या सर्व विषयांमध्ये स्वायत्तता वाढवणं
आणि शैक्षणिक दृष्ट्या राज्य अधिक प्रगतशील बनवण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना
अंमलात आणण्याचा विचार असल्याचं, शिक्षण मंत्री
विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीनं काल मुंबई
विद्यापीठात आयोजित अभ्यासक्रम सहविचार सभेत ते बोलत होते. उच्च शिक्षणातली पदवी देताना,
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची हमी देणं आवश्यक असून, यासाठी नवनवीन कौशल्य
अंगीकृत करण्याची गरज तावडे यांनी व्यक्त केली. यासाठी संस्था चालक आणि प्राध्यापकांनी
अभ्यासक्रम तसंच उद्योजकांना लागणाऱ्या कौशल्याची सांगड घालून आराखडा तयार करावा, असं
आवाहन त्यांनी केलं.
****
शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन उद्योग वाढवण्याचं
आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लघु उद्योजकांना केलं आहे. काल मुंबईत अनुसूचित
जाती जमाती एससी-एसटी उद्योजक विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लघु उद्योगाच्या
प्रगतीसाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा, बाजारपेठ, भांडवल उभारणी आणि आर्थिक सहाय्यासह
सर्व बाबी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं देसाई
यांनी यावेळी सांगितलं.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेच्या
जनजागृतीसाठी डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती
करण्यात येत आहे. परभणी, तसंच नांदेड जिल्ह्यात डिजिटल व्हॅनला मान्यवरांच्या हस्ते
हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं. या डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत, शाळा,
अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छते विषयक फिल्म दाखविण्यात येणार असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भुवनेश्वर
इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
तसंच आयर्लंड
विरुद्ध चीन असे
दोन सामने होणार आहेत. काल ‘अ’ गटातल्या
समान्यात अर्जेंटिनानं न्यूझीलंडवर तीन - शून्य असा विजय मिळवला, तर
स्पेन आणि फ्रान्स यांच्यातला सामना एक - एक असा बरोबरीत सुटला.
*****
***
No comments:
Post a Comment