Monday, 10 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडिलेड इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३१ धावांनी जिंकला आहे. भारताचा दुसरा डाव ३०७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर सामना जिंकण्यासाठी ३२२ धावांचं लक्ष्य होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज २९१ धावांवर संपुष्टात आला. जसप्रित बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन, तर इशांत शर्मानं एक गडी बाद केला. या विजयाबरोबरच भारताचं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी मिळवली आहे. 

****



 अहमदनगर तसंच धुळे महानगरपालिकेसह नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, तसंच वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. याठिकाणी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. धुळे महापालिकेसाठी सुमारे ६० टक्के तर अहमदनगर महापालिकेसाठी ७० टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्याच्या लोहा नगर परिषदेत विक्रमी ९२ टक्के मतदान झालं, तर रिसोड नगरपरिषदेत ७१ टक्के मतदान झालं. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याच्या हस्तांतरणाबाबत आज लंडनचं वेस्टमिन्स्टर न्यायालय निकाल देणार आहे. कर्ज बुडवल्याचा, फसवाफसवीचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप मल्ल्यावर आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिलपासून तो जामिनावर आहे.

****



 चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये एका वाघाचा वीज वाहक तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. भाम डोली इथं शनिवारी सायंकाळी ही घटना निदर्शनास आली. दोन ते अडीच वर्षाचा हा वाघ आहे.

****



 आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्राचा वर्धापनदिन काल साजरा झाला. कार्यक्रम प्रमुख संजय बरिदे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासात आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राचे महत्त्व या विषयावर विचार मांडले.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...