Tuesday, 11 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर २०१८  दुपारी १.०० वा.

****



 संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. लोकसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, माजी मंत्री अनंतकुमार यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनासमोर मांडला. सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी, या अधिवेशनात समाधानकारक कामकाज होण्याची अपेक्षा व्यक्त केली.



 राज्यसभेतही सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर, यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाचा प्रस्ताव मांडला. सदनानं दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

  

 छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. अद्याप कोणत्याही ठिकाणी निकाल हाती आले नाही. मिझोराममध्ये एकूण ४० जागांपैकी मिझो नॅशनल फ्रंट सर्वाधिक २५ जागांवर आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. राजस्थानात दोनशे जागांपैकी काँग्रेस ९९, तर भारतीय जनता पक्ष ७४ जागांवर आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात २३० जागांपैकी काँग्रेस १०८ आणि भाजप १११ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरु असून, एकूण ९० जागांपैकी काँग्रेस ५३ तर भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात ११९ जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समिती ९०, तर काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे.   

****



 माध्यमांनी लैंगिक अत्याचारातल्या पीडितेची ओळख उघड करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना, पोलिसांनी लैंगिक अत्याचारासंदर्भात दाखल प्रथम माहिती अहवाल सार्वजनिक करु नये, असं नमूद केलं. अशा प्रकरणातल्या पीडितांना समाजात अस्पृश्यासारखी वागणूक मिळणं, हे दुर्देवी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कुशवाह यांनी काल केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये जागा वाटपावरून कुशवाह नाराज होते.

****

  

 केंद्र सरकारनं राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना - एनपीएसमधला वाटा दहा टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. सर्व रक्कम काढून घेताना त्यावर दिल्या जाणाऱ्या करसवलतीची मर्यादा ६० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे काढलेली संपूर्ण रक्कम आयकरमुक्त होईल. निवृत्तीवेतन निधी आणि गुंतवणूक प्रकाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना असेल, असंही जेटली यांनी सांगितलं. 

****



 देशातल्या ९० टक्के घरांपर्यत स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा पोचला असल्याचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत उज्ज्वला संमेलनात बोलत होते. गेल्या साडेचार वर्षात १२ कोटी नव्या गॅस जोडण्या झाल्या, त्यापैकी पाच कोटी ८३ लाख जोडण्या उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं.

****



 लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण अधिनियम २०१२ - पोक्सो आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या सुधारणांबाबत, राज्य महिला आयोगानं औरंगाबाद इथं आज एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचं उद्घाटन केलं. विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर, पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद, यावेळी उपस्थित होते. महिला आणि बालकांच्या विकासासाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचं भापकर यांनी नमूद केलं, तर चिरंजीवी प्रसाद यांनी, औरंगाबाद जिल्ह्यात या कायद्यांतर्गत गुन्हे सिध्दीकरणाचं प्रमाण ४६ टक्के असल्याचं सांगितलं.

****

  

 भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज होणाऱ्या दोन क्रॉस ओव्हर सामन्यांमधून उपांत्यपूर्व फेरीसाठीचे उर्वरित दोन संघ निश्चित होतील. उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना उद्या, इंग्लंड आणि ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना यांच्यात होईल तर आज होणाऱ्या नेदरलँड विरुद्ध कॅनडा सामन्यातल्या विजेत्यासोबत परवा १३ तारखेला भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.

*****

***

No comments:

Text आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...