आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४
नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
नौदल दिवस आज साजरा होत आहे.
१९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात नौदलानं बजावलेल्या कामगिरीच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा
केला जातो. या लढाईत भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला करुन पश्चिम किनाऱ्यावरची पाकिस्तानची मोहिम हाणून
पाडली होती. शांतता काळात देशाच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणं, आणि
मानवतावादी मोहिमांमधे नौदलानं केलेली कामगिरी या दिनानिमित्त अधोरेखित केली जाते.
हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल सुरक्षा राखत असून, कोणत्याही
धोक्याला तोंड द्यायला ते सक्षम असल्याचं नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी म्हटलं
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त नौसैनिकांना
आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचं रक्षण आणि आपत्तींमध्ये बचावकाऱ्यात
सदैव तत्पर असणाऱ्या नौसैनिकांप्रती देश कृतज्ञ असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे.
****
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात
जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं ट्विटरवर सायबर दोस्त या नावानं ट्विटर
हँडल सुरू केलं आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसंच
यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी या
ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचं आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथं दुय्यम निबंधक
कार्यालयातला दुय्यम निबंधक राजरत्न रणदिवे याला चार हजार पाचशे रूपयांची लाच स्विकारतांना
लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. एक गुंठा भूखंडाची नोंदणी करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं घरगुती
विद्युत मीटर बसवून पाहणी अहवाल देण्यासाठी तीन हजार आठशे रुपयांची लाच घेतांना तंत्रज्ञ
योगेश मुंढे याला रंगेहात पकडण्यात आलं.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रेशीम कोषाला
उच्चांकी तीस हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीच्या आवारातल्या रेशीम
कोष बाजारपेठेत काल अडीच टन कोषांची आवक झाली होती. यावेळी बाजार समितीचे सभापती तथा
वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून
रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून
देण्याची ग्वाही दिली.
*****
***
No comments:
Post a Comment